महात्मा गांधींचें दर्शन 50
प्रवचन ७ वें
आज शेवटचा दिवस, समारोपाचा दिवस. आज येथें महात्माजींच्या जीवनाचा चित्रपट कलावान् बंधूंनीं चित्ररूपानें मांडला आहे. प्रवचनांतील कल्पनाहि अशा मांडतां येतील. असो. आज मी अहिंसेवर विवेचन करणार आहें. महात्माजींनीं जो स्वराज्याचा चौरस सांगितला त्यांत राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्व प्रकारची विषमता जावी असें सांगितलें. आपण चार प्रवचनांत या गोष्टींचा थोडाफार ऊहापोह केला. पांचव्या नि सहाव्या प्रवचनांत सत्यासंबंधीं विवेचन केलें. कारण जी सर्व प्रकारची विषमता नष्ट करायची म्हणून महात्माजी सांगतात, ती सत्याग्रही मार्गानें नष्ट करायची आहे. सत्याग्रही मार्ग म्हणजे सत्य अहिंसेचा मार्ग. हें सत्य म्हणजे काय याचा खुलासा व्हायला हवा. सत्य आत्मवत् सर्व भूतानि वृत्ति होण्यांत आहे. सत्य म्हणजे सर्वभूतहित असें आपण पाहिलें. आतां अहिंसा म्हणजे काय पाहूं. अहिंसा नि सत्य परस्परपूरक आहेत. किंबहुना एकरूपच आहेत. सत्य म्हणजे सर्वभूतरहित म्हणजे सर्वभूतमात्रांवर प्रेम असेंच नाहीं का होत? अहिंसा नसेल तर सत्य नाहीं. अहिंसेनेंच आपण सर्वांवर प्रेम करूं. म्हणजेच सर्वभूतहितरत बनूं. म्हणजेच सत्यप्राप्ति करून घेऊं. अहिंसेशिवाय सत्यप्राप्ति, सत्यदर्शन नाहीं. ही जीं गांधीजींची निष्ठा तिच्याविषयीं आज चार शब्द सांगणार आहें. सत्याची जी आपण कल्पना घेतली. तिच्या निरनिराळया अर्थानें. संदर्भांत आपण पर्याय शब्द वापरले. सामाजिक सत्य म्हणजे न्याय. न्यायबुध्दि म्हणजे सर्वभूतहित बुध्दि, सर्व समाजाच्या हिताची बुध्दि. प्रत्येक मनुष्य केवळ स्वार्थीच असतो असें नाहीं. मनुष्य केवळ स्वार्थी नाहीं, केवळ न्यायी आहे. त्याच्याजवळ स्वार्थ बुध्दिहि आहे, न्यायी वृत्तीहि आहे. परंतु ही न्यायी वृत्ति, धर्मवृत्ति मलिन होते. स्वार्थी वृत्तिच बळावते. निःस्वार्थ बुध्दि ही एक निष्ठा आहे. ती सर्वांजवळ नसते. परंतु तिचा आधार घेतल्यांवाचून समाज सुखी होणार नाहीं. प्रत्येकानें आपापला स्वार्थ साधावा असें आपण म्हणूं तर कोणालाच संतोष मिळणार नाहीं. समाजरचना अशा अनिर्बंध रीतीनें कशी पाळणार? समाजाची उभारणी सेवा, न्याय, कर्तव्य यांवर करायला हवी. आजची समाजरचना स्वार्थ नि स्पर्धा यांवर उभारलेली आहे. मानवसमाजाला ही लांछनास्पद गोष्ट आहे. मानवाला हा कलंक आहे. सेवा व कर्तव्य यांच्या आधारावर समाजाची उभारणी करावी अशी महात्मा गांधींची इच्छा आहे. आज जगांत जें राजकारण नि अर्थकारण रूढ आहे त्यामुळें त्यांना दुःख होतें. त्याचा विचार करतांना मनाला खेद झाल्याशिवाय रहात नाहीं असें ते म्हणतात. ते म्हणतात कीं मानवी व्यवहारांत कर्तव्य, न्याय, सेवा हीं तत्त्वें येतील तरच उन्नति शक्य आहे. आपल्या सर्वांच्या व्यवहारांत सत्य म्हणजेच सर्वांच्या कल्याणाची इच्छा आणि अहिंसा म्हणजे सर्वांवर प्रेम या दोन गोष्टी दाखल होतील तर किती छान होईल ! हीं तत्त्वें जोंपर्यंत व्यवहारांत येत नाहीत, तोंपर्यंत कितीहि इतर सुधारणा केल्या तरी मानवी उन्नति होईल, सर्वांना खरें सुख प्राप्त होईल असें वाटत नाहीं. आर्थिक, राजकीय सर्वच व्यवहारांत धर्मबुध्दि हवी. महात्माजींची धर्मकल्पना सर्वजीवनव्यापी आहे. सारेच व्यवहार मानवांच्या हितबुध्दीनें केले पाहिजेत. आज जगांत युध्दें आहेत. कां? तर सर्वत्र स्पर्धा नि स्वार्थ यांची चलतीं आहे. हीं आज जीवनसूत्रें आहेत. स्पर्धा नि स्वार्थ जायला हवी असतील तर निराळी समाजरचना हवी. महात्माजींचा चरखा, त्यांचा ग्रामोद्योग, या गोष्टींकडे आपण अशा दृष्टीनें पाहूं तरच त्यांतील अर्थ कळेल. चरखा, ग्रामोद्योग यांची कांस धराल तर युध्दें जातील.