महात्मा गांधींचें दर्शन 43
स्पर्धाशास्त्राचा उलटा अनुभव
परंतु या स्पर्धेच्या तत्त्वज्ञानाचा निराळाच अनुभव आला. जेथें स्पर्धा करणारे तुल्यबळ असतात, त्यावेळेला कदाचित् सहज आळा पडेल. परंतु समाजांत, जगांत तसें नाहीं. स्पर्धा नियंत्रण करूं शकत नाहीं असा अनुभव आला आहे, येत आहे. मनुष्याची स्वार्थबुध्दि स्पर्धा सर्वव्यापी होऊं शकणार नाहीं अशी युक्ति शोधून काढीत असते. जगांत, समाजांत आर्थिक विषमता असली कीं स्पर्धा सर्वत्र होऊंच शकत नाहीं. कारण स्पर्धेची साधनें समान नसतात. मागें एकदां ब्रिटिशांनीं सांगितलें कीं, ''हिंदुस्थानांत ब्रिटिश व्यापारी आणि देश व्यापारी यांना समान सवलती द्या. पक्षपात नको.'' तेव्हा गांधीजींनीं लिहिलें होतें की, ''ब्रिटिश कंपन्यांनीं कोटयावधि नफा आजवर मिळविलेला आहे. हिंदी कंपन्या नवीन. या दोघांना मोकळेपणें स्पर्धा करूं देणें म्हणजे प्रचंड राक्षस आणि एकादा बुटबैंगण ठेंगू मनुष्य यांनी मोकळेपणानें कुस्ती करावी असें म्हणण्याप्रमाणें आहे.'' (It is like a fight between a giant and a pigmy) अधिक भांडवल ज्याच्याजवळ आहे, त्याच्याशीं कमी भांडवलवाला स्पर्धा करणार कशी? आणि जेथें अशी आर्थिक रचना आहे तेथें सर्वभूतहितबुध्दीनें मतें बनवावीं असें सांगून काय फायदा? जेथें स्पर्धा आहे, स्वार्थ तेजाळ आहे, तेथें सत्य, अहिंसा यांना कोठलें स्थान? जेथें स्वार्थ नि स्पर्धा आहेत तेथें सर्वात्मभाव नाहीं, म्हणजे सत्यहि नाहीं. कारण सर्वात्मभाव म्हणजेच सत्य असें आपण पाहिलें. सत्य आणि अहिंसा यांच्याशीं विसंगत अशी आजची समाजरचना आहे. एकीकडे स्वार्थ बघायचा आणि दुसरीकडे सर्वांचे हित लक्षांत आणून मतें द्या म्हणायचें हें हास्यास्पद आहे. दिवसाचे २४ तास स्वार्थांत दवडायचे आणि तीन वर्षांनी जेव्हां मते द्यायची तेव्हां एकदम सर्वभूतहितस्फूर्ति येऊन मतें द्यायचीं हें का शक्य आहे? ज्या समाजांत रोज उठून घटकेघटकेला, क्षणाक्षणाला बुध्दीला स्वार्थाचें वळण लागत असतें, तेथें त्या निवडणुकीच्या दिवशीं एकदम सारे सर्वभूतहित लक्षांत घेऊन मतें देतील असें कसें समजतां येईल? अशा समाजांत रजोगुणी नि तमोगुणीच बुध्दि रहायची. नेहमीं स्पर्धा, स्वार्थ; अधर्मालाच धर्म मानण्याची वृत्ति असें चालतें. स्वार्थसाधू सारे म्हणत असतात कीं, आम्हीच समाजाचे आधार. भांडवलवाले म्हणतात, आमच्यामुळें जग चालतें. आम्ही सर्वांचें कल्याण करणारे. आम्ही नसूं तर जगाचा संसार कसा चालेल? अशा रीतीनें स्वार्थान्ध बनून अधर्मालाच धर्म म्हणून हे पुकारतात. स्वार्थालाच परमार्थाचें गोंडस रूप हे देतात. सारा दंभाचा पसारा. त्यांना आपण पाप करीत आहोंत हें का कळत नसतें? परंतु ते आपली सद्सद्विवेक बुध्दि गुंगवून ठेवतात. स्वार्थाला न्यायाचा मुलामा देतात. स्वार्थावर न्यायाचें पांघरूण घालतात. असली ही वृत्ति नष्ट केली पाहिजे. तुम्ही कोणतीहि घटना करा. असली स्वार्थी नि स्पर्धामय वृत्ति राहणार नाहीं असें करा. मत सर्वांना द्या कीं थोडयांना द्या. ह्या बाह्य गोष्टी आहेत. मनुष्य सुधारला पाहिजे. बाह्य बदल कितीहि केलेत तरी तादृश उपयोग नसतो. मनुष्याच्या अंतःकरणांतील दुष्ट वासना, सत्तेची-संपत्तीची आसक्ति, यांना नष्ट केलें पाहिजे. या वृत्तीपासून आत्मा, मनुष्याचें मन साफ स्वच्छ राहिलें पाहिजे.