महात्मा गांधींचें दर्शन 45
उपाय कोणता तर?
समाजांत नैतिक बुध्दि जागृत करणें हा शेवटी मूलगामी उपाय आहे. मनुष्य सुधारायला हवा. त्याची मानवता जागृत करायला हवी. बाह्यांगी सामाजिक सुधारणा अपुरी आहे. अंतरंगसुधारणेचें सर्वांत महत्त्वाचें कार्य आहे. हें कोणी करायचें? राजे लोकांनीं कायद्याच्या बळावर, शस्त्रांच्या बळावर अन्यायांना पायबंद घातला तरी त्या गोष्टी अपुर्या पडतात. सरकारी कायदे अपुरे. आपल्याकडे प्राचीनकाळीं यतिवर्गाचें हें काम असे. यतिलोक, निःस्वार्थी लोक समाजांत नैतिक बुध्दि रहावी म्हणून खटपट करीत. हे यतिलोकहि जर सत्ता नि संपत्ति घेतील तर न्यायासाठीं ते हिंसा करतील. युरोपांतील पोपांनीं तो प्रयोग केला. पोपच पापाचारी नि व्यसनी, विलासी बनले. म्हणून महात्माजी म्हणतात कीं, सत्ता नि संपत्ति यांच्यापासून स्वेच्छेनें दूर राहून समाजांत नैतिक बुध्दि वाढेल असे केलें पाहिजे. यति झाले तरी तेही जर सत्ता हातीं घेतील तर अधःपातित होतील. गीता म्हणते,
यस्य नाहंकृतो भावो बुध्दिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमान् लोकान् नायं हन्ति न बध्यते ।
जो निरहंकारी आहे, त्यानें हिंसा केली तरी ती हिंसा नाहीं. महात्मा गांधी म्हणतात, ही काल्पनिक अवस्था आहे. ते या श्लोकाला अर्थवादरूप मानतात. अनासक्तीची ही अत्यन्त स्तुति आहे. हिंसा करूनहि ती ज्याची हिंसा होत नाहीं असा सर्व जगाची केवळ माता होणारा महात्मा कोठून आणायचा? सर्वसामान्य जागंत असा कोणी नाहीं. काल्पनिक वाद काय कामाचे? आतांपर्यंत जगांत न्यायाची प्रस्थापना करणारे जे झाले त्यांनीं सत्तेच्या, लष्कराच्या, पोलिसांच्या साहाय्यानेंच तें कर्म केलें. यतीनें हातीं सत्ता घेऊं नये. मग न्याय कोणीं स्थापायचा? महात्मा गांधी ज्याला रामराज्य म्हणतात, त्या रामराज्यांत का पोलीस, सैन्य असणार नाहीं? हेहीं एक कल्पनास्वप्न आहे. व्यवहारांत उतरल्याशिवाय हीं स्वप्नें काय कामाचीं? हिंसावादी म्हणतात, आम्ही हिंसा केलीच तर न्यायार्थ करूं. तुमचा कल्पनावाद आम्हांला नको. महात्माजी त्यांना म्हणतात, ''हिंसेनें न्याय स्थापूं पाहणारे तुम्हीच हजारों वर्षें या स्वप्नांत राहिलांत. हातांत शस्त्र घेऊन अधःपात थांबविता येत नाहीं.'' लोभमूलानि पापानि. मानवी मनांतील लोभ दूर व्हायला हवा. तो शस्त्रास्त्रांनीं मूलतः दूर करतां येणार नाहीं. लोभाचें उन्मूलन करायला हवें. समाजांत नैतिक संकल्पशक्ति प्रखरतेनें जागृत करायला हवी. त्यासाठीं ज्याच्या जीवनांत सर्वात्मभाव आहे, जे निरहंकारी, निरपेक्ष आहेत असे आदर्श समाजांत हवेत. भाराभर बडबडीपेक्षां असे आदर्श अधिक कार्य करूं शकतात. जो स्वतः उन्नत आहे तोच दुसर्यांची उन्नति करूं शकेल. दुसरे चांगले वागतील तर मी चांगला वागेन, नाहीं तर ठोशास ठोसा देईन असें म्हणणारा हा नको. कोणत्याहि परिस्थितींत जो निरपेक्ष नीतीचें पालन करतो असा धगधगीत महात्मा समाजासमोर हवा. त्याची नीति दुसर्याच्या वर्तनावर अवलंबून असणारी सापेक्ष नीति नाही; प्रतियोगी नीति नाहीं. पूर्णत्वानें नीतीचें आचरण करणाराच समाजांत नैतिक इच्छाशक्ति निर्मूं शकेल. समाजांतील सारींच माणसें जर नीतीनें वागूं लागतील तर मग बाह्य बंधनांची आवश्यकताच उरणार नाहीं.