महात्मा गांधींचें दर्शन 15
समुद्रावर उठणा-या लाटा थांबवायच्या असतील तर वादळ थांबवा. वादळामुळे त्या लाटा उठल्या आहेत.'' वादळ समाजघटनेत होत असते, आणि मग सर्वत्र असंतोषाच्या लाटा उसळतात. अशी ही वादळे उठू नयेत असे वाटत असेल तर समाजरचना सुधारा. ही वादळे थांबवायची असतील तर महात्माजी म्हणतात, ''जनतेने स्वतःची आत्मशुध्दि केली पाहिजे. जे पाप होत असेल त्यात भागिदार होता कामा नये.'' समाजांत जे पाप होत असते, जी अन्याय्य विषमता असते, तिचे रक्षण शासनसंस्थेमार्फत होत असते. समाजांतील पाप नष्ट व्हावे म्हणून प्रत्येकाने स्वतःची शुध्दि करावी. एवढेच नाही तर ज्या शासनसंस्थेमार्फत त्या पापाला पाठिंबा व संरक्षण मिळत असते, त्या शासनसंस्थेशीहि प्रत्येकाने असहकार करणे आवश्यक आहे. ते प्रत्येकाचे धर्ममय कर्तव्यच आहे. सरकारी राज्यतंत्रातून मी अंग काढून न घेईन, या सरकारशी जोपर्यंत मी सहकार करीत राहीन, तोपर्यंत माझी खरी आत्मशुध्दि झाली असे म्हणता येणार नाही. पापाशी असहकार हा माझा धर्म आहे. असा हा आत्मशुध्दीचा व्यापक मार्ग महात्माजी दाखवीत आहेत. आत्मशुध्दि करा, समाजसुधारणा करा, असे सांगणारे महात्माजींच्या पूर्वी पुष्कळच झाले. परंतु जोपर्यंत पापी सरकारशी तुम्ही असहकार करीत नाही तोपर्यंत आत्मशुध्दि नाही, असे सांगणारे महात्मा गांधी हेच पहिले क्रांन्तिकारी महापुरुष. स्टेटला तो सहकार तुम्ही देत आहांततो काढून घ्या असे गांधीजी सांगतात. आत्मशुध्दि व सरकारशी असहकार यांचा कसा संबंध आहे हे महात्मा गांधींनी अशा रीतीने दाखविले आहे. असहकाराचे महान् तत्व गांधीजींनीच जगाला प्रथम दिले. समाजसुधारणेसाठी आत्मशुध्दि हवी आणि आत्मशुध्दि हवी असेल तर पापी सरकारशी असहकार करा. असे हे अभिनव क्रांन्तिशास्त्र आहे.
महात्माजी सुधारणावादी आहेत की क्रांन्तिकारी आहेत? ते म्हणतात, ''मी सुधारणावादी क्रांन्तिकारी आहे; उत्क्रांन्तिवादी क्रांन्तिकारी आहे.'' महात्मा गांधीची ही क्रांन्ति म्हणजे Evolutionary Revolution (उत्क्रांन्तिरूप क्रांन्ति) आहे. जगात काय असावे? उत्क्रांन्ति असावी की क्रांन्ति असावी? सृष्टीत दोन्ही प्रकार आहेत. त्याचा विचार पुढे केव्हा तरी करू.
आज आपण पाहिले की, महात्माजींचे सारे तत्त्वज्ञान आत्मशुध्दीतून निघाले आहे. आणि ती त्यांची आत्मशुध्दीची कल्पना जगाच्या शुध्दीपर्यंत वाढत गेली. महात्माजींची जी ही दृष्टि ती कळल्याशिवाय त्यांचे दर्शन, त्यांचे तत्त्वज्ञान कळणार नाही. स्वामी रामतीर्थांनी एकदा आपल्या लेखात एक जाहिरात दिली होती, ''पाहिजेत. सुधारणा करणारे. परंतु जगाची नव्हे तर स्वतःची.'' (Wanted Reformers of themselves, not of others) असे सुधारक फार आढळत नाहीत. आत्मशुध्दि करून समाजाची शुध्दि करणारे सुधारक फार थोडे आढळतात. महात्मा गांधी हे अशा अभिनव प्रकारचे सुधारक आहेत. तेहि एक क्रांन्तिकारक आहेत. परंतु आपल्या जीवनांत ते प्रथम क्रांन्ति करू पाहतात. क्रान्ति प्रथम आपल्या जीवनांत झाली पाहिजे. असे होईल तेव्हाच नवे जग आपण निर्माण करू शकू. स्वतःला नवीन करा; स्वतःचा पुनर्जन्म करा; स्वतःचा उध्दार करा. मग तुम्ही नवे जग बनवाल; जगाचा पुनर्जन्म कराल; जगाचा उध्दार कराल. जगाची सुधारणा बाँब आणून होणार नाही, आरमारे वाढवून होणारी नाही, विमानांनी होणार नाही. ही जागतिक क्रांन्ति चर्चिल, रूझवेल्ट, स्टॅलिन करू शकणार नाहीत. परंतु महात्माजी म्हणतात, आत्मविश्वासाने म्हणतात, की खरी क्रान्ति मीच करू शकेन. रूझवेल्ट, चर्चिल, स्टॅलिन, इत्यादींच्या मार्गापेक्षा महात्माजींचा मार्ग भिन्न आहे. तो मार्ग कसा कोठे भिन्न आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे. महात्मा गांधी आत्मशुध्दीच्या, व्यापक आत्मशुध्दीच्या द्वारा जगांत सुधारणा व क्रान्ति करू पाहतात. महात्माजी युध्दाची, क्रांतीचीच परिभाषा वापरतात. मलाहि युध्द करायचे आहे, क्रान्ति करायची आहे असे ते म्हणतात. व्यवहारांत रूढ असलेले शब्दच ते वापरतात. परंतु त्यांच्या शब्दांतील सूक्ष्म अर्थ पुष्कळ वेळा आपणांस समजत नाहीत. म्हणून महात्माजींच्या शिकवणीप्रमाणे आचरण कसे करावे याचा कधी कधी आपणांस नीट उलगडा होत नाही. ते अहिंसेचे उपासक आहेत. अहिंसेने प्रतिकार करणारे ते महान् योध्दे आहेत. परंतु माझा मार्ग झेपत नसेल तर हिंसेने प्रतिकार करा असेहि ते सांगतात. ''हिंसाऽपि क्लैब्यात् श्रेयसी'' असे त्यांचे स्वच्छ मत आहे. ''क्लैब्यं मा स्म गमः पार्थ'' हे भगवद्गीतेतील वचन त्यांच्या वरील मतास आधार आहे. परंतु ते पुनः पुन्हा सांगतात की ''हिंसेच्या मार्गांने आज हजारों वर्षे मानव जात आहेत. हा मार्ग विफल झाला आहे. त्याची निष्फलता स्पष्ट दिसून आली आहे. असे विफल हत्यार पुन्हा हाती धरण्यांत काय अर्थ? रशियांतील लोक आज ख-या अर्थाने सुखी व स्वतंत्र आहेत असे मला वाटत नाही'' असे ते म्हणाले. ''जगांत खरी क्रांति अद्याप झालीच नाही. ती क्रांति मीच करू शकेन आणि ती अहिंसेच्याच मार्गाने होणे शक्य आहे. इतर मार्गांनी नाही.'' असे अधिकारवाणीने ते सांगतात; आत्मविश्वासाने नि अनंत श्रध्देने ते सांगतात.