महात्मा गांधींचें दर्शन 11
चार प्रकारचे स्वातंत्र्य आम्ही देणार आहोत.'' १ गरजेपासून मुक्ति, २) भीतीपासून मुक्ति, ३) धार्मिक स्वातंत्र्य, ४) वाचिक स्वातंत्र्य (Freedom from want, २. Freedom from fear, ३. Freedom of Religion, ४. Freedom of speech ही चार स्वातंत्र्ये त्यांनी उद्धोषिली होती.) चर्चिल व रूझवेल्ट प्रत्यक्ष देवोत वा न देवोत. वाक्स्वातंत्र्य वगैरे येथे कितपत आहे, हिंदुस्थानात सर्वच गोष्टींची टंचाई व अन्नान्न दशा कशी आहे, जिकडे तिकडे भीतीचे राज्य कसे आहे, ते हिंदी जनतेच्या पदोपदी अनुभवास येतच आहे. येथे दहशतवाद निर्मून चर्चिलने आम्हांस भीतीपासून मुक्तता दिली आहे ! अन्नान्नदशा निर्मून गरजेपासून मुक्ति दिली आहे ! ते आजचे काही असो. जे रामराज्य आपणांस निर्मावयाचे आहे तेथे प्रत्येकास भरपूर अन्नवस्त्र असेल. रहायला घर असेल. विश्रांति असेल. ज्या समाजांत जीवनाची शाश्वती नाही त्या समाजांत काय राम? त्या समाजांतील स्वातंत्र्याला काय अर्थ? त्या रामराज्यांत अहिंसेने सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. त्या रामराज्यांत अन्नान्नदशा असता कामा नये. नुसती कोरडी भाकरीच नव्हे तर महात्माजी दूध लोणी प्रत्येकास मिळाली पाहिजेत असे म्हणतात. कारण त्या आवश्यक वस्तु आहेत. आजच्या राजवटीत दूध तूप शब्दच उरले. दूध म्हणजे काय असा प्रश्न विचारण्याची आज पाळी आली आहे. रामराज्यांत जर असे हे चित्र निर्मावयाचे असेल तर ते कशाने साधेल? सर्वांची आर्थिक दतात मिटावी म्हणून काय करावे लागेल? आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी समाजरचनेचा प्रश्नहि हाती घ्यावा लागेल. सामाजिक रचना रामराज्यांत कशी आसावी? महात्माजी लिहितात, सर्व जमीन परमेश्वराची आहे. मानवाने तुकडे केले. सीमा, चतुःसीमा घालून बलवंतांनी जमीनीचे भाग बळकावले.''महात्माजींनी जमीन गोपाळाची असे शब्द वापरले आहेत. गोपाळ म्हणजे परमेश्वर; गोपाळ म्हणजे शेतकरी. दोन्ही अर्थ आहेत. ही जमीन ईश्वराची आहे. आणि जो कसतो, मशागत करतो, श्रमतो, त्याची आहे. जमीन परकीयसत्तेची नाही. मूठभर जमीनदारांची नाही. ती जमीन श्रमणाऱ्यांची आहे. परंतु आज काय दिसते? ती जमीन आज जनतेच्या हाती नाही. का नाही? आपण धर्माप्रमाणे वागलो नाही म्हणून. तर मग हे काम कसे करायचे? रशियाने हे कार्य केले आहे. परंतु महात्माजी म्हणतात त्याहिपेक्षा चांगल्या रीतीने आपण ही गोष्ट करू. आपण सारे अहिंसेने करणार. आपण जर चरका घेऊ, त्यातील सर्व अर्थ लक्षात घेऊ तर हे होईल. केवळ जमीनच नव्हे तर सारीच संपत्ति जो श्रम करतो, त्याची आहे. परंतु आज काम करणारे, श्रमणारे संपत्तीपासून दूर आहेत. ज्या कारखान्यांत ते काम करतात, ज्या शेतीत ते राबतात, ती सारी उत्पादन-साधने वास्तविक त्यांची आहेत. जो श्रम करतो त्याची जमीन, त्याला मालमत्ता, असे तत्त्व उद्या रामराज्यांत घालावे लागेल, मानावे लागेल. फक्त हे सारे अहिंसेने करावयाचे. अहिंसेने स्वराज्याचे चारी कोपरे उभारावयाचे. अर्थकारण, राजकारण, समाजकारण व धर्मकारण या सर्वांत अहिंसा खेळवावयाची. असे रामराज्य पुन्हा एकाच देशांत करून भागणारणांतहि अहिंसा नेऊन तेथेहि न्यायाची म्हणजेच सत्याची स्थापना करू. अशाप्रकारे स्वराज्याच्या चौरसाचे जे चार कोन, ते चारी अहिंसामय होतील, तेव्हाच तरणोपाय आहे. चौरसाचे सारे कोन सारखे हवेत. प्रत्येक कोन ९० अंशांचा हवा. एक कोन बिघडला तरी चौरस सदोष होईल. तो चौरसच होणार नाही. त्याप्रमाणे राजकारण, अर्थकारण, समाजकारण व धर्मकारण या चारी क्षेत्रांत अहिंसा भरून राहील तरच सर्वत्र सत्याचे दर्शन होऊ लागेल. तरच पूर्णत्वाचा शोध करायला वाव मिळेल. तरच त्या परमोच्च विकासाकडे, नैतिक नि आध्यात्मिक श्रेष्ठतेकडे आपणांस जाता येईल.