प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी
प्रश्न ---लैंगिक भूक ही एक न टाळता येण्यासारखी शारीरिक व मानसिक गरज आहे .वैयक्तिक जीवनात निदान चालू पिढीत तरी त्यामुळे फार गोंधळ व अव्यवस्था निर्माण झाली आहे.सर्व अव्यवस्थेचे लैंगिक भूक हे मूळ कारण आहे काय ?या समस्येशी अापण कसा मुकाबला करावा ?
उत्तर--ज्याला आपण स्पर्श करतो त्याची आपण समस्या का बनवतो?अापण परमेश्वर ही एक समस्या करून ठेवली आहे .प्रेम हीही आपण समस्या केली आहे .संबंधमयता हीही आपल्याला समस्या वाटते. जगणे ही आपली समस्या आहेच. आता आपण लैंगिक भूक हीही समस्या केली आहे.आपण ज्याला ज्याला स्पर्श करतो ती ती समस्या अापण का बरे करतो ?जे जे आपण करतो ते तेआपल्याला भयानक गोष्ट का वाटते ?आपण क्लेश का भोगतो ?लैंगिक भूक ही समस्या कां आहे ?समस्यामय जीवन आपण का जगत असतो ?या सर्वाला आपण पूर्णविराम का देत नाही?दिवसा मागून दिवस महिन्या मागून महिने वर्षामागून वर्षे समस्या वाहून नेण्याऐवजी अापण त्या समस्यांचा जिथल्या तिथे अंत कां करीत नाहीं ?लैंगिक भूक हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे यात शंका नाही .परंतु त्याहून मूलगामी असे जीवन हीच अापण समस्या कां बनवतो ?हा खरा प्रश्न आहे असे मला वाटते .काम करणे, पैसे मिळविणे ,विचार करणे, संवेदना उपभोगणे, संभोग अनुभवणे, हा सर्व आपल्या जीविताचा धंदा, आपल्या सर्व अस्तित्वाचा धंदा, तुम्हाला माहिती आहेच. ही सर्व समस्या कां आहे ?एका विशिष्ट दृष्टिकोनातून एका विशिष्ट बिंदूकडे लक्ष ठेवून आपण विचार करतो हेच या समस्येचे मूळ कारण नाही काय ?आपण नेहमी एका केंद्राकडून परीघाकडे विचार करीत असतो.आपल्यापैकी बऱ्याच जणांना परीघ हे केंद्र असते आणि म्हणून आपण उथळपणाने विचार करीत असतो .ज्याला ज्याला आपण स्पर्श करतो ते सर्व उथळ असते .जीवन हे उथळ नाही .त्यासाठी जीवन हे संपूर्णपणे जगणे आवश्यक असते.आपण अत्यंत उथळ जीवन व्यतीत करीत असल्यामुळे आपण फक्त उथळ क्रियाच जाणतो .आपण परीघावर जे जे काही करतो त्यामुळे समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे .तूर्त तरी हेच आपले जीवन आहे .या सर्व उथळ समस्यांसह जीवन जगण्यात आपल्याला समाधान वाटते .आपण परीघावर आहोत उथळ आहोत तोपर्यंतच समस्या असतात.हा परीघ म्हणजे मी व त्याच्या संवेदना होत .या संवेदना जड वस्तुनिष्ठ असतात किंवा सूक्ष्म कल्पनानिष्ठ असतात.या संवेदना विश्वापासून जगापासून देशापासून किंवा मनाने बनविलेल्या आणखी कोणत्याही गोष्टी पासून मिळविता येतात .
