चार दिवसांचे चांदणे 5
मंडळी घरोघर जाऊ लागली. सरकारी अंमलदार गाड्याघोड्यांतून निघून गेले. निरोप देण्यात येऊ लागले. नमस्कार करून करून यजमानांचे हात दुखुन आले. विवाह लागला. दुसर्या दिवशी पंगत होती. सार्या गावाला पंगत. सा-यांनी वधुवरांस आशीर्वाद दिला. त्यांचे अभिष्ट चिंतन केले. रात्री वरात निघाली. दारू उडविली गेली. चंद्रज्योतीच्या प्रकाशात ती अलंकाराने नटवलेली वधूवरे सुंदर दिसत होती. विवाहाचा आजचा शेवटचा दिवस. आज सा-यांचे मानपान व्हायवयाचे होते. कोणाला शेला, कोणाला पोगोटे, कोणाला लुगडे, कोणाला खण- आज द्यावयाचे होते. आज पाठवणी होती, बोळवणी होती.
दिगंबर रायांनी राखालला बोलावले. त्याचा सत्कार केला. त्याला सोन्याचे कडे बक्षीस दिले! राखालच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सोन्याचे कडे मिळाले म्हणून का ? इतक्या लोकांत आपला गौरव केला म्हणून का ? नाही, नाही. अजून रसज्ञ लोक, गुणज्ञ लोक, कलेची पूजा कशी करावी हे जाणणारे रसिक व सहृदय लोक हयात आहेत, याबद्दल त्याला आनंद झाला. मी मेलो तरी जोपर्यंत हे लोक आहेत तोपर्यंत कला मरणार नाही, हे मरू देणार नाहीत ; द्राक्षाच्या वेलाला सुकू देणार नाहीत. कलावानांना धुंडाळून आणतील, कला जगेल. जगो, जगो- माझ्या पूर्वजांची कला जगो- याचा त्याला आनंद होत होता.
विवाह झाला. गाणारे वाजवणारे निघून गेले. धर्ममार्तंड निघून गेले. पाहुणेराहुणे निघून गेले. गावातील गर्दी मोडली. पुन्हा रोजचे व्यवहार सुरु झाले.