महात्मा गांधींचें दर्शन 42
तोच परमेश्वराचा आदेश. शुध्दि होईपर्यंत, चित्त शुध्द होईपर्यंत ज्ञान मलिन असतें. तोंपर्यंत खरें ज्ञान, सत्य ज्ञान नाहीं. गढूळ पाण्यांत प्रतिबिंब, सूर्याचें प्रतिबिंब पडत नाही. स्वच्छ पाण्यांत पडतें. तद्वत ज्ञानाचें, शुध्द ज्ञानाचें प्रतिबिंब शुध्द मनोबुध्दींतच पडतें. बुध्दि शुध्द कशी करावयाची? तर आत्मनिष्ठ होऊन. आत्मनिष्ठ होणें म्हणजे 'आत्मवत् सर्वभूतानि' ही दृष्टि घेऊन वागणें. सर्वात्मभावना करणें म्हणजेच सर्वांवर प्रेम करणें. म्हणजे शेवटी काय? सत्यदृष्टि यायला हवी असेल तर सर्वांवर प्रेम करायला शिकलें पाहिजे. म्हणजेच अहिंसा परमोधर्मः या सिध्दान्तावर आपण आलों. सत्य आणि प्रेम किंवा अहिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्य म्हणजे सर्वांचें हित, म्हणजेच सर्वात्मभाव, म्हणजेच अहिंसा, म्हणजेच प्रेम. महात्माजी म्हणतात Truth is God सत्य म्हणजेच परमेश्वर. त्याचीच दुसरी व्याख्या म्हणजे Love is God प्रेम म्हणजे परमेश्वर. तुमचें सत्य सर्वात्मभावनेशीं एकरूप नसेल तर तुम्ही स्वहितच बघाल. आणि स्वहित किंवा स्वार्थ आला म्हणजे सत्य कळणार कसें? सर्वहित म्हणजेच सत्य. सत्य कळायला सर्वात्मभाव जागा झाला पाहिजे. अहिंसेशिवाय, प्रेमाशिवाय तुम्हांला सत्य सांपडणार नाहीं.
आजच्या लोकशाहीच्या काळांत आपण बहुमतानुसार सत्यसंशोधन करीत असतों. बहुमत म्हणेल तें सत्य. समाजांत जर न्याय यायला हवा असेल तर लोकांमध्यें सत्य आणि न्याय यांची चाड उत्पन्न होईल, यांच्याविषयीं तीव्र जाणीव उत्पन्न होईल अशी काळजी घेतली पाहिजे. असा प्रचार आपण सतत करायला हवा. परंतु समाजांत अशी वृत्ति, न्यायाचे नि सत्याचे विचार पसरवायला अनुकूल परिस्थिति आहे का?
आजची आर्थिक रचना अन्यायी
आजची जगांतील, समाजांतील आर्थिक रचना ही सर्वात्म भावनेशीं विसंगत आहे. आज पुंजिपतींची लोकशाही आहे. भांडवलदारी लोकशाही आहे. अशी लोकशाही सर्वात्मभावनेच्या वृध्दीशीं, सर्वभूतहिताच्या विचाराशीं मूलतःच विसंगत आहे. भांडवलशाही लोकशाहींत स्वार्थ नि स्पर्धा यांच्यावर सारा व्यवहार चाललेला असतो. भांडवलवाले नि त्यांचे पुरस्कर्ते अर्थशास्त्रज्ञ प्रतिपादित असतात कीं, यांतच समाजाचें हित आहे, कल्याण आहे. परंतु जेथें स्वार्थ व स्पर्धा आहे तेथें सर्वात्मभावना, सर्व समाजाचें हित ही दृष्टि कशी राहणार? जो तो स्वतःच्या फायद्याकडे बघत असतो. स्पर्धेची कल्पना प्रथम जेव्हां निघाली तेव्हां अशी एक समजूत होती, अशी एक कल्पना गृहीत धरलेली होती कीं, अशा आर्थिक अवस्थेमुळें कोणालाच अमर्याद नफा मिळणार नाहीं. सर्वत्र स्पर्धा असली कीं त्या खेंचाखेचींत भाव मर्यादित राहतील आणि समाजाला शक्य तितका स्वस्त माल मिळत राहील. स्पर्धामय जगांत साहजिक आपोआपच एकमेकांवर नियंत्रण येत राहील. वाजवीपेक्षां अवास्तव फायदा कोणीच घेऊं शकणार नाहीं. अवास्तव संग्रहहि कोणी करणार नाहीं, करूं शकणार नाहीं. यासाठीं निराळीं नियंत्रणें, समाजानें वा सरकारनें घालण्याची आवश्यकता नाहीं. खुला व्यापार राहो. स्पर्धा राहो. म्हणजे सारा आर्थिक गाडा समाजहिताच्या पंथानेंच जाईल. स्पर्धाच एक प्रकारे नियंत्रण करील. मग दुसरीं कृत्रिम नियंत्रणें कशाला?