प्रश्न २९: सत्य व असत्य
प्रश्न --सत्याची पुनरुक्ती असत्य असते असे तुम्ही म्हणता हे कसे काय शक्य आहे?असत्य म्हणजे काय? असत्य बोलणे अयोग्य कां? आपल्या अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर ही समस्या अत्यंत गूढ व महत्त्वाची नाही काय?
उत्तर--आपण पुनरुक्ती कशाची करतो समजुतीची पुनरुक्ती करता येणे शक्य आहे काय ?मला एखादी गोष्ट समजली मी त्याची पुनरुक्ती करू शकतो काय ?मी त्याला शब्दरूप देऊ शकतो. मी ते दुसऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो.पण हे सर्व म्हणजे मूळ समजणे नव्हे .आपण शब्दात गुंतले जातो व अनुभवाचे महत्त्व विसरतो .तुम्हाला एखादा अनुभव आला असला मग तो कसलाही असो त्याची पुनरुक्ती तुम्ही करू शकता काय ?तो अनुभव पुन्हा घेण्याची तुम्हाला इच्छा असेल, तो अनुभव अनुभवण्याची वासना असेल , पुनः संवेदना घेण्याची इच्छा असेल, परंतु एकदा अनुभव आला की आला तो तिथेच संपतो. दुसरा अनुभव त्या सारखा असेल परंतु तोच असणे शक्य नाही .थोडक्यात अनुभवाची पुनरुक्ती शक्य नाही .त्या संवेदनेला जीवन देणाऱ्या शब्दांची पुनरुक्ती अवश्य करता येईल .आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रचाराची हौस असल्यामुळे आपण शब्दांमध्ये अडकून पडतो .अशाप्रकारे आपण शब्दांवर जगतो व सत्य नाकारले जाते.
आपण एक उदाहरण घेऊं या .प्रेमाची भावना घ्या त्याची पुनरुक्ती करता येईल का ? जेव्हा तुम्ही पुढील शब्द ऐकता "शेजाऱ्यावर प्रेम करा"तुम्हाला ते सत्य असते काय ? जेव्हा तुम्ही खरोखरच शेजाऱ्यावर प्रेम कराल तेव्हा तुम्हाला ते सत्य असते परंतु त्याची पुनरुक्ती करता येईल का ?अर्थातच करता येणार नाही. फक्त शब्दांची पुनरुक्ती करता येईल.तुमच्या पैकी बरेच "शेजाऱ्यावर प्रेम करा" "अधाशी असू नका" या शब्दांवरच आनंदी व समाधानी असतात . अशा प्रकारे दुसऱ्याने अनुभवलेले सत्य किंवा तुम्हाला आलेला अनुभव पुनरुक्तीतून सत्य बनत नाही.किंबहुना पुनरुक्तीने सत्याला प्रतिबंध केला जातो .केवळ काही कल्पनांची पुनरुक्ती म्हणजे सत्य नव्हे .
या सगळ्यांत खरी अडचण अशी आहे की विरुद्ध बाजूचा विचार केल्याशिवाय प्रश्न समजणे कठीण आहे.असत्य म्हणजे सत्याच्या विरुद्ध असलेली काहीतरी वस्तू नव्हे .जे काही म्हटले जात आहे की"बरेच जण समजल्याशिवाय पुनरुक्ती करीत असतात "हे सत्य ,सत्य किंवा असत्य यांच्याविरुद्धची वस्तू म्हणून नव्हे ,तर फक्त पाहणे शक्य आहे.अापण एखाद्या भावनेला नाव देणे किंवा न देणे याबद्दल चर्चा करीत होतो.तुमच्या पैकी बरेचजण हे "सत्य" आहे असे समजून त्याची पुनरुक्ती करतील.याबद्दल मला खात्री आहे .जर तुम्हाला एकादा अनुभव आला असेल तर त्याची तुम्हाला पुनरुक्ती कधीही करता येणार नाही.तुम्ही तो दुसऱ्याला समजावून देण्याचा प्रयत्न कराल.अनुभवाचे शब्दीकरण करताना त्याच्या पाठीमागील संवेदना व भावनात्मक महत्त्व नष्ट झालेले असते.
उदाहरणार्थ विचार करणारा व विचार हे एकच असतात ही कल्पना घ्या.ही तुम्हाला कदाचित सत्य असेल कारण तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे .तिची पुनरुक्ती केली तर ती मात्र सत्य असणार नाही.असत्य म्हणजे सत्याच्या विरुद्ध नव्हे हे कृपा करून नीट लक्षात घ्या .विचार व विचार करणारा हे एकच आहेत हा अनुभव अर्थातच शब्दीकरणामध्ये प्रत्यक्ष असणे शक्य नाही .ती फक्त शब्दांची पुनरुक्ती असणार .आणि म्हणूनच त्याला महत्व नाही.पुनरुक्ती ने आपण एक आदर्श निर्माण करतो .आपण चर्च देउळ मशीद गुरुद्वारा बांधतो व मग त्यांतआश्रय घेतो .शब्द "सत्य" नव्हे."सत्य" हा शब्द म्हणजे वस्तू नव्हे.आपल्याला शब्द हेच "वस्तू" असतात .प्रत्येकाने आपल्याला जे समजत नाही त्याची नेहमी अत्यंत सावध राहून पुनरुक्ती करता कामा नये .जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली असेल तर ती दुसर्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करू शकता. परंतु शब्दामध्ये स्मरणामध्ये त्याच्या पाठीमागील भावनात्मक महत्त्व नष्ट झालेले असते .एखाद्याला जर हे बरोबर समजेल तर साध्या साध्या संभाषणात सुद्धा त्याचा दृष्टिकोन व त्याची बोलण्याची पद्धत बदलेल .
अापण सत्य स्वज्ञानातून शोधीत आहोत. अापण प्रचारक नाही. त्यामुळे वरील गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे .अनुभवाची पुनरुक्ती शब्दीकरणातून करता येत नाही .दुसर्याच्या अनुभवाच्या शब्दीकरणाची पुनरुक्ती करीत असताना शब्द व संवेदना यांनी आपण स्वत:ला भारून टाकतो .आपण चकव्यात व भासात पकडले जातो .अशाप्रकारे चकव्यामध्ये व भासामध्ये पकडले न जाण्यासाठी स्वतः अनुभव घेणे जरूरीचे आहे. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सवयी शब्द संवेदना यांच्या पुनरुक्ती प्रक्रियेबद्दल आपण प्रक्रिया चालू असताना सावध जागृत असले पाहिजे .ही जागृतता तुम्हाला असामान्य स्वातंत्र्य देते .यातूनच पुनर्जन्म, सतत नावीन्य, सतत अनुभवणे, व ताजेपणा निर्माण होईल .
दुसरा प्रश्न आहे असत्य म्हणजे काय ?असत्यता चूक कां ?हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा सर्व पातळ्यांवर अत्यंत महत्त्वाचा व गूढ नाही काय?
असत्य काय आहे? विरोध म्हणजेच असत्य नव्हे काय ?स्वअंतर्विरोध म्हणजेच असत्य नव्हे काय ?एखादा जाणून बुजून विरोध करील, एखादा अजाणता विरोध करील, विरोध जागृत असेल, नाहीतर सुप्त असेल ,विरोध अगदी उघड उघड असेल, किंवा अत्यंत गूढ स्वरूपाचा असेल .विरोधातली तीव्रता जेव्हा जास्त होते तेव्हा आपले डोके कामातून जाते .किंवा हा झगडा ओळखून अापण सुधारणा करण्याच्या प्रयत्नाला लागतो .
असत्य म्हणजे काय व आपण असत्य आचरण का करतो ?हे समजण्यासाठी आपण खोलवर विचार केला पाहिजे .स्वतःमध्ये विरोध आहे .ही विरोध समस्या आपण अविरोधी असल्याशिवाय पाहू शकू का?या प्रश्नाचा तपास करताना एक अडचण आहे .आपण असत्याचा धि:कार ताबडतोब करतो .त्यामुळे सत्य व असत्य अशा रितीने विचार करण्या ऐवजी आपण विरोध म्हणजे काय ते पाहू या.आपल्यामध्ये अंतर्विरोध का असतो? आपण विरोधयुक्त का असतो ?एका विशिष्ट तथाकथित पातळीवर जगण्याचा आपला प्रयत्न नसतो काय ?एका विशिष्ट आदर्श आकारात असण्याचा आपला प्रयत्न नसतो काय ? काही तरी स्वतःच्या व लोकांच्या दृष्टिकोनातून असण्याचा आपला प्रयत्न नसतो काय ?एका विशिष्ट आदर्शाप्रमाणे असण्याची आपली वासना असते .जेव्हा आपण त्याप्रमाणे नसतो तेव्हा विरोध निर्माण होतो .
आदर्शांची विशिष्ट पातळी, विशिष्ट आकार ,व विशिष्ट कल्पना, आपल्या जवळ कां असते ?त्या आदर्शाप्रमाणे असण्याचा आपण कां प्रयत्न करीत असतो ?सुरक्षित असावे, निश्चिंत असावे, लोकांनी आपल्याला दोष देऊ नये, लोकांनी आपले कौतुक करावे, आपण प्रसिद्ध असावे, लोकमत चांगले असावे ,वगेरे वगैरे कारणांसाठी आपण आपल्या आदर्शाप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करतो . विरोधाचे बी इथेच आहे.जोपर्यंत आपण काही तरी बनण्याचा ,काही तरी मिळवण्याचा,आदर्शानुरूप होण्याचा, प्रयत्न करीत आहोत तोपर्यंत अंतर्विरोध अपरिहार्य आहे.तो पर्यंत सत्य व असत्य यातील भांडण अपरिहार्य आहे .माझ्या मते हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे .आपण या प्रश्नामध्ये शांतपणे खोलवर शिरले पाहिजे .सत्य व असत्य म्हणून काही नाही अशा दृष्टिकोनाने नव्हे तर आपल्यामध्ये विरोध का असतो अशा दृष्टीने शांतपणे खोलवर विचार केला पाहिजे .आपण भव्य दिव्य श्रेष्ठ सद्गुणी इत्यादी असण्याचा प्रयत्न करीत असतो, म्हणूनच आपल्यात विरोध नसतो काय ? काहीतरी असण्याच्या वासनेतच काहीतरी नसण्याची वासना अंतर्भूत असते .ही वासनाच, काहीतरी असण्याची बनण्याची वासनाच, विरोध निर्माण करते. वासना विरोधमय असते आणि विरोध विनाशकारक असतो.एखादा कुठल्याही गोष्टीशी, ती गोष्ट ही की ती हा प्रश्न नाही, पूर्णपणे समरस होण्यास समर्थ असेल तर विरोध तात्काळ नष्ट होतो .जेव्हा आपण स्वतःला एखाद्या विशेष गोष्टीत संपूर्णपणे पाहतो तेव्हा आपण स्वतःला व्यवस्थित बांधून घेतो अडकवून घेतो .यातून विरोध निर्माण होतो .त्यातून तोल ढळतो. ही अगदी उघड उघड दिसणारी गोष्ट आहे .
आपल्यात अंतर्विरोध कां आहे ? मी काहीतरी केले आहे आणि त्याचा इतरांना तपास लागू नये अशी माझी इच्छा आहे .माझ्या मनात काही विचार आहेत आणि त्याप्रमाणे आचरण होऊ नये अशी माझी इच्छा आहे .ही वस्तुस्थिती मला विरोध स्थितीत टाकते .ही विरोध स्थिती मला आवडत नाहीं .जिथे जिथे काहीतरी बनणे आहे ,तिथे तिथे भीती आहे . ही भीती विरोध निर्माण करते. जिथे काहीही बनणे नसते, जिथे काहीही होण्याचा किंवा असण्याचा प्रयत्न नसतो, तिथे स्वाभाविकपणे विरोध नसतो .जिथे विरोध नसतो तिथे कुठेही प्रगट किंवा सुप्त मनाच्या, कुठच्याही पातळ्यांवर असत्य नसते. स्वाभाविकपणे काहीतरी दाबून टाकण्याचा, काहीतरी उपटून फेकण्याचा, काहीतरी नष्ट करण्याचा, वा प्रदर्शन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . आपल्यापैकी बहुतेकांचे जीवन हे काहीतरी बनण्याचे,कांहितरी सोडण्याचे, काहीतरी प्रदर्शन करण्याचे, असते.अशा परिस्थितीत विरोध व असत्य अपरिहार्य आहे .जेव्हा हा काहीतरी अापण आहोत त्यापेक्षा वेगळे करण्याचा कल नाहीसा होतो, आणि आपण जे आहो तेच असतो, तेव्हा विरोध नसतो. असत्य नसते .हा विरोध खरोखरच फार महत्त्वाचा आहे. अापण काय असतो व आपल्याला काय बनायचे असते ते महत्त्वाचे नाही,अापण काय असत्य करतो तेहि महत्त्वाचे नाही ,आपण असत्य कसे सजवतो तेहि महत्त्वाचे नाही ,विरोध महत्त्वाचा आहे. जोपर्यंत विरोध आहे तो पर्यंत उथळ जीवनही अपरिहार्य आहे .मग उथळ भीतीही त्याबरोबरच आली.मग त्या भीतीपासून आपले संरक्षण करणेही आले.मग गोंडस सत्यही अपरिहार्य आहे .बाकी सर्व काही तुम्हाला माहित आहेच.या प्रश्नाकडे आपण नीट पाहूया सत्य व असत्य म्हणजे काय याचा नीट विचार केल्याशिवाय या द्वैताशिवाय आपणामध्ये विरोध का असतो ते पाहू या.ही फारच बिकट गोष्ट आहे .अपूर्ण संवेदनांवर अवलंबून असल्यामुळे आपले जीवन हाच एक प्रचंड विरोध आहे .स्मरण,मते ,यावर आपण अवलंबून असतो .आपल्याला अनेक प्रकारच्या भीती वाटत असतात.त्यावर पांघरूण घालण्याचा आपला प्रयत्न असतो .जेव्हा हा विरोध टोकाला जातो तेव्हा आपले डोके कामातून जाते .प्रत्येकाला शांतता पाहिजे आहे परंतु आपण जे काही करतो त्यामुळे युद्ध निर्माण होते .युद्ध केवळ कुटुंबात नव्हे तर जमातीत, जातीत,धर्मात, समाजात, सर्वत्र निर्माण होते.विरोध म्हणजे काय व तो का निर्माण होतो ते समजून घेण्याऐवजी आपण हे किंवा ते बनण्याचा प्रयत्न सतत करीत असतो.अशा प्रकारे झगडा युद्ध जास्तच तीव्र होते .
