महात्मा गांधींचें दर्शन 1
महात्मा गांधींचे दर्शन
प्रकरण १ ले
आज भाद्रपद वद्य द्वादशी. या तिथीला जी तारीख येते तिच्यापासून आरंभ करून दोन ऑक्टोबरपर्यंत आपण गांधीजयंतीसप्ताह पाळीत असतो. भाद्रपद वद्य द्वादशीस पंचांगाप्रमाणे महात्माजींचा जन्म झाला. इंग्रजी जन्मतारीख २ ऑक्टोबर. जगभर सर्वत्र २ ऑक्टोबरलाच गांधीजयंती होते. भाद्रपद वद्य द्वादशीस आता रेंटिया बारस म्हणजे चरक्याची द्वादशी असे नाव देण्यात आले आहे. कारण महात्माजी म्हणजे रेंटिया. ते एकदा म्हणाले होते, माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर खादी खपवा, चरका सर्वत्र न्या. म्हणून त्यांच्या जन्मतिथीलाच रेंटिया बारस नाव देऊन गुजराथने चरका अमर केला. म्हणजेच एक प्रकारे महात्माजींना व त्यांच्या कार्याला अमर केले आहे. असा हा गांधीजयंतीसप्ताह आपण आजपासून सुरू करीत आहोत. या सप्ताहाच्या कार्यक्रमांत गांधीतत्त्वज्ञान किंवा गांधीदर्शन या विषयावर सात दिवस सात प्रवचने देण्याचे मी योजिले आहे. महात्मा गांधी हे आज २५/३० वर्षे आपल्या पुढे सतत उभे आहेत. नाना स्वरूपांत उभे आहेत. महान् क्रान्तिकार्य त्यांनी चालविले आहे. आपणही सारे त्यांच्या या कामामध्ये आपापल्या शक्तीप्रमाणे भाग घेत आहोत. महात्मा गांधींचे चरित्र जगाला नवीन दृष्टिकोण देणारे असल्यामुळे त्याला गांधी-दर्शन किंवा सत्याग्रहदर्शन असे नाव द्यायला हरकत नाही. आज आपल्या देशांत अनेक दर्शने रूढ आहेत. निरनिराळी दर्शने मोठमोठया विभूतींनी या देशाला प्राचीन काळापासून दिली आहेत. परंतु महात्मा गांधींनी आणखी एक नवीन दर्शन दिले आहे; अशा श्रध्देने आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांच्या कार्यात सामील होतो. महात्मा गांधींच्या चरित्राच्या द्वारा हे नवीन दर्शन, हे नवीन तत्त्वज्ञान जगाला मिळत आहे, या निष्ठेने आपण त्यांचे शक्यतेनुसार अनुकरण करीत आहोत.
ज्या वेळेस एखाद्या पुढा-याच्या विचारांस आपण दर्शन असे नाव देतो, त्या वेळेस ते विचार आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहेत असे आपण समजत असतो. जीवनाच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाला आपण दर्शन हे नाव देत असतो. सारे जीवन अंतर्बाह्य कसे आहे व ते कसे असावे याचे अचूक व सम्यक् दर्शन जो महापुरुष घडवितो त्याच्या विचारांना, त्याच्या तत्त्वज्ञानाला आपण दर्शन ही पारिभाषिक संज्ञा देत असतो. अशी दर्शने जगात निरनिराळया वेळी रूढ होत असतात. आजही आहेत. महात्मा गांधींकडे केवळ एक मोठे राजकीय पुढारी एवढयाच दृष्टीने आता आपण पहात नाही. जगही एवढयाच अर्थाने पहात नाही. आज जगांत सर्वतोमुखी ''आम्हांस नवीन जग निर्मावयाचे आहे'' ही भाषा ऐकू येते. ही भाषा राजकारणाहून अधिक व्यापक आहे. एखादी नवीन शासनपध्दतीच फक्त आम्हांस निर्मावयाची आहे असे नाही; एखादे नवीन राष्ट्रच फक्त निर्मावयाचे आहे असे नाही; तर नवीन जग निर्मावयाचे आहे. हे ध्येय आज सर्वांसमोर उभे आहे. हे ध्येय सर्वत्र उच्चारिले जात आहे. सर्व जनतेत नवीन जग निर्माण करण्याची आशा आकांक्षा आज उत्पन्न झाली आहे आणि जनतेत सर्वत्र उत्पन्न झालेली जी ही आशा तिच्या पूर्तीसाठी, हे नवीन जग प्रत्यक्षात यावे. यासाठी आज जगांत अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. असे प्रयत्न करणा-यांपैकीच महात्मा गांधी हेही एक आहेत.