प्रश्न २२: प्रेमाविषयी
प्रश्न --प्रेम म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ?
उत्तर--आपण याचा शोध प्रेम म्हणजे काय नव्हे ते पाहून घेणार आहोत .प्रेम हे अज्ञात आहे आणि म्हणून ज्ञाताचा त्याग करून आपल्याला त्याच्याकडे गेले पाहिजे. जे मन ज्ञाताने भरलेले आहे त्याच्याकडून अज्ञाताचा शोध लागणे अशक्य आहे .आपण ज्ञाताचे मूल्यमापन करणार आहोत .त्यांच्याकडे फक्त पाहणार आहोत. ज्ञात जेव्हा धि:काराशिवाय शुद्ध बुद्धीने पाहिले जाते तेव्हा मन ज्ञातापासून स्वतंत्र होते.मन जेव्हा ज्ञातापासून स्वतंत्र होईल तेव्हा प्रेम म्हणजे काय हे आपोआप कळेल .अशाप्रकारे प्रेम समजून घेण्याची आपली पद्धत आपला दृष्टिकोन नकारात्मक आहे भरीव नाही .
आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रेम म्हणजे नक्की काय वाटते ?आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही कुणावर तरी प्रेम करतो तेव्हा आपल्याला नक्की काय म्हणायचे असते ?तो मनुष्य आपण बाळगतो, असेच म्हणायचे नसते काय ?त्या बाळगण्यातून मालकी हक्काचा प्रादुर्भाव होतो .त्यातून मत्सर निर्माण होतो .जर तो किंवा ती हरवली मालकी हक्क नष्ट झाला तर मग काय होते ?मला स्वतःलाच हरवल्यासारखे वाटते. मला अगदी उघड्यावर पडल्यासारखे वाटते.म्हणून मी या माझ्या बाळगण्याला,मालकी हक्क देण्याचा, कायदेशीर स्वरूप देण्याचा, प्रयत्न करतो .मी तो किंवा ती घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो .त्या मनुष्याला धरून त्याला बाळगून त्याच्यावर किंवा तिच्यावर मालकी हक्क कायदेशीर हक्क प्रस्थापित करून काय निर्माण होते ?त्यातून मत्सर द्वेष व मालकी हक्कातून निर्माण होणार्या सर्व गोष्टी निर्माण होतात .म्हणजेच अंतर्गत प्रचंड विरोध अस्तित्वात येतो .अशा तर्हेने बाळगणे म्हणजे प्रेम नक्की नव्हे. ते प्रेम आहे काय ?
प्रेम ही एक भावना नाही .भावनाप्रधान असणे म्हणजे प्रेम नव्हे .भावना ही एक संवेदना आहे .ख्रिस्त बुद्ध कृष्ण गुरू किंवा आणखी कुणी तरी यांच्यासाठी जो मनुष्य रडतो तो भावनाप्रधान आहे .तो संवेदनेत रममाण होत आहे. तो संवेदनेचे कोडकौतुक करीत आहे.संवेदना ही एक विचार प्रक्रिया आहे .आणि विचार म्हणजे प्रेम नव्हे .संवेदनांचा परिणाम विचार होय.जो मनुष्य भावना प्रधान आहे तो बहुधा प्रेम जाणत असणे अशक्य आहे .आपण भावनाप्रधान नसतो काय ? भावनाप्रधानत्व हा एक स्वविस्तारीकरणाचा प्रकार आहे .भावनानी ठेचून भरलेले असणे म्हणजे प्रेम नक्कीच नव्हे .भावनाप्रधान मनुष्य जेव्हा भावनांना योग्य प्रतिसाद दिला जात नाही, किंवा त्यांच्या भावनांना वाट मिळत नाही ,तेव्हा अत्यंत क्रूर होण्याचा संभव असतो.निर्दयता द्वेष व युद्ध यांच्यात भावनाप्रधान मनुष्याचे परिवर्तन करणे सहज शक्य असते .जो मनुष्य भावनाप्रधान आहे ,ज्याच्या डोळ्यांत स्वतःच्या धर्मासाठी किंवा आणखी कसल्यासाठी भरपूर अश्रू आहेत,त्याच्याजवळ प्रेम खासच नाही .
क्षमा म्हणजे प्रेम आहे काय?क्षमेमध्ये काय गर्भितार्थ आहे ?तुम्ही माझा अपमान करता. मी त्याचा धि:कार करतो.मी ते लक्षात ठेवतो आणि नंतर पश्चात्ताप पावून किंवा जबरदस्तीने "मी क्षमा करतो" " असे म्हणतो . "मी तुम्हाला क्षमा केली आहे" असे म्हणतो.प्रथम मी स्वीकारतो व नंतर मी नाकारतो याचा अर्थ काय आहे ?"मी"हेच अजून महत्वाचे केंद्र नाही काय? "मी" अजून महत्त्वाचा आहे. हा "मी" कोणाला तरी क्षमा करीत आहे . जोपर्यंत क्षमा करण्याची वृत्ती आहे तोपर्यंत हा "मी" जिवंत आहे .महत्त्वाचा आहे .मी ज्याला क्षमा करतो, ज्याने माझा अपमान केला आहे असे मला वाटते, तो नव्हे तर "मी" अजून महत्त्वाचा आहे .अशा प्रकारे मी प्रथम रागसंग्रह करतो व नंतर तो नाकारतो. क्षमता हे प्रेम नव्हे .जो मनुष्य प्रेम करतो त्याचे कोणाजवळही शत्रुत्व नसते .सर्वच बाबतीत तो उदासीन असतो .दया क्षमा भीती व मत्सर ही सर्व संग्रहतेशी संबंधरूप आहेत .या सर्व गोष्टी म्हणजे प्रेम नव्हे .हे सर्व मना पैकी आहे. ते तसे नाही काय?मन जोपर्यंत न्यायाधीश आहे, न्याय करणारे आहे, निर्णय घेणारे आहे, तोपर्यंत प्रेम असणे शक्य नाही .संग्रहातूनच, अधिकारातूनच ,न्याय देणे मनाला माहीत आहे .त्याचा न्याय म्हणजे संग्रहतेचे निरनिराळ्या स्वरूपात प्रदर्शन होय.मन प्रेमाची लाच देऊ शकते ,परंतु ते कधीही प्रेमाला किंवा सौंदर्याला जन्म देऊ शकणार नाही.तुम्ही प्रेमावर सुरेख कविता लिहू शकाल परंतु हे अर्थातच प्रेम नाही .
जेव्हा खरा आदर नसतो तेव्हा अर्थातच प्रेम नसते .जेव्हा तुमच्या मनात तुमचा नोकर किंवा मित्र किंवा आणखी कुणीही असो त्याच्याबद्दल आदर नसतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करीत नाही . नोकर किंवा जे लोक तुमच्या पेक्षा खालच्या पातळीवर असतात त्यांच्याबद्दल तुम्ही आदरयुक्त, उदार, दयाळू ,नसता हे तुमच्या लक्षात आले आहे काय? त्याच प्रमाणे जे तथाकथित वरच्या पातळीवर असतात, ज्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी लाभ होण्याची ,उच्च स्थान चांगली नोकरी किंवा आणखी काही तरी मिळू शकेल असे वाटते, ज्यांच्याजवळ खूप मालमत्ता घरदार संपत्ती वगैरे आहे, किंवा जे तुमचे अन्नदाते आहेत, जे तुमचे वरिष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर असतो .तुमच्या पेक्षा कनिष्ठ पातळीवर आहेत त्यांना तुम्ही लाथ मारता, त्यांच्याजवळ बोलण्यासाठी एक खास भाषा तुमच्या जवळ असते, त्यामुळे जिथे आदर नाही तिथे प्रेम नाही .ज्या अर्थी आपल्यापैकी बर्याच जणांजवळ हे सर्व आहे त्या अर्थी आपल्यापैकी बर्याचजणांजवळ प्रेम नाही.आपण आदरयुक्तही नाही दयाळूही नाही व उदारही नाहीं. आपण संग्राहक आहोत. अापण भावनाप्रधान आहोत. आणि याचे रूपांतर केव्हांही खून क्रूरता किंवा एखाद्या मूर्ख अज्ञानजन्य हेतूंसाठी एकत्र येणे यात सहज होऊ शकते .मग आपल्याला प्रेम कसे काय माहिती असणार ?
