राजा दिगंबर राय 2
“महाराज, मी गरीब, मजुरी करणारा. गाय ना बैल माझ्याजवळ. मी दूध कोठून आणू ? ताकाचा थेंब नाही मिळत. दुसरे पाण्याबरोबर घ्यावयाचे औषध आहे का ? मिठाबरोबरही नको. मीठही महाग केले ह्या नवीन सरकारने ! नवीन राजा चांगला म्हणतात, पण आम्ही तर दादा मरणार सारे. कोणी श्रीमंत जगतील तर जगतील.” शेतकरी म्हणाला.
“अरे, तुम्ही मेलात तर आम्ही श्रीमंत तरी कसे जगणार ? तुमच्यावर तर आमच्या उड्या. तुम्ही श्रमाल तेव्हा आमच्या पोटाच्या ढेरी खातील. तुमच्या अभावी ही आमची दोदे खपणार कशी व खाणार काय ? तुम्ही आमचे हातपाय ! तुम्ही मेलेत म्हणजे आम्हीही मरू. तुम्हांला जगवले नाही, तर त्यात आमचाही सर्वनाश. या खेड्यांची स्मशाने होतील बाबा.” दिगंबर राय म्हणाले.
“मग कसे करू पोराचे ?” शेतकरी करुण वाणीने म्हणाला.
“मी व्यवस्था केली आहे सारी. ही पाहिलीस ? गाईच्या दुधाची अच्छेराची लोटी भरून आणली आहे. सकाळी पुन्हा ये. मीच माझ्या हाताने भरून देईन. अलीक़डे गडीमाणसांवरही भरंवसा नाही. लोक फसवाफसवी करायला लागले. पाणी घालून तुमचे दूध तोच प्यायचा ! कलियुग म्हणतात ते परकीय राजाने आणले की काय कोणाला माहीत ! सकाळी ये हो. आणि कधी कधी आमच्याक़डून ताक वगैरे नेत जा. पुष्कळ असते. लौकर होईल बरा.” दिगंबर राय म्हणाले.
“महाराज किती उपकार ! कोठे फेडू ?” शेतकरी म्हणाला.
“अरे, तुमचेच उपकार आम्ही कोठे फेडू ! तुम्हा सर्वांचेच आम्हांवर उपकार आहेत. हे सारे वैभव तुमच्या श्रमांचे आहे. श्रीमंत मनुष्याने सर्वांना वाटण्यासाठीच जमवून ठेवावयचे. हे धनधान्य, हे दूध-तूप, हे माझे नाही. ह्याची व्यवस्था लावणारा मी, वाटून- काला करणारा मी. पेंद्याला शक्ती यावी म्हणून जास्त द्यावे, दुसर्याला शक्ती आहे म्हणून जास्त द्यावे ! हीच मजा ! जा हो. सकाळी-सायंकाळी येत जा.”
दिगंबर रायांनी त्याला निरोप दिला. दुसर्या दिवशी त्याच्या घरी धान्यही पाठवून दिले. त्या शेतकर्याची बायको दिगंबर रायांना शत धन्यवाद देऊ लागली. जगात दुःखी दुनियेत दिलेला दुवा- यापेक्षा श्रेष्ठतर काय आहे ? धन्यतम काय आहे ? आणि दुःखी दुनियेने दिलेला, तळमळून दिलेला शाप- याहून भयंकर दुसरे काय आहे