महात्मा गांधींचें दर्शन 28
महात्माजींचे क्रांतिशास्त्र
महात्माजींच्या क्रान्तिशास्त्राच्या मांडणींत दोन गोष्टी आहेत.
१. असहकार , २. कायदेभंग.
दोन्ही मिळून त्यांचे अहिंसक क्रान्तिशास्त्र पूर्ण होतें. क्रान्ति यशस्वी होण्याच्या दृष्टीनें या दोन्ही गोष्टी हव्यात. राज्यसत्ता उलथून पाडण्याच्या दृष्टीनें असहकार अधिक प्रभावी आहे. कायदे न मोडतां असहकार करणें ही गोष्ट अधिक निरुपद्रवी असून अधिक परिणामकारक आहे. सविनय कायदेभंग करणारास देहदंड, क्लेश भोगणें प्राप्त असतें. त्यापेक्षां केवळ अहकारांत त्रास कमी असून परिणाम पुन्हां अधिक आहे. आपल्याला आपल्या देशांतील लढयांत असें दिसून येईल की, सविनय कायदेभंग करणारे सरकारशी, परकी सरकारशीं सहकार करीत आहेत. कायदेभंग करून तुरूंगांत येतात, तर तिकडे शेतसारा, प्राप्तीवरील कर भरीत असतात. इकडे तुरुंगांत येतील तर तिकडे कारखान्यांतून सरकारला माल पुरवीत असतील ! म्हणून जोंपर्यंत परकी सरकारशी असहकार नाहीं तोंवर क्रान्ति नाही. असहकार कायदेभंगापेक्षा निरुपद्रवी असून अधिक प्रभावी आहे. असहकारांत परकी सरकारला खरा धोका आहे. असहकारानें सारा सरकारी गाडा आपण बंद पाडूं शकतों. आपण सरकारला आव्हानपूर्वक सांगतों की, ''अन्याय बंद करा, न्याय प्रस्थापा; असें न कराल तर तुमचें राज्ययंत्र बंद पाडूं. राष्ट्रव्यापी असहकार करूं; याद राखा.'' पोलीस, लष्कर, सर्वत्रच जर असहकार शिरला तर सारें राज्ययंत्रच बंद पडतें. गाडयाला खीळ पडते. असहकारांत अपार शक्ति आहे. फार भयंकर आहे हें अहिंसक साधन. सविनय कायदेभंग करून आपण आत्मक्लेशानें शत्रूचें हृदय परिवर्तवूं पाहतों. असहकारांत कायदा मोडीत नसलों तरी राज्ययंत्रच बंद पाडतों. कायदा पाळणें म्हणजे सहकार, कायदा मोडणें म्हणजे असहकार असें असलें, तार्किक निष्कर्ष जरी असा असला, तरी कायदे न मोडता होणारा असहकार हा कायदे मोडण्यांतच एका अर्थी परिणत होतो. कायदेभंग आणि कायदेभंग न करतां केलेला असहकार दोन्ही एकरूपच आहेत.
कायदेभंगाचें द्विविध रूप
गांधीजींच्या कायदेभंगाचें रूप द्विविध आहे. संरक्षक आणि चढाऊ किंवा आक्रमक. जो अन्यायी कायदा असेल तेवढाच मोडणें हा संरक्षक भाग. नागरिकत्वाचे मूलभूत हक्क काय याचीहि आधीं स्पष्ट जाणीव हवी. सरकार मूलभूत हक्कांवर गदा आणील तर कायदेभंग करायला हवा. त्या विशिष्ट हक्काच्या रक्षणार्थ हा कायदेभंग त्या विशिष्ट गोष्टीपुरताच असेल. समजा, भाषणबंदी असेल तर भाषण करून कायदा मोडणें. सभाबंदी, प्रचारस्वातंत्र्यबंदी, लेखनबंदी इत्यादी गोष्टी नागरिक हक्कांवर गदा आणणार्या आहेत. अर्थात् अहिंसक रीतीनें आपण सारें केले पाहिजे. अहिंसक रीतीनें प्रचार करायलाहि बंदी झाली तर तेथें मूलभूत हक्कांवरच हल्ला आला. तेव्हां तेवढया गोष्टीपुरता कायदेभंग करायचा. त्या विशिष्ट गोष्टीपुरता कायदेभंग करणें म्हणजे संरक्षक कायदेभंग. परंतु सरकारनें एक अन्याय केला, तर त्या अन्यायाच्या दूरीकरणार्थ र्सवच बाबतींत कायदेभंग सुरू करणें याला चढाऊ किंवा आक्रमक कायदेभंग म्हणायचें. शेतसारा डोईजड आहे म्हणून तो नाकारणें हा संरक्षक कायदेभंग; परंतु इतर अन्याय दूर करण्यासाठीं इकडे शेतसाराहि नाकारणें म्हणजे चढाऊ कायदेभंग. संपूर्णपणें सर्वत्रच कायदेभंग सुरू करणें म्हणजे उघड बंडच होय. अर्थात् हें अहिंसक, अनत्याचारी बंड आहे. संपूर्ण असहकारानेंहि राज्यतंत्र बंद पडतें. संपूर्ण कायदेभंग म्हणजेहि बंड होतें. दोहोंतहि अहिंसा आहे. सरकारी कायदे मी मोडीन, परंतु नीति मी सोडणार नाहीं. सरकारी कायदे नीतीला धरून नाहींत म्हणून तर माझा असहकार, माझा कायदेभंग. नैतिक कायदा हा शासनसंस्थेच्या कायद्यापेक्षां श्रेष्ठ आहे. सत्याग्रही नैतिक कायद्याचा पुजारी असतो, अनैतिक नि अन्याय्य कायद्याचा झुगारी असतो. नैतिक कायदा पाळणें म्हणजेच पुरा कायदा पाळणें