Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न १: चालू संकटाविषयी

प्रश्न --चालू संकट हे पूर्वीपेक्षा सर्वार्थाने वेगळे आहे असे तुम्ही म्हणता ते कोणत्या अर्थाने न भूतो भविष्यती असे आहे ?

उत्तर---जगातील चालू संकट हे निश्चितच न भूतो असे आहे. 

इतिहासाच्या निरनिराळ्या कालखंडामध्ये निरनिराळ्या प्रकारची राजकीय सामाजिक आर्थिक संकटे आली व गेली .संकटे येतात व जातात. आर्थिक हलाखी आर्थिक चढ उतार आर्थिक दुर्घटना येतात, दुरुस्त केल्या जातात व पुनः  वेगळ्या प्रकारात चालू राहतात. हे सर्व आपल्या सर्वांना माहितच आहे .परंतु चालू संकट हे न भूतो असे आहे ते नाही काय?कारण आपण भौतिक स्पर्श करता  येण्याजोग्या वस्तूंबद्दल बोलत नाही तर कल्पनां बद्दल बोलत आहोत.संकट न भूतो असे आहे कारण ते कल्पनेच्या क्षेत्रातील आहे .आम्ही कल्पनांसाठी भांडत आहोत. आम्ही खुनाचे समर्थन करीत आहोत .आम्ही अत्याचाराचे बलात्काराचे समर्थन करीत आहोत .सर्व जगात आज अापण उदात्त ध्येय साध्य करण्याचे साधन म्हणून खुनाचे समर्थन करीत आहोत.तशी घटना यापूर्वी इतिहासात घडलेली नाही .पूर्वी वाईट हे वाइटच म्हणून ओळखले जात असे.खून हा खून म्हणून ओळखला जात होता .अनेक युद्धे झाली परंतु त्यामागे राज्यकर्त्यांची लालसा  स्पष्टपणे दिसत होती.तथाकथित उदात्त हेतू साध्य करण्याचे साधन म्हणून आता सर्रास खून केले जात आहेत .सर्वत्र दिसत असलेला आतंकवाद दहशतवाद दहशतवादी टोळ्या नक्षलवाद माओवाद ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत .एका व्यक्तीचा, एका समूहाचा ,खून आता योग्य उदात्त मानला जात आहे .त्याचे समर्थन केले जात आहे . ज्या समूहाचे  किंवा तथाकथित कल्पनांचे हा खुनी समर्थन करतो प्रतिनिधित्व करतो, तो समूह मानवाला हितकारक अशी फलनिष्पत्ती करण्यासाठी योग्य साधन म्हणून या खुनाचे समर्थन करीत आहे .म्हणजे आपण भविष्यासाठी वर्तमानाचे बलिदान करीत आहोत.जो हेतू जे फल मानवाला हितकारक होईल असा आमचा दावा आहे , तो हेतू साध्य करणे हे आमचे जोपर्यंत ध्येय आहे ,तोपर्यंत आपण कुठचीही साधने वापरू शकतो अशी आमची प्रणाली आहे .यातील गर्भितार्थ असा आहे की चुकीची साधने आपल्याला योग्य साध्य प्राप्त करून देतील .तुम्ही अयोग्य साधनांचे कल्पनेतील ध्येय साध्य करण्यासाठी  समर्थन करीत आहात .पूर्वीच्या निरनिराळ्या  संकटात मानव किंवा वस्तू यांची लूट होत होती .आता आपण कल्पनांची लूट करीत आहोत .हे जास्तच भयानक व धोकादायक आहे .कल्पना लूट ही अत्यंत विनाशकारक आहे .प्रसिद्धीची शक्ती जाहिरातीचे सामर्थ्य आपण ओळखलेले आहे .कल्पना मानवात बदल करण्यासाठी सामुदायिक रित्या वापरणे व त्यासाठी खून खराबा करण्यासाठी तयार होणे हे सर्वात गंभीर असे संकट आहे . तूर्त जगात बरोबर हेच चाललेले आहे .मानवाला मानव म्हणूनच किंमत राहिली नाही .कल्पना, पद्धती, प्रणाली, तत्त्वे, यांचे तुम्हाला जास्त महत्त्व आहे .जोपर्यंत आपण एखादा विशिष्ट परिणाम करू शकतो तोपर्यंत आपण कोट्यावधी लोकांना ठार मारू शकतो .गेल्या शतकामध्ये हिटलर स्टॅलिन माओ तर या  शतकात आतंकवादी नक्षलवादी दहशतवादी इत्यादी अनेक उदाहरणे आहेत .या सर्वांचे कल्पनांनी समर्थन केले जाते .आपल्याजवळ अत्यंत विराट अशा कल्पनांचा सांगाडा आहे .त्याच्या जोरावर आपण वाईटाचे समर्थन करू शकतो .हे पूर्वी कधीही घडलेले नाही .वाईट हे केव्हाही वाइटच त्याने चांगले कसे येणार ?शांतता आणण्याचे युद्ध हे कधीही साधन होऊ शकत नाही. युद्धामुळे काही दुय्यम फायदे होऊ शकतील .उदारणार्थ भौतिक शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या  प्रगती होतात.शास्त्रीय प्रगती असंख्य शोध यामुळे जरी भौतिकदृष्टय़ा असंख्य सुविधा प्राप्त झाल्या, तरी जोपर्यंत त्याचा वापर करणारा मनुष्य कल्पनांच्या राज्यात आहे, तोपर्यंत शांतता अस्तित्वात येणे कठीण आहे .केव्हा केव्हा शांतता आणण्याचे साधन म्हणून युद्धाचे बौद्धिक समर्थन केले जाते परंतु अशा युद्धाने शांतता येणे अशक्य आहे.जेव्हा मनुष्याच्या जीवनात बुद्धीला अवास्तव महत्त्व दिले जाते तेव्हा अपरिहार्यपणे असामान्य न भूतो असे संकट येते .
           
आणखीही काही कारणे आहेत की ज्यामुळे चालू संकट हे न भूतो असे ठरते .  इंद्रियजन्य व कल्पनाजन्य मूल्याना मनुष्य अवास्तव महत्त्व देत आहे.संवेदनांना महत्त्व प्राप्त झाले आहे .मालमत्ता नाव जात धर्म देश जी कुठची चिट्ठी तुम्ही वापरता तिला आपण महत्त्व  देत आहोत .तुम्ही हिंदू मुसलमान ख्रिश्चन कम्युनिस्ट किंवा आणखी कुणी आहा .नाव जात देश धर्म पोटजात या सर्वांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे .म्हणजेच मनुष्य जास्त जास्त संवेदनामूल्यात सापडत आहे . मग त्या संवेदना इंद्रिय जन्य असोत किंवा कल्पना जन्य असोत .भौतिक असोत किंवा मानसिक असोत .मनाने व हातानी बनविलेल्या वस्तू इतक्या  महत्त्वाच्या ठरल्या आहेत कि आपण त्याच्यासाठी एकमेकाना ठार मारीत आहोत.एकमेकांचा नाश करीत आहोत .एकमेकांची लूट करीत आहोत.एकमेकांवर भयानक अत्याचार करीत आहोत .आपण हळूहळू भयानक दरी असलेल्या कड्यावर येऊन पोचत आहोत.या गोंधळातून आपण हळूहळू दरीकडे फेकले जात आहोत .या संकटातून बाहेर पडण्यासाठी कालरहित क्रियेची गरज आहे.कल्पनेवर आधारित नसलेल्या क्रियेची गरज आहे .कल्पनेवर आधारित क्रिया व पद्धत शेवटी आपल्याला निष्फळतेकडे नेईल .कल्पनाधिष्ठित क्रिया आपल्याला दुसऱ्या एका मार्गाने परंतु पूर्वीच्याच ठिकाणावर आणून सोडते.म्हणून न भूतो असे हे संकट आहे . यावर उपाययोजनाही न भूतो अशी पाहिजे.मनुष्याचे पुनर्घटन तत्काळ झाले पाहिजे .पुनर्घटनप्रक्रिया काल प्रक्रिया असून चालणार नाही .पुनर्घटन आत्ताच झाले पाहिजे.उद्या नव्हे.कारण उद्या ही विघटन प्रक्रिया आहे .जरी मी, मला उद्या बदलेन असे म्हणेन  तर मी गोंधळाला निमंत्रण देतो .मी अजूनही विनाशाच्या क्षेत्रात असतो .आत्ता बदलणे शक्य आहे क़ाय?आत्ता या क्षणी स्वपुनर्घटन स्वबदल घडवून आणणे शक्य आहे काय़?मी म्हणतो होय ते अगदी शक्य आहे .
         
मुद्दा असा आहे की ज्याअर्थी संकट न भूतो असे आहे त्या अर्थी उपाय योजनाही तशीच पाहिजे .या सर्वांना तोंड देण्यासाठी विचार क्रांती झाली पाहिजेत . ही क्रांती दुसर्‍या मार्फत पुस्तका मार्फत संघटने मार्फत होणार नाहीं .ती क्रांती आपली आपणच घडवून आली पाहिजे.ती आपल्या पैकी प्रत्येकाने घडवून आणली पाहिजे.नंतरच आपण एकावर एक जमा होत गेलेल्या एकावर एक साठत गेलेल्या भयानक विनाशकारी शक्तीपासून दूर असा एक नवा समाज निर्माण करू शकतो.एक नवी व्यवस्था उभारू शकतो .हा बदल जेव्हा तुम्ही व्यक्ती म्हणून ,स्वतःबद्दल प्रत्येक विचारात कर्मात भावनेत जागृत राहण्याला सुरुवात करतो, तेव्हा अस्तित्वात येतो.

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत