पोलिसांकडून छळवाद 4
राखालच्या गावात आज त्याला फाशी होणार होती ! ज्या गावात त्याचे आई-बाप त्याचे पूज्य पूर्वज नांदले, ज्या गावाची किर्ती त्यांनी आसमंतात आपल्या कलेने वाढवली, ज्या गावाला त्यांनी श्रेष्ठत्व दिले, मानमान्यता दिली, त्या गावात आज कलापूजक राखाल चोर-डाकू-खुनी समजून फाशी जाणार होता ! ज्या गावात राखालच्या पूर्वजांना मानसन्मान मिळे, राजेरजवाडे बक्षीसे पाठवून देत, त्याच गावात राखाल आज दीन भणंगाप्रमाणे फासावर लटकला जाणार होता !
गावातील सारे लोक भयभीत झाले. सरकारच्या आमंत्रणावरून ही फाशी पाहावयास जाणे त्यांना भाग पडले ! मी थोर कलापूजकाचा कसा अमानुष अंत करतो ते पाहावयास चला, अशी सरकारने, या नवीन राजाने प्रजेला हुकूमवजा सांगी केली ! जाण्याची इच्छा नसूनही, हे भेसूर दृश्य पाहायची इच्छा नसूनही, आपल्या धंद्याला ज्या मान्यता मिळवून दिली, त्या थोर कलावानाचा- कारागिराचा तो अमानुष अंत पाहावयाची इच्छा नसूनही अनेकांना जावे लागले ! तो पाहा, दुःखी कष्टी लोकांचा जबरीने गोळा केलेला समुदाय ! घरांतून सार्यांना हे भेसूर दृश्य पाहावयास पोलिसांनी दामटवीत आणले. डोळांवर अश्रूंचे पांघरूण आले होते. सार्यांची दृष्टी आंधळी झाली होती. ते खुर्चीवर अधिकारी बसले आहेत. तो मध्ये एक गोरा अधिकारी आहे. आजूबाजूला सशस्त्र लोकांचा पहारा आहे. तो पाहा फाशीच्या ठिकाणी राखाल, भक्त राखाल- गंभीरपणे उभा आहे, शांतपणे उभा आहे. त्या बोहल्यावर चढण्यासाठी तो वरपुत्र उभा आहे. कलावधूशी लग्न- चिरलग्न लावून घेण्यासाठी तो उभा आहे. सरकारचे तो मनातून आभार मानीत आहे. चिरलग्न- आज माझे चिरलग्न लागणार! लग्नविवाह-छे- कला ही माझी वधू नसून माझी देवता आहे. तिच्या पूजेला मी जाणार. तिच्या सेवेला जाणार. मी तिचा चिरसेवक, चिरपाईक होणार. परमेश्वराचे चिरसेवक होण्याचे भाग्य पाहिजे असेल तर आगीतून जावे लागते, मरणातून जावे लागते. फास, सूळ, गोळी, विष यांना मिठी मारुन जावे लागते. फासाचा सर गळ्यात घालून- हा पवित्र दोरा गळ्यात घालून ईश्वराची पूजा करावयास जाता येते. काही पंथांत ईश्वराचा भक्त होण्यासाठी, त्या पंथाची दीक्षा घेण्यासाठी तप्तमुद्रा देतात- त्याचा अर्थही ईश्वराचा ईश्वराचा होण्यासाठी आधी भाजून घे ; भाजल्याशिवाय दाण्यातून सुंदर स्वच्छ लाही कशी निघणार? राखाल कलादेवीची उपासना कायमची करायला मिळावी, म्हणून तिला प्राणांची पूजा बांधणार होता. रावणाने आपल्या शिरकमळांची माला शंकराला, मृत्युंजयाला घातली, तेव्हा मृत्युंजयाने त्याला आत्मलिंग दिले, सर्वस्व दिले. राखाल आपल्या आराध्यदेवाला, सकल कलाधिराजाला- जो कलाधिराज सकाळ-सायंकाळ पूर्व-पश्चिमेच्या कारखान्यांत शेले, शालू, पैठण्या, पीतांबर, गालीचे भराभर अनंत रंगांचे, अनंत छटांचे विणून दाखवतो व ती कला लेकरांना शिकवतो- तो कलाधिराज त्याला शिरकमळांची पूजा अर्पण करणार होता. त्याला अत्यंत आनंद होत होता. ते शुद्धतम बलिदान होते. ते ख्रिस्त-सॉक्रेटिसाचे बलिदान होते ! ते मीरेचे विषप्राशन होते- ब्रूनोचे जाळून घेणे होते !