Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न १०: युद्धाविषयी

प्रश्न --चालू राजकीय अव्यवस्था अंदाधुंदी त्यामुळे जगावर येऊ घातलेले महान संकट आपण कसे काय दूर करावे?युद्ध टाळण्यासाठी व्यक्तीला व्यक्ती म्हणून काही करता येणे शक्य आहे काय ?

उत्तर---आपल्या दैनंदिन जीवनाचे, युद्ध हे ,नयन दिपवणारे रक्तलांछित असे  प्रतिबिंब आहे .ते तसे नाही काय? .आपल्या आंतरिक स्थितीचा ,युद्ध हा बाह्य पडसाद आहे. आपल्या दैनंदिन क्रियांचा तो एक विस्तार आहे .तो जास्त रक्तलांछित, जास्त नयन दिपविणारा ,व जास्त विनाशकारक आहे .आपल्या वैयक्तिक  क्रियांचा तो सामुदायिक परिणाम आहे .आपण सगळे तुम्ही व मी या येऊ घातलेल्या युद्धाला जबाबदार आहोत.ते थांबविण्यासाठी आपल्याला काही करता येणे शक्य आहे क़ाय?आपल्या डोक्यावर टांगलेली ही युद्धाची तलवार तुम्हाला व मला दूर करता येणे अशक्य आहे.मुख्यत: मानसिक पातळीवर हे युद्ध चालू आहे.ते चालू होण्याच्या मार्गावर आहे .त्याला चालना मिळालेली आहे. हालचाल सुरू झालेली आहे .प्रश्न असंख्य आहेत. ते फार मोठे आहेत.त्याना सुरुवात झाली आहे.ज्या अर्थी मानसिक  हालचाल सुरू झाली आहे, त्या अर्थी आता युद्ध थांबविता येणे अशक्य आहे.तुम्ही व मी घर जळत आहे हे पाहून ते का जळत आहे त्याची कारणे समजून घेऊ शकतो .आपण या जळत्या घरापासून दूर जाऊ शकतो.अज्वालाग्रही अशा वस्तूंपासून नवीन ठिकाणी दुसरे घर आपण बांधू शकतो. अापल्याला एवढेच करता येणे शक्य आहे .तुम्ही व मी युद्ध का होतात, त्याचा विचार जरूर करू शकतो.युद्ध खरोखरच थांबावे असे आपल्याला वाटत असेल, तर आपण युद्धाचे कारण अशा स्वतःला, बदलण्याला सुरुवात करू शकतो .

काही वर्षांपूर्वी युद्ध(दुसरे महायुद्ध ) चालू असताना एक अमेरिकन बाई मला भेटण्यासाठी आली होती.तिचा एक मुलगा इटलीमध्ये युद्धात मारला गेला होता .तिचा दुसरा मुलगा सोळा वर्षांचा होता. त्याने युद्धात भाग घेऊ नये असे तिला वाटत होते.तिला आपल्या मुलाला वाचवायचे होते. या गोष्टीवर आम्ही चर्चा केली.मी तिला असे सुचविले कि जर तिला आपल्या मुलाला वाचवायचे असेल तर तिने प्रथम अमेरिकन असण्याचे थांबविले  पाहिजे.तिने अधाशीपणा  सोडून दिला पाहिजे.तिने संपत्ती सत्ता व सामर्थ्य संपादन करण्याचे सोडून दिले पाहिजे. तिने नैतिकदृष्ट्या  अत्यंत साधे असले पाहिजे.केवळ कपडे व  बाह्य  वस्तू यातच,तिने साधे  असले पाहिजे एवढेच नव्हे ,तर विचार भावना व संबंधमयता यातही, तिने अत्यंत साधे असले पाहिजे.  ती म्हणाली "हे फार होत आहे. तुम्ही फार गोष्टी करण्यासाठी सांगत आहात . मी हे करू शकत नाही.कारण परिस्थिती इतकी प्रचंड सामर्थ्यशाली आहे कि मला स्वत:ला बदलता येणे अशक्य आहे"आणि म्हणूनच स्वतःच्या मुलाच्या मृत्यूला ती जबाबदार होती.

परिस्थिती आपल्याला ताब्यात ठेवणे शक्य आहे .कारण शेवटी ही परिस्थिती आपण निर्माण केली आहे.तुमच्या व माझ्या  संबंधमयतेतून  समाज निर्मिती झाली आहे .जर आपण संबंधमयेतेत बदललो तर समाजही बदलेल .अंतर्यामी लाचलुचपतखोर राहून,सामर्थ्य सत्ता व मान यासाठी अंतर्यामी सतत प्रयत्न करीत राहून, व बाह्यवर्ती शिस्त,नियमन,कायदे, यांच्यावर समाज बदलासाठी अवलंबून राहून ,आपण समाज बदलू शकणार नाही. शास्त्रीय पद्धतीने व अत्यंत काळजीपूर्वक असा बनवलेला हा डोलारा ,शेवटी अंतर्यामी पेटत असलेल्या अग्नीकडून, भस्मसात केला जाईल .शेवटी जे आत आहे त्याचा बाहेर पगडा बसल्याशिवाय रहात नाही.

धार्मिक आर्थिक व राजकीय युद्धाचे कारण काय ?अर्थात एखादी तत्वप्रणाली, एखादी कल्पना ,एखादे तत्त्व , या वरील श्रद्धा होय .जर आपल्या जवळ श्रद्धा नसेल, परंतु प्रेम ,समंजसपणा, व शुभेच्छा, असतील तर युद्ध होणार नाही.परंतु दुर्दैवाने आपण श्रद्धा,तत्त्वे,प्रणाली, व कल्पना ,यावरच पुष्ट झालो आहोत.यावर आपल्याला वाढवण्यात आले आहे. हेच आपले अन्न आहे . यातून असमाधानाची उत्पत्ती होणे अपरिहार्य आहे .चालू संकट हे अपवादात्मक वैशिष्ट्यपूर्ण व न भूतो अशा प्रकारचे आहे .तेव्हा आपण मानवी जीव म्हणून, आपल्या दैनंदिन क्रियांचा परिणाम असा, सतत विरोध व  युद्धे यांचा मार्ग नाइलाजाने स्वीकारला पाहिजे, किंवा त्या सगळ्याकडे युद्धाची कारणे पाहून पाठ फिरविली पाहिजे.

