Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी

प्रश्न --आम्ही जगतो परंतु का जगतो ते आम्हाला माहीत नाही .जीवनाचा अर्थ व हेतू तुम्ही आम्हाला सांगू शकाल काय ?

उत्तर--हा प्रश्न तुम्ही का विचारीत आहात .जीवनाचा अर्थ मी  सांगावा, जीवनाचा हेतू मी सांगावा, असे तुम्ही का सांगता आहात ? जीवनाला काही अर्थ काही हेतू असतो काय ?जगणे हाच हेतू ,जगणे हाच अर्थ नाही काय?आपल्याला आणखी अर्थ का हवा आहे ?कारण तुम्ही आपल्या जीवनात असमाधानी आहात .तुम्हाला जीवन पोकळ बुडबुडा वाटत आहे.ते कंटाळवाणे आहे. ते रखडत खरडत फरपटत जाणारे आहे  .त्याच त्याच गोष्टी पुनः  पुनः करून आपण कंटाळलेले आहोत .म्हणून आपल्याला काही तरी नवे पाहिजे आहे .आपले दैनंदिन जीवन मद्दड जुनाट कंटाळवाणे पुनरुक्तीमय चक्राकार अर्थहीन असत्य  मूर्खपणाचे आहे.त्याला तुम्ही पूर्णपणे कंटाळून गेलेले आहात .त्यामुळे तुम्हाला जीवनाला काहीतरी हेतू अर्थपूर्णता असली पाहिजे असे वाटते .  तुम्ही जीवनाला काही तरी अर्थपूर्णता असली पाहिजे असे मानता . म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारता आहा असे मला वाटते.जो मनुष्य अत्यंत संपन्न आयुष्य जगत आहे. जो जे जसे आहे तसे ते पाहात आहे.जो जे आहे त्यात समाधानी आहे .जो स्पष्ट आहे. जो गोंधळलेला नाही .जो म्हणूनच जीवनाचा अर्थ काय ते विचारत नाही .अशा इसमाला केवळ जगणे हाच आरंभ व शेवट असतो .जीवन पोकळ असल्यामुळे आपल्याला जीवनाचा हेतू शोधून काढावयाचा आहे .मग त्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत .जीवनाचा हेतू शोधणे म्हणजे केवळ बौद्धिक करामत व कल्पनांचे इमले रचणे होय .ते अर्थातच सत्य नाही. जीवनाचा हेतू मूर्ख मद्दड मनाकडून, रिकाम्या हृदयाकडून ,शोधला जातो.तेव्हा साहजिकच तो हेतूही तितकाच मद्दड मूर्ख आचरट व पोकळ असतो .तुमचा हेतू पैशाने व त्यापासून मिळणाऱ्या अनंत  भौतिक गोष्टींनी जीवन संपन्न करण्याचा नाही, तर अंतर्यामी जीवन संपन्न बनवणे हा आहे . यात गूढ किंवा गुप्त असे काही नाही .जेव्हा तुम्ही जीवनाचा हेतू आनंदी बनणे  हा आहे, किंवा जीवनाचा हेतू परमेश्वराचा शोध घेणे हा आहे असे म्हणता,तेव्हा प्रत्यक्षात ही जीवनापासून काढलेली पळवाट आहे .तुमचा परमेश्वर ज्ञात आहे .जी वस्तू तुम्हाला माहित आहे तिकडेच तुम्ही जाऊ शकता . जर तुम्ही एखाद्या परमेश्वरापर्यंत जिना बांधला तर तुम्ही जिथे पोचाल तिथे नक्की परमेश्वर नसणार.सत्य जगण्यातून कळू शकेल, पळवाटानी नाही .जेव्हा तुम्ही जीवनहेतूचा शोध घेता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जीवनापासून दूर पळत असता.जीवन म्हणजे काय हे समजून घेण्याचे टाळत असता.जीवन म्हणजेच संबंधरूपता .जीवन म्हणजेच संबंध रूपतेत कर्म होय .मला ही संबंधमयता कळत नाही किंवा ही संबंधरूपता गोंधळलेली आहे .म्हणून मी संपूर्ण अर्थासाठी धडपड सुरू करतो .आपले जीवन इतके पोकळ का बरे आहे ?आपण इतके एकाकी व खचलेले का बरे आहोत?कारण आपण स्वतःमध्ये कधीही डोकावलो नाहीं.आपण कधीही स्वतःला समजून घेतले नाही.आपण जे ओळखतो ते हे सर्व जीवन , आपण समजून घेतले पाहिजे.ही गोष्ट  आपण स्वतःशी कधीही कबूल करीत नाही .स्वतःपासून दूर पळून जाणे आपल्याला जास्त पसंत पडते. मग आपण संबंधरूपतेपासून दूर असा जीवनाचा शोध घेण्याला सुरुवात करतो . जर आपण आपल्या क्रिया, म्हणजे लोक मालमत्ता घरदार बायकामुले श्रद्धा कल्पना यांच्याशी असलेली संबंरूपता समजून घेण्याला सुरुवात केली, तर ही संबंधमयताच योग्य गोड फळे आणते, असे आपल्याला निश्चितपणे आढळून येईल, याची मी खात्री देतो .तुम्हाला तपास करावा लागत नाही .तुम्हाला शोध घ्यावा लागत नाही.तुम्ही जे करता ते सर्व प्रेमाचा तपास करण्यासारखे आहे .शोध करुन तुम्हाला कधी प्रेम मिळेल क़ाय ?प्रेमाची कधी मशागत करता येईल काय ?प्रेम अंगी बाणवता येईल काय?अर्थातच नाही .तुम्हाला संबंधरूपतेतच प्रेम आढळून येईल .संबंधमयतेच्या बाहेर कुठेही तुम्हाला प्रेम मिळणार नाही.आपल्या जवळ प्रेम नाही म्हणून आपण जीवनाचा हेतू काय असे विचारतो .जीवनाला काही तरी हेतू असला पाहिजे असे आपल्याला वाटते .जेव्हा प्रेम असेल तेव्हा तोच आरंभ व शेवट असेल.जेव्हा ते तेच आहे असे असेल , असा आपल्याला अनुभव येईल, तेव्हा परमेश्वराचा शोध घेतला जाणार नाही.प्रेम हाच परमेश्वर होय .

आपली मने तांत्रिक ज्ञानाने समजूतीने भोळसटपणाने भरलेली आहेत म्हणून आपल्याला जीवन पोकळ व निरर्थक वाटते .म्हणूनच आपण स्वतः बाहेर शोध घेण्याला सुरुवात करतो .हेतू पहाण्याला सुरुवात करतो .आपल्याला स्वतःच्याच दरवाजातून गेले पाहिजे. स्वतःचाच संपूर्ण शोध त्रयस्थपणे घेतला पाहिजे. प्रकट रित्या व गुप्तरित्या आपण वस्तू जशा आहेत तशा पाहण्याचे त्यांना तोंड देण्याचे टाळतो. म्हणूनच आपल्याला परमेश्वराने स्वतःच्या पलीकडे असलेला दरवाजा उघडावा असे वाटते .जीवनच्या हेतूबद्दल प्रश्न जे प्रेम करत नाहीत त्यांच्याकडून  विचारला जातो .प्रेम कर्मातच आढळून येईल .तीच संबंध मयता.

++++++++++++++++++

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत