महात्मा गांधींचें दर्शन 34
कारण पुढें जाणार्या माणसाची, आदर्शाची कल्पनाहि वाढत जाते. समुद्रांत पुढें पुढें जावें तों तो पुढें अधिकच गंभीर नि अथांग वांटू लागतो. मनुष्य जसजसा उन्नत होत जातो, तसतशी मनुष्य किती उन्नत होऊं शकेल याची कल्पनाहि अधिक उंच उंच होत जाते. आपण त्याला अवतारी मानतों, पूर्ण समजतों. परंतु तो स्वतःला अपूर्णच समजत असतो. आणखी मोठें व्हावे, आणखी पुढें जावें, त्या आदर्शाच्या मानानें मी अजून कोठल्या कोठें आहे असेचं तो मुमुक्षु म्हणत असतो. आपणांला क्षितिज किती जवळ दिसतें. तें तेथें टेकलेलें आहे असें वाटतें. परंतु त्याला भेटायला म्हणून आपण जाऊं, त्याला हात लावायला जाऊं, त्याला हात लावयला जाऊं तर तें आणखी दूर जातें. अधिकच विशाल क्षितिज दिसूं लागतें. क्षितिजाच्या जसजसें आपण मागें मागें जाऊं तसें तसें तें आणखी आणखी पुढें जातें. क्षितिजाप्रमाणेंच, आदर्श सृष्टीचें आहे. महात्मा गांधींची हीच वृत्ति आहे, हीच दृष्टि आहे.
कृष्ण म्हणजे संपूर्ण ज्ञान
महात्मा गांधी कोणासहि पूर्ण मानीत नाहींत. त्यांनीं अनासक्तियोगाच्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे : ''कृष्ण म्हणजे संपूर्ण ज्ञान. संपूर्ण ज्ञानरूप कृष्ण भगवान् तो काल्पनिक आहे. तो प्रत्यक्ष कृष्ण - ज्याला आपण अवतारी मानतों तो झाला नसेल असें नाहीं. परंतु संपूर्ण कृष्ण ऐतिहासिक नव्हे. संपूर्ण कृष्ण आदर्शांत आहे. ध्येयसृष्टींत आहे. ऐतिहासिक कृष्णावर त्या संपूर्ण कृष्णाचें आपण आरोपण केलें आहे. प्रत्येक जीव एका अर्थी ईश्वराचा, त्या आदर्श आहे. ईश्वर पूर्ण व अव्यक्त आहे. परंतु जरी आपण सारेच लहानमोठे लौकिक भाषेंत तसें आपण म्हणत, शुध्द ज्ञानाची कल्पना आपल्या आपल्या काळांत सर्वश्रेष्ठ, धर्मवान् असतो, त्याची अवतार या नात्यानें आपण पूजा करतो. योगेश्वर कृष्ण म्हणजे शुध्द पूर्ण ज्ञान, अर्जुन म्हणजे तदनुरूप क्रिया. हृदयांतील शुध्द ज्ञानानुरूप कर्म करण्याची अर्जुनाची म्हणजे ऋजु माणसाची धडपड असते, प्रामाणिक माणसाची धडपड असते. जेथें अनुभवसिध्द, शुध्द ज्ञान आणि तदनुरूप क्रिया ही असतील तेथें वैभव, खरी नीति हीं असणारीच असें गीता सांगते. शुध्द ज्ञानच मनांत नसेल तर शुध्द आचार तरी हातून होणार कसा? पूर्ण मनुष्य म्हणजे शुध्द ज्ञान आणि तदनुरूप क्रिया. सत्य विचार, सत्य उच्चार, सत्य आचार अशा त्रिविध रूपांत जो सत्यमय असतो तो पूर्णत्वाचा पुतळा. त्रिविध सत्याचा जीवनांत साक्षात्कार हवा. माझा विचार सत्य हवा. तो सत्य आहे की नाहीं याची मनांत सारखी चिन्ता हवी. मनांत सारखें परीक्षण सुरू असायला हवें. मनाची प्रयोगशाळा कधीं बंद पडून उपयोग नाहीं. विचाराची सत्यता शोधायची, मग तें वाणीनें उच्चारायचें, आचारांत आणायचें. आपले विचार सत्य नसतील असें वाटलें तर त्याचीं कारणें शोधायचीं. कांही कारणें नैतिक असतात, कांही बौध्दिक असतात. त्यांचा उलगडा करायचा. दोष दवडीत रहायचें. सत्यसंशोधनाचा अखंड प्रयोग. जीवन म्हणजे सत्यदर्शनाची, सत्यसंशोधनाची प्रगोगशाळा होय. भावनाशुध्दि पूर्ण झाली असें कधीं वाटतच नाही. विचारशुध्दि पूर्ण झाली असें कधी वाटतच नाहीं. म्हणून अखंड सावधानता ठेवायची; अखंड यतमान असायचें. त्या त्या वेळेस जें योग्य वाटेल तें करीत राहिलें पाहिजे. परंतु आज जें योग्य वाटत आहे तें योग्यच आहे ना यासंबंधींचा ध्यास सतत हवाच. चिच्छक्ति, विचारशक्ति सारखी जागृत हवी.