जोपर्यंत आपण मनाच्या क्षेत्रात वावरत आहोत तोपर्यंत गुंतागुंत असणे अपरिहार्य आहे .तोपर्यंत समस्याही असणारच.तूर्त तरी फक्त एवढेच आपल्याला माहीत आहे .मन म्हणजे संवेदना,संवेदना म्हणजे संग्रहित प्रतिक्रिया व संवेदना म्हणजेच मन .ते ज्याला ज्याला स्पर्श करते त्यामुळे गोंधळ दुःख विरोध व अंतरहित समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे .दिवस व रात्र सुप्त व प्रकट काम करणारे हे मन आपल्या सर्व समस्यांचे कारण आहे .मन ही सर्वात अत्यंत उथळ वस्तू आहे .आपण आपल्या कित्येक पिढ्या व आपले संपूर्ण आयुष्य या मनाची मशागत करण्यात, त्याला जास्त जास्त हुशार चाणाक्ष बनवण्यात, जास्त जास्त गूढ बनविण्यात, जास्त जास्त धूर्त बनविण्यात, जास्त जास्त अप्रामाणिक व वक्र बनविण्यात,व्यतीत केले आहे .या सर्वांचे उघड उघड प्रतिबिंब कोणालाही आपल्या दैनंदिन जीवनात दिसण्यासारखे आहे.आपल्या मनाचा गुणधर्मच मुळी अप्रामाणिक,वक्र, वस्तुस्थितीला प्रत्यक्ष तोंड देण्यास असमर्थ, असा आहे .ही वस्तू सर्व समस्या निर्माण करीत असते .ही वस्तू हीच मुळी समस्या आहे .
आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया .लैंगिक भूक ही एक समस्या आहे म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणावयाचे आहे ?क्रिया ही समस्या आहे की क्रिये बद्दलचा विचार ही समस्या आहे ?क्रिया ही नक्कीच समस्या नाही. भोजन ही ज्या प्रमाणात समस्या आहे त्याच प्रमाणात लैंगिक क्रिया ही समस्या आहे .परंतु जर तुम्ही भोजनाबद्दल किंवा आणखी एखाद्या गोष्टीबद्दल सबंध दिवस विचार करीत बसलात,कारण तुमच्या जवळ दुसरे काही विचार करण्यासारखे नाही, तर मात्र ती तुमची समस्या निश्चित बनते .तुम्ही त्याच्याबद्दल विचार कां करता ?वर म्हटल्याप्रमाणे लैंगिक क्रिया ही समस्या आहे कि लैंगिक क्रिया विचार ही समस्या आहे ?तुम्ही हा सर्व विचार मनोरा का रचता?चित्रपट ,वर्तमानपत्रे ,मासिके, कादंबऱ्या, लघुकथा, स्त्रिया पोशाख कसा करतात,यातील प्रत्येक गोष्ट तुमचा लैंगिक क्रिया विचार मनोरा उभारण्यास मदत करीत असतात .हा सर्व मनोरा मन कां उभारते? लैंगिक क्रिया बद्दल मन मुळात विचारच का करते ?तुमच्या जीवनात ही समस्या अत्यंत महत्त्वाची का बनली आहे ?मी विचारतो कां? जीवनात किती तरी गोष्टी तुम्हाला बोलावीत आहेत .त्या सगळ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे .तुम्ही सर्व लक्ष फक्त लैंगिक क्रियेकडे का देत आहात ?तुमची मने त्या गोष्टीने इतकी कां भरलेली आहेत ?हे सर्व असे आहे कारण ती शेवटची पळवाट आहे. स्वत:ला संपूर्ण विसरण्याचा तो एक मार्ग आहे .तो तसा नाही काय?निदान तूर्त तरी चालू परिस्थितीत तुम्ही त्याच क्षणी स्वतःला संपूर्ण विसरू शकता.स्वतःला संपूर्ण विसरण्याचा दुसरा कुठलाही मार्ग तुम्हाला माहित नाही .बाकी जीवनात तुमच्याकडून केली जाणारी प्रत्येक गोष्ट "मी" व "स्वतः" यावर सतत जोर देत असते.