जेव्हा या सर्व गोष्टी थांबतील, यांचा शेवट होईल, तुम्ही कसलाही मानसिक संग्रह करणार नाही, जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूवर प्रेमाचा वर्षाव करणे या पद्धतीने केवळ भावनाप्रधान असणार नाही,तेव्हा तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे कळेल .वरील तथाकथित प्रेम म्हणजे एका वस्तूच्या ठिकाणी दुसरी वस्तू आणणे असते .तुम्ही काहीतरी वेगळ्याच आकारात मागीत असता.जो मनुष्य प्रार्थना करतो तो प्रेम ओळखीत नसतो .ज्या अर्थी तुम्ही संग्रही आहात, ज्या अर्थी तुम्ही ध्येयाच्या परिणामाचा शोध घेत आहात, व या सगळ्याचा परिणाम तुम्हाला भावनाप्रधान करण्यात होत आहे, त्या अर्थी तुमच्या जवळ प्रेम नाही.तुम्ही कदाचित असे म्हणाल कि तुमच्याजवळ आदर आहे परंतु तो फक्त वरिष्ठांबद्दल आहे .तो तुम्हाला काहीतरी हवे आहे यातून निर्माण झाला आहे .तो आदर भीतीमधून निर्माण झाला आहे .जर तुमच्याजवळ खरोखरच आदर असेल,तर तुम्ही स्वयंभूपणे, मशागत केल्याशिवाय, कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांशी स्वाभाविकरित्या आदरयुक्त असाल .ज्या अर्थी तुमच्या जवळ असा आदर नाही त्याअर्थी तुमच्याजवळ प्रेम नाही.आपल्यापैकी किती थोडे जण दयाळू क्षमाशील व उदार आहेत .तुम्ही उदार आहात केव्हां,जेव्हां तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी मिळत आहे .तुम्ही दयाळू आहात केब्हां जेव्ह़ा तुम्हाला त्याचा मोबदला मिळत आहे . जेव्हां या सर्व गोष्टी नष्ट होतील, जेव्हां या गोष्टींनी तुमची मने व्यापलेली नसतील,जेव्हां मनोनिर्मित गोष्टींनी तुमची अंतःकरणे व्यापलेली नसतील, फक्त तेव्हाच प्रेम असेल .जगातील चालू वेडेपणा व अपवित्रता फक्त प्रेमच बदलू शकेल .तुमच्या डाव्या किंवा उजव्या विविध प्रणाली व पद्धती, जगातील चालू वेडेपणा व अपवित्रता बदलू शकणार नाही. जेव्हा तुम्ही कसलाही मानसिक संग्रह करीत नाही, जेव्हा तुम्ही मत्सरी नसता, जेव्हा तुम्ही अधाशी नसता, जेव्हा तुम्ही आदरयुक्त दयाळू व सहानुभूतीपूर्ण असता, जेव्हा तुम्ही तुमची पत्नी तुमचा पती तुमची मुले तुमचे शेजारी पाजारी व नोकर या सर्वांशी सारख्याच ममतेने वागत असता, तेव्हा तुमच्याजवळ खरोखरच प्रेम आहे असे म्हणता येईल .
प्रेमाबद्दल विचार करता येणार नाही .प्रेमाची मशागत करता येणार नाही .प्रेमाचा अवलंब करता येणार नाही .त्याची सवय लावून घेतात येणार नाही.प्रेमाची बंधुत्वाची सवय ही अजून मनाच्याच क्षेत्रात आहे आणि म्हणून ती प्रेम नाही .हे सर्व जेव्हा थांबते तेव्हा प्रेम अस्तित्वात येते .नंतरच प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला कळेल .प्रेमाला आकारमान नसते तर गुणवत्ता असते .मग तुम्ही असे म्हणत नाही की "मी सर्व जगावर प्रेम करतो ."जेव्हा तुम्हाला एकावर प्रेम कसे करावे हे कळते "तेव्हा तुम्हाला सर्व जगावर प्रेम कसे करावे हेही कळते .एकावर प्रेम कसे करावे हे आपल्याला कळत नाही म्हणून मानवतेवरील प्रेम हा आभास आहे .जेव्हा प्रेम असेल तेव्हा आणि तेव्हाच फक्त आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील .नंतर आपल्याला परमेश्वराचा वरदहस्त म्हणजे काय व आनंद म्हणजे काय हे कळेल .
++++++++++++++++++