केवळ वरवर नव्हे तर खोल मानसिकदृष्ट्या आपल्यामध्ये विरोध कां आहे हे समजून घेणे शक्य आहे काय ?प्रथम आपण विरोध पूर्ण जीवन जगत असतो याबद्दल आपण जागृत आहोत काय?आपल्याला शांतता पाहिजे आणि आपण राष्ट्रीय आहोत .आपण राष्ट्राभिमानाचे गोडवे गातो .आपल्याला सामाजिक क्लेश टाळावयाचे आहेत.आपल्यापैकी प्रत्येकजण स्वार्थी स्वयंकेंद्रित व व्यक्तिनिष्ठ आहे .आपण सतत विरोधमय जीवन जगत आहोत.आपण संवेदनांचे गुलाम आहोत, हेच त्याचे कारण नाही काय?याचा स्वीकार करण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच नाही .संवेदनांचा परिणाम व गर्भित अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला फार खोलवर समज आवश्यक आहे .संवेदनांचा परिणाम म्हणजे वासना होय. आपल्याला कितीतरी गोष्टी पाहिजे आहेत.त्या सगळ्या एकमेकांना विरोध करीत आहेत .आपल्या जवळ एकमेकांना विरोध करणारे कितीतरी बुरखे आहेत .जेव्हा एक बुरखा फायदेशीर असतो तेव्हा तो बुरखा आपण धारण करतो .जेव्हा दुसरा एखादा बुरखा जास्त फायदेशीर वाटतो जास्त सुखकारक वाटतो तेव्हा आपण तो बुरखा धारण करतो .ही विरोध स्थिती असत्य निर्मिती करते .मग यांच्या विरोधी म्हणून सत्य निर्माण केली जाते .सत्य हे असत्याच्या विरोधी असूच शकत नाही .ज्याला विरुद्ध आहे ते सत्यच नव्हे .विरुद्धाचे विरुद्धही विरुद्धच असते.म्हणून असत्याचे विरुद्धही असत्यच असते.आणि म्हणून ते सत्य नसते.ही समस्या संपूर्णपणे व शहाणपणे समजण्यासाठी ज्या विरोधमय स्थितीमध्ये आपण जगत असतो ,त्याबद्दल आपण जागृत पाहिजे.जेव्हा मी म्हणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो,त्याच वेळी द्वेष मत्सर खुनशीपणा उतावळेपणा भीती ही सर्व असतात .हाच विरोध हा विरोध समजणे आवश्यक आहे.जागृततेतूनच धि:कार किंवा समर्थन रहित जागृततेतूनच तो समजू शकेल.फक्त केवळ त्याच्याकडे पाहूनच तो समजू शकेल .गती शून्यतेने हेतू शून्यतेने त्याकडे पाहण्यासाठी धि:कार व समर्थन प्रक्रिया समजणे आवश्यक आहे .
ही सोपी गोष्ट नाही .गति शून्यता ही अत्यंत बिकट गोष्ट आहे .समजुतीतूनच स्वतःच्या भावना व विचार यांचे मार्ग व त्यांच्या प्रक्रिया समजू लागतात.जेव्हा स्वअंतर्विरोधमहत्वाविषयी एखादा संपूर्णपणे जागृत असतो तेव्हा एक असामान्य बदल घडून येतो . तुम्ही जे काही नाही ते बनणारे नसता,जे असता तेच असता.इथून पुढे तुम्ही मार्गक्रमणा करू शकता .आता विरुद्ध शक्यता नसते .
++++++++++++++++++