तुमचा उद्योग धंदा, तुमचा देव, तुमचा धर्म, तुमचे पुढारी, तुमच्या राजकीय व आर्थिक हालचाली, तुमच्या पळवाटा, तुमच्या सामाजिक क्रिया, तुमचे एक पक्ष धरणे व दुसरा नाकारणे, हे सर्व "मी"वर "स्वतः"वर जोर देत असते व अशा प्रकारे "मी"चे पुष्टीकरण तुष्टीकरण व दृढीकरण होत असते . म्हणजे अशी फक्त एकच क्रिया आहे कि जिथे "मी" वर जोर दिला जात नाही तर उलट"मी"संपूर्ण विसरला जातो. आणि म्हणूनच ती समस्या बनली आहे.काही क्षण का होईना पण तुम्ही स्वतःला संपूर्णपणे विसरुन जाता.सहाजिकच त्या क्षणांना चिकटून बसण्याचा तुम्ही प्रयत्न करता .कारण फक्त त्याच क्षणी तुम्ही आनंदी असता.बाकी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श करता ते ते दुःखाचे क्लेशांचे भीतीचे साधन होऊन बसते.त्यामुळे तुम्ही जिथे तुम्हाला स्वतःचा पूर्ण विसर पडतो त्या क्षणांना चिकटून बसता.या स्वविसरण्याच्या स्थितीला तुम्ही आनंद म्हणता .पण तुम्ही ज्या क्षणी त्याला चिकटून बसता त्याच वेळी ते क्षण पुन: भयंकर धास्ती पूर्ण व क्लेशमय बनतात .आता तुम्हाला त्यापासून स्वतंत्र व्हायचे असते .तुम्हाला त्या क्षणांचे गुलाम बनण्याची इच्छा नसते .आणि मग तुम्ही मनाच्या साह्याने पुन्हा मनातूनच,कारण त्याशिवाय तुमच्या जवळ दुसरे काही नाही, पावित्र्य ब्रह्मचर्य वगैरे गोष्टींचा शोध लावता .मग तुम्ही शिस्तीतून नियमनातून पवित्र राहण्याचा ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रयत्न करण्याला सुरुवात करता.वस्तुस्थितीपासून स्वतःला दूर करण्याची ही सर्व मनोसाधने आहेत .यातून पुनः "मी"वर विशिष्ट जोर दिला जातो. कारण हा "मी"आता काही तरी बनत असतो .अशाप्रकारे दुःख क्लेश प्रयत्न व संकटे यात तुम्ही पुनः सापडता व तुमची भ्रमंती सुरू होते .
जोपर्यंत समस्येबद्दल विचार करणारे मन तुम्हाला समजत नाही,तोपर्यंत लैंगिक क्रिया ही असामान्य कठीण व अत्यंत गुंतागुंतीपूर्ण अशी समस्या असते. क्रिया ही कधीही समस्या असूच शकत नाही .क्रिया विचार हा मात्र अवश्य समस्या निर्मिती करतो.या क्रियेचे संरक्षण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता .तुम्ही एक ढिले जीवन जगता किंवा पत्नीला वेश्येच्या स्थळावर आणून ठेवता .वरवर या सर्वाला प्रतिष्ठा प्राप्त करून देता .अशा प्रकारे जीवन व्यतीत करण्यात तुम्ही संतुष्ट आहात .मी माझी बायको माझा नवरा माझी मुलं माझी मालमत्ता माझी संपत्ती
माझी मोटार माझे यश हा सर्व "मी" व "माझे" याचा सांगाडा .ही संपूर्ण प्रक्रिया जेव्हा तुम्ही समजून घ्याल, व अशाप्रकारे समजुतीतून ती वितळवून टाकाल ,तेव्हाच तुमची समस्या सुटेल .तोपर्यंत लैंगिक समस्या म्हणून राहणारच.जोपर्यंत तुम्ही ध्येयवादी आहा, महत्त्वाकांक्षी आहा,महत्त्वाकांक्षा कोणतीही असो राजकीय धार्मिक किंवा आणखी कोणती त्याला महत्त्व शून्य आहे, तोपर्यंत लैंगिक समस्या राहणारच .जोपर्यंत तुम्ही विचार करणाऱ्यावर, अनुभव घेणाऱ्यावर ,भर देत आहात ,जोपर्यंत तुम्ही या "मी"च्या महत्त्वाकांक्षेला मग ती महत्त्वाकांक्षा वैयक्तिक, राष्ट्रीय, धार्मिक, पक्षीय,किंवा कुठल्याहि एखाद्या कल्पनेबद्दल असो, पुष्ट करीत आहात, जोपर्यंत ही स्वविस्तार प्रक्रिया आहे, तोपर्यंत लैंगिक समस्या राहणारच .
एका बाजूला तुम्ही "स्वतः"ला निर्माण करीत आहात, त्याला पुष्ट करीत आहात, दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वत:ला विसरण्याचा हरवण्याचा मग तो विसर ते हरवणे एक पळभर का असेना, प्रयत्न करीत आहात, या दोन गोष्टी एकत्र कशा काय नांदू शकतील .तुमचे जीवन हा एक प्रचंड विरोध आहे ."मी"वर दिलेला जोर व "मी"ला लैंगिक क्रियेमार्फत विसरण्याचा केलेला प्रयत्न, यांच्यामधील प्रचंड विरोध हे तुमचे जीवन आहे. हा तुमच्या जीवनातील प्रचंड विरोध ही तुमची समस्या आहे .लैंगिक क्रिया ही समस्या नाही .या विरोधातील दरी मनाने कधीही सांधली जाणार नाही .कारण मन हेच मुळात विरोध आहे .तुम्हाला दैनंदिन अस्तित्व प्रक्रिया जेव्हा समजेल तेव्हाच हा विरोध तुमच्या लक्षात येईल.चित्रपटाला जाणे, स्त्रियाना पडद्यावर पाहणे, विचारांना उत्तेजन मिळेल अशी पुस्तके वाचणे, अर्ध नग्न चित्रे असलेली मासिके पाहणे, स्त्रियांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन, भावनेने भरलेले डोळे तुमच्या नजरेला भिडणे, या सर्वामुळे मनाला "मी" वर जोर देण्याचे अनेक जवळचे व लांबचे मार्ग सापडतात .याच वेळेला तुम्ही दयाळू मृदू व प्रेमळ बनण्याचा प्रयत्न करीत असता.ही दोन्ही एकत्र राहणे व असणे अशक्य आहे.अध्यात्मिक किंवा इतर कुठल्याही दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला मनुष्य समस्या रहित असणे अशक्य आहे.कारण जेव्हा "मी"हरपतो "मी" अस्तित्वात नसतो तेव्हा समस्या अस्तित्वात नसतात.मी नष्ट होणे "मी" अस्तित्वात नसणे ही इच्छेतून अस्तित्वात येणारी गोष्ट नाही. स्वहरपणे ही प्रतिक्रिया नाही.जेव्हा मन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते,तेव्हा लैंगिक क्रिया विचार ही एक प्रतिक्रिया बनते .त्यामुळे समस्या जास्तच बिकट गुंतागुंतीची गोंधळपूर्ण क्लेशमय व त्रासदायक बनते.क्रिया ही समस्या नाहीं .परंतु मन ही मात्र समस्या आहे . मला पवित्र बनले पाहिजे असे म्हणणारे मन ही एक समस्या आहे .पावित्र्य मनाच्या क्षेत्रातील असूच शकत नाही .मन फक्त लैंगिक क्रिया दाबून ठेवू शकेल ,दूर करू शकेल,परंतु दूर सारणे म्हणजे पावित्र्य नव्हे .पावित्र्य हा तथाकथित सद्गुण नव्हे .पावित्र्याची मशागत करता येत नाही .जो मनुष्य नम्रता मशागत करीत आहे तो नक्कीच नम्र नाहीं .तो स्वतःचा गर्व नम्र करू शकेल ,परंतु वस्तुतः तो अत्यंत गर्विष्ठ मनुष्य आहे .व म्हणूनच तो नम्रता आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहे .गर्विष्ठपणा कधीही नम्र बनू शकत नाही.पावित्र्य ही मनाच्या क्षेत्रातील वस्तू नाही .पावित्र्य म्हणजे काय ते मनाला कळणार देखील नाही .तुम्ही पवित्र बनू शकत नाही.प्रेम म्हणजे काय हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला पावित्र्य समजेल.प्रेम म्हणजे मन नव्हे किंवा ती मनाजवळील वस्तूही नव्हे.
