राखालची तळमळ 3
राखालच्या घरी खावयास काय ? इतर विणकरी नवीन कपडा विणू लागले. पोट भरु लागले. खेडयांतील बायका सूत घेऊन येत, तेही आता ते विकत घेत नसत. कोण जातो खेड्यात व घेतो विकत ! हे आयतेच घ्या एकदम ! पूर्वी विणकर खेड्यांत विकत घ्यावयास जाई, आता त्या आयाबहिणी त्यांच्याकडे येत. परंतु कोणी सूत घेईना ! ते एक तर महाग पडे व सरकारी अंमलदारांचाही छळ ! त्यांचे एजंट घरोघर सूत उधार देऊन जात, चटकन लावून जात ! खेड्यांतील बाया रडत घरी जात ! ‘अरे देवा, आम्हांला बुडवणारे हे कोठले सूत, हे कोठले भूत, हाय रे देवा !’ असे त्या म्हणत. घरचे चरखे पहात व रडत ! ते पवित्र चरखे, काय करायचे त्यांचे ! ते फेकणे म्हणजे पाप, जाळणे म्हणजे पाप ! ते माळ्यावर जुन्या पोथ्या असत तसे ठेवण्यात आले.
राखालला त्या बाया परत जाऊ लागल्या म्हणजे वाईट वाटे. त्यांना बारीक सूत कातण्याची बंदी करण्यात आली होती, जो विणील त्यालाही बंदी ! शिक्षा ! कला जाणार, -जाणार ! शेक़डो वर्षांची, वेदकालापासूनची ही दिव्य अनादी कला जाणार काय, मरणार काय ? राखालला वाईट वाटे.
खानदानीच्या दिलदार श्रीमंतांनाही वाईट वाटे. तो मिलचा कपडा घालणे त्यांना पाप वाटे. ते अजून विणकराजवळचा घेत. विणकर मिलच्याच सुताचा विणणार, परंतु त्यातल्या त्यांत बरा. साळवटी लुगडी, साळवटी धोतरे अजून खपत होती. अजून हिंदूस्थान निगरगट्ट झाला नव्हता. अजून श्रीमंत लोक खेड्यापाड्यांतून होते. ते शहरात बंगले बांधून मोटारी उडवू लागले नव्हते. अजून ते गायीगुरांत होते. अजून घरी गाईची खिल्लारे होती, वासरे अंगणात असत. तबेल्यात दिलदार घोडी असे ! अजून शहरातील इंग्रजी शिक्षण फार बोकाळले नव्हते. इंग्रजीतील ‘ही’ म्हणजे ‘तो’ व ‘शी’ म्हणजे ‘ती’ व ‘डॉग’ म्हणजे ‘कुत्रा’ हे शब्द घराबाहेर बसून पाठ करावे लागत, अपवित्र मानले जात !
राखाल हा उत्कृष्ट विणकर म्हणून प्रसिद्ध होता. त्याची किर्ती आजूबाजूला पसरलेली होती. त्याचा नावलौकिक होता. श्रीमंतांच्या लग्नातून वधूवरांना त्याच्या हातचेच कपडे यावयाचे. असा हा राखाल. आज त्याला खायला नव्हते. तरी तो अजून विलायती सूत, मिलचे सूत वापरावयास तयार नव्हता. देशी जाडेभरडे सूत त्याने विणले असते तर ? परंतु त्याला तो कलेचा अपमान वाटे. ज्या बोटांनी आंब्याच्या कोयीत ठेवता येईल असा धोतरजोडा विणला व नवरदेवाला दिला, त्याच बोटांनी का सुताडे विणू ? ज्या बोटांनी फुले वेचली त्या बोटांनी शेण कालवू ? गुलाम होण्यापेक्षा माझे हात स्वतंत्र राहू दे. राखाल, कलापूजक राखाल उपाशी राहू लागला ! कलेचा -हास स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मरण बरे. कलेची उपासना, ध्येयाची पूजा- आपल्या देवाची अर्चना व सेवा करता येत नसेल तर जीवनात काय राहिले ? जीवनात ना राम, ना आराम. ना काम, ना विश्राम. ना सुख, ना आनंद. ते जीवनभीषण नीरस जीवन- त्याहून मरण बरे !