सत्ता सामर्थ्य मान पैसा यांची वासना ,त्याप्रमाणे राष्ट्रीयत्वाचा रोग, एखाद्या निशाणाची पूजा, संघटित धर्म रुपी रोग, एखाद्या प्रणालीची पूजा, या सर्वांमुळे युद्ध येते. युद्धाची ही कारणे आहेत .जर तुम्ही व्यक्ती म्हणून एखाद्या संघटित धर्माचे असाल, जर तुम्ही सामर्थ्याचे भुकेलेले असाल, जर तुम्ही मत्सरी असाल ,तर तुम्ही असा एक समाज निर्माण करणे अपरिहार्य आहे, कि ज्याच्यामुळे फक्त विनाशच येऊ शकतो.तेव्हा विनाशाची जबाबदारी तुमच्यावर आहे.आपल्यावर आहे.पुढार्‍यांवर नव्हे. तथाकथित राजकारणी कुशल व्यक्तींवर नव्हे.ही जबाबदारी तुमची व माझी आहे. पण आपण हे ओळखलेले नाही.आपण वस्तु स्थितीबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ आहोत असे दिसते .स्वक्रियामहत्त्व, स्वक्रियापरिणाम, स्वक्रियाजबाबदारी,जर आपल्याला खरोखरच समजेल तर किती तात्काळ आपण या युद्धांना, क्लेशाना, आणि विनाशाला ,रामराम ठोकू शकू.आपल्याला तीनदा जेवण मिळत आहे .आपल्याला काम धंदा आहे. आपल्या जवळ छोटी किंवा मोठी संपत्ती आहे.मग आपण म्हणतो कि "कृपा करून आम्हाला एकटे सोडा .आमच्यात ढवळाढवळ करू नका . आम्हाला त्रास देऊ नका ." जो जो आपण जास्त उच्च पातळीवर जातो, तो तो आपल्याला जास्त सुरक्षितता, सातत्य व शांतता पाहिजे असते.आपल्याला एकटे सोडावे असे वाटत असते .जे काही आहे ते तसेच स्थिर करून ठेवावे असे आपल्याला वाटते.परंतु जे आहे ते त्याच स्थितीत रक्षण करणे  अशक्यच आहे .खरोखरच काही रक्षण करण्यासारखे आहे काय ?प्रत्येक गोष्टीचे विघटन होत असते,परंतु आपल्याला त्या गोष्टीला तोंड द्यायचे नसते.तुम्ही व मी या युद्धाला जबाबदार आहोत, हे समजून घेण्याला, लक्ष्यात घेण्याला, अापण नाखूश असतो  .तुम्ही व मी शांतीवर गप्पा मारू शकतो.आपण सभा व परिषदा भरवू शकतो .आपण एखाद्या टेबलाभोवती बसून गंभीरपणे चर्चा करू शकतो .परंतु अंतर्यामी  मानसिकदृष्टय़ा आपल्याला सत्ता सामर्थ्य मान पाहिजे .आपण अधाशीपणाकडे वळविले व ढकलले जात आहोत.आपण कट करतो.अापण राष्ट्राभिमानी आहोत.आपण आपल्या श्रद्धा कल्पना तत्वे व प्रणाली यांनी बांधलेले आहोत .आणि या सगळ्यासाठी वेळप्रसंगी  एकमेकांना ठार मारण्याची, प्राण घेण्याची,  व प्राण देण्याची, आपली तयारी आहे .अशा मनुष्यांकडून तुमच्या व माझ्याकडून जगात शांती नांदणे शक्य आहे काय?शांतता असण्यासाठी प्रथम आपण शांत जगले पाहिजे .आपण शांत असले पाहिजे .शांततेने जगणे म्हणजे विरोध न करणे .शांती हे ध्येय नाही. ध्येय  ही एक पळवाट आहे. जे आहे त्याला ते टाळणे आहे . जे आहे त्याला ते विरोधी आहे .असे प्रामाणिकपणे मला वाटते .त्यामुळे जे आहे त्यावरील प्रत्यक्ष क्रियेला प्रतिबंध केला जातो .शांतीसाठी अपण प्रेम केले पाहिजे .आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याला अापण सुरुवात करता कामा नये .वस्तुस्थिती जशी आहे तशी आपण पाहिली पाहिजे. त्यावर प्रत्यक्ष क्रिया केली पाहिजे .त्यात मूलगामी बदल घडवून आणला पाहिजे .जोपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकजण मानसिक सुरक्षितता शोधत आहे,तोपर्यंत शारीरिक सुरक्षितता,अन्न वस्त्र व निवारा नाश पावणे अपरिहार्य आहे .असत्य ,अस्तित्वात नसणारी,अशी मानसिक  सुरक्षितता अापण शोधीत आहोत .चिठ्ठ्या,नावे, प्रणाली, कल्पना, तत्वे, ध्येये, आदर्श, मान ,सामर्थ्य, पैसा यांमधून आपण ती शोधण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत .या सर्वामुळे शारीरिक सुरक्षिततेचा नाश केला जात आहे .ही उघड उघड वस्तुस्थिती आहे मात्र ती आपण डोळे उघडे ठेवून पाहिली पाहिजे .