ज्यामुळे जगभर हजारो लोक विदीर्ण होत आहेत, अशी ही लैंगिक क्रिया समस्या जोपर्यंत मनाने समजून घेतली नाही,तो पर्यंत ती सुटणार नाही.आपण विचाराला पूर्णविराम देऊ शकत नाही, परंतु जेव्हा विचार करणारा थांबतो तेव्हा विचार आपोआपच नष्ट होतो .जेव्हा संपूर्ण विचारप्रक्रिया समजते तेव्हा विचार करणारा थांबतो . विचार करणारा व विचार यांच्यात जेव्हा विभाजन होते तेव्हाच भीती अस्तित्वात येते.जेव्हा विचार करणारा नसतो तेव्हा विचार विरोधही नसतो .या सर्वातील गर्भितार्थ हाच कि समजासाठी प्रयत्न आवश्यक नाहीत .विचारातून विचार करणारा अस्तित्वात येतो .नंतर हा विचार करणारा विचाराला आकार देण्याचा, त्याचे नियंत्रण करण्याचा, त्याला ताब्यात ठेवण्याचा, त्याचा शेवट करण्याचा, वगैरे वगैरे प्रयत्न करू लागतो .विचार करणारा ही असत्य वस्तू आहे. तो भास आहे .तो मनाने निर्माण केलेला माया बाजार आहे .जेव्हा विचारांची वस्तुस्थिती म्हणून समज येईल,तेव्हा वस्तुस्थिती बद्दल विचार करण्याची आवश्यकता रहाणार नाही.जर केवळ फक्त निवड रहित जागृतता असेल तर वस्तुस्थितीतील गर्भितार्थाचा आपोआप साक्षात्कार होऊ लागतो.म्हणूनच वस्तुस्थिती, अशा विचारांचा अंत होतो .नंतरच आपल्या अंत:करणात व मनात सलत व जळत असणाऱ्या अनेक समस्या ,आपल्या सामाजिक रचने बद्दलच्या समस्या, आपल्याला सोडवता येतील, .नंतर लैंगिक क्रिया ही समस्या राहणार नाही .तिला म्हणजे लैंगिक क्रियेला तिचे योग्य स्थान प्राप्त होईल .ती पवित्र गोष्ट नाही व अपवित्र गोष्टही नाही .लैंगिक क्रियेला तिचे स्थान जरूर आहे .परंतु मन जेव्हा तिला प्रमुख स्थान देते तेव्हा ती समस्या बनते .मन लैंगिक क्रियेला प्रमुख स्थान देते कारण ते कुठल्या ना कुठल्या आनंदाशिवाय जगू शकत नाही.अशा प्रकारे लैंगिक क्रिया ही समस्या बनते .जेव्हा मन स्वतःची संपूर्ण प्रक्रिया समजते तेव्हा ते स्वतःचाच नाश करून घेते.म्हणजेच विचार नष्ट होतो.फक्त तिथेच सृजन असते.ते सृजन आपल्याला आनंदी करते .त्या सृजनशील स्थितीत असणे म्हणजेच परमेश्वराचा वरदहस्त असणे होय .कारण फक्त तिथेच संपूर्ण स्वत:ला विसरणे असते. तिथे मी पासून कुठलीही प्रतिक्रिया नसते .दैनंदिन लैंगिक समस्येला हे काही तरी तात्त्विक उत्तर नाही. फक्त हेच खरे उत्तर आहे .मन प्रेम नाकारते व प्रेमाविना पावित्र्य अशक्य आहे.प्रेम तुमच्या जवळ नाही आणि म्हणून तुम्ही लैंगिक क्रिया ही एक समस्या बनवली आहे .
++++++++++++++++++