जगात शांती नांदण्यासाठी जगात युद्धे थांबविण्यासाठी व्यक्तीमध्ये  तुमच्यात व माझ्यात क्रांती होणे आवश्यक आहे .आंतरिक क्रांतीशिवाय आर्थिक क्रांतीला शून्य महत्त्व आहे .मत्सर द्वेष अास्तुटलेलेपणा संग्रह प्रवृत्ती या मानसिक स्थितीमुळे आर्थिक दुष्परिणाम निर्माण झाले आहेत . त्यातून दारिद्र्य  क्लेश निर्माण झाले आहेत .दुःख क्लेश युद्धे व भूक यांना पूर्णविराम देण्यासाठी, मानसिक क्रांती झाली पाहिजे .आपल्यापैकी फार थोड्या जणांची यासाठी तयारी आहे .अापण शांततेवर चर्चा करू .आपण शांततेवर परिषदा भरवू.कायदे तयार करू. संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करू.वगैरे वगैरे अनेक गोष्टी व आणखी अनेक संघटना स्थापन करू. तरीही आपल्याला शांती प्राप्त होणार नाही.कारण आपण आपली सत्ता, आपला अधिकार, आपली प्रतिष्ठा, आपला मान,आपला पैसा, आपली मालमत्ता, व आपले मूर्खपणाने जगत असलेले जीवन,टाकून द्यायला तयार होणार नाही. दुसर्‍यावर अवलंबून राहणे हे पूर्णपणे  निष्फळ आहे .दुसरे आपल्याला शांती देऊ शकत नाहीत .कोणतेही आणि कितीही सैन्य ,कोणताही देश, कोणताही पुढारी, कोणतीही शासन संस्था,तुम्हाला शांती देऊ शकणार नाहीत .अंतर्यामी होणार्‍या  बदलातून जेव्हा योग्य बाह्य क्रिया निर्माण होईल तेव्हाच शांती निर्माण होईल .आंतरिक बदल म्हणजे एकांतवास नव्हे .बाह्य क्रियांपासून स्वतःला सोडवून घेणे, त्या टाळणे, म्हणजे आंतरिक बदल नव्हे.उलट योग्य विचार असेल तेव्हाच योग्य क्रिया होईल .जोपर्यंत स्वज्ञान नाही तोपर्यंत योग्य विचार नाही.स्वसमजाविना शांती अशक्य आहे .

बाह्य युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी प्रथम आपण आंतरिक युद्धाला पूर्णविराम दिला पाहिजे .तुमच्या पैकी बरेचजण मान तुकवतील आणि म्हणतील की हो "हे मला मान्य आहे".बाहेर गेल्यावर मात्र,जे गेले पाच पंचवीस वर्षे करीत आले आहेत,तेच बरोबर करीत राहातील .तुमची मान्यता ही फक्त शाब्दिक आहे . त्याला काहीही महत्व नाही. जगातील युद्धे क्लेश  ही तुमच्या शिळोप्याच्या मान्यतेने थांबण्यासारखी नाहीत .जेव्हा तुम्हाला धोका अंतरंगातून खरोखरच समजेल,जेव्हा तुम्ही स्वतःवरील जबाबदारी ओळखाल, जेव्हा तुम्ही हे दुसर्‍या  कोणीतरी करावे म्हणुन त्यावर अवलंबून राहणार नाही, तेव्हाच जगातील युद्धे व क्लेश यांना पूर्णविराम मिळेल .जर तुम्हाला क्लेश समज अाली, जर तुम्हाला तात्काळ क्रियेची निकड लक्षात आली, जर तुम्ही तात्काळ क्रिया ,उद्यावर ढकलली नाही, तरच तुम्ही स्वतःला बदलाल.जेव्हा तुम्ही स्वतः शांतीपूर्ण आहात, जेव्हा तुम्ही शेजार्‍यांबरोबर शांतीमय असाल, तेव्हाच शांती येईल .

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत