Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न १७: स्मरणाविषयी

प्रश्न --आपल्या म्हणण्याप्रमाणे स्मरण हा अपूर्ण अनुभव आहे .तुमच्या पूर्वीच्या बोलण्याचा स्मरणासंबंधीचा अत्यंत तेजस्वी ठसा मी अजून जपून ठेवला आहे. हा अनुभव अपूर्ण कोणत्या अर्थाने आहे .कृपा करून ही कल्पना सर्व बारकाव्यांसह स्पष्ट करा .

उत्तर---स्मरण म्हणजे आपली काय कल्पना आहे ?तुम्ही शाळेत जाऊन निरनिराळ्या माहितीने व तांत्रिक ज्ञानाने आपले मन भरून घेता .जर आपण तंत्रज्ञ असाल तर तुम्ही हे ज्ञान इमारत बांधण्यासाठी पूल बनवण्यासाठी किंवा एखाद्या विमानाची बांधणी करण्यासाठी वापरता.हे फक्त भौतिक वस्तुस्थितीबद्दलचे स्मरण आहे .त्याचप्रमाणे मानसिक स्मरण म्हणून एक भाग आहे .तुम्ही माझ्याजवळ काहीतरी म्हटलेले आहे.ते प्रिय किंवा अप्रिय असे आहे .मी त्याचा संग्रह करून ठेवतो .मी तुम्हाला पुन्हा भेटतो तेव्हा त्याचे स्मरण घेऊन मी तुम्हाला भेटतो .जे तुम्ही म्हटले असेल किंवा नसेल ते घेऊन मी तुम्हाला भेटतो .स्मरणाचे दोन पैलू आहेत एक भौतिक व दुसरा मानसिक .हे दोन्ही पैलू एकमेकांशी संबंधित असतात. यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट नाही.त्यांच्यातील फरकही स्पष्ट नाही .भौतिक स्मरण, जगण्यासाठी ,अन्न मिळवण्यासाठी, आवश्यक आहे .परंतु मानसिक स्मरण  खरोखरच आवश्यक आहे काय?कोणत्या गोष्टींमुळे हे मानसिक स्मरण राखले जाते?स्तुती किंवा अपमान मानसिक दृष्ट्या लक्षात ठेवण्यासाठी कोण जबाबदार आहे ?प्रत्येक जण काही स्मरण धरून ठेवतो 

.तर काही सोडून देतो .याचे कारण काय बरे असावे ? प्रिय स्मरण राखण्याचा प्रयत्न केला जातो तर अप्रिय स्मरण विसरण्याचा प्रयत्न केला जातो.जर आपण लक्ष द्याल निरीक्षण कराल तर आपल्याला असे आढळून येईल की प्रिय स्मरण दीर्घकाळ लक्षात राहते तर अप्रिय स्मरण लवकर विसरले जाते .मन हेच स्मरण आहे .मग कुठच्याही पातळीवरील स्मरण असो .आपण त्याला काहीही नाव द्या . मन हे भूत अपत्य आहे.ते भूतावर उभे आहे .तेच स्मरण होय .ही एक धारणा युक्त आकारित स्थिती आहे .आता आपण या स्मरणाच्या पडद्यातून जीवन बघण्याचा जीवनाला भेटण्याचा जीवन समजण्याचा प्रयत्न करतो.प्रत्येक नवीन आव्हान या पडद्यातून पाहिले जाते .आव्हान नेहमी नवीन असते ,परंतु जबाब मात्र जुना असतो .जबाब प्रतिक्रियात्मक असतो .प्रतिक्रिया धारणेवर अवलंबून असते .स्मरण रहित अनुभवणे ही एक स्थिती आहे .स्मरणानुरूप अनुभवणे ही दुसरी स्थिती आहे . आव्हान आहे ते प्रतिक्षणी नवीन आहे .त्याला मी प्रतिक्रियेने भेटतो .प्रतिक्रिया धारणेनुरूप आहे.मग काय होते नित्य नवे जुन्यामध्ये शोषून घेतले जाते .मी त्याला जुन्याचे स्वरूप देतो . त्यामुळे मी खऱ्या समजुतीला खऱ्या अनुभवाला वंचित होतो. मला आव्हान  समजतच नाही. समजते ती फक्त प्रतिक्रिया .समजते ती धारणा.धारणेप्रमाणे आव्हानाचा अर्थ लावला जातो. त्यामुळे आव्हान खर्‍या अर्थाने कधीच समजत नाही .अशा प्रकारे नाविन्याचे अनुभवणे, हे सतत जुन्यातून असल्यामुळे,  म्हणजेच भूतातून असल्यामुळे, मला ते खर्‍या अर्थाने  समजत नाही.नाविन्याची धारणेनुरूप विपर्यस्त अर्धवट समज येते. संपूर्ण समज कधीही नसते .जेव्हा कोणत्याही गोष्टीची पूर्ण समज असते तेव्हाच ते आव्हान आपला कुठलाही ठसा वा जखम मागे ठेवत नाही.

जेव्हा जेव्हा आव्हान असते तेव्हा तेव्हा या नवीन आव्हानाला (प्रत्येक आव्हान  नवीन असते )तुम्ही धारणेनुरूप प्रतिक्रियेने भेटता .जुनी प्रतिक्रिया नव्याला आकार देते .त्याला वळण देते .त्याला वळवते. त्याला दिशा देते.त्याच्यात रंग भरते .यामुळे आव्हानाची संपूर्ण समज न येता अर्धवट समज येते .अशा प्रकारे नवे जुन्या मध्ये शोषून घेतले जाते.जुने जास्तच बळकट होते.हे सर्व तुम्हाला हवेत काल्पनिक किल्ले बांधल्यासारखे कदाचित वाटत असेल .जर आपण त्यात खोलवर काळजीपूर्वक शिराल तर तुम्हाला ते सर्व लक्षात येईल.ही वस्तुस्थिती आहे. यात कठिण काहीही नाही.जगातील हल्लीच्या परिस्थितीला, जगातील हल्लीच्या कूट समस्या सोडविण्यासाठी, एका वेगळ्याच पद्धतीची गरज आहे .एका वेगळ्याच रीतीची गरज आहे .जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी एक वेगळीच पद्धत अंमलात आणणे आवश्यक आहे.प्रत्येक समस्या संपूर्णपणे नवीन असताना अापण तिला समर्थपणे तोंड देण्यास असमर्थ आहोत.याचे कारण आपण त्या समस्येला म्हणजे आव्हानाला, कौटुंबिक प्रांतीय राष्ट्रीय प्रादेशिक धार्मिक इत्यादि पूर्व ग्रहांप्रमाणे तोंड देत असतो .आपले पूर्वीचे अनुभव नवीन समस्या समजणे अशक्य करून सोडतात .समजण्याला खर्‍या अनुभवण्याला प्रतिबंध होतो .असे असूनही आपण नेहमी स्मरणाची मशागत करण्यात तिची जोपासना करण्यात गढून गेलेले असतो .आणि म्हणूनच आपल्याला काहीही कधीही खर्‍या अर्थाने समजत कळत नाही .आपण आव्हानाला कधीही सर्वस्वी संपूर्णपणे काहीही हातचा न राखता भेटत नाही.एखादाच प्रत्येक आव्हानाला ताजेपणाने, नाविन्याने ,भूताशिवाय, भेटण्याला समर्थ असतो . अशा व्यक्तीला प्रत्येक आव्हानात, प्रत्येक क्षणाक्षणाला, संपन्नता असलेली आढळून येते .

प्रश्न विचारणार्‍यावे असे म्हणणे आहे "माझ्याजवळ तुमच्या पूर्वीच्या भाषणाचे तेजस्वी ठसे आहेत  हा अनुभव कुठच्या दृष्टीने अपूर्ण आहे ?"जर केवळ ठसे स्मरण या स्वरूपातच असतील तर अर्थातच हा अपूर्ण अनुभव आहे.जर तुम्हाला मी काय म्हटले ते खरोखरच कळले असेल ,आपण त्यातील सत्य अनुभवले असेल, तर ते सत्य म्हणजे स्मरण नव्हे .आव्हान  प्रत्येक क्षणी नवीन असते .ते प्रतिक्षणी स्वतःच स्वत:ला बदलत असते .तुमच्या जवळ पूर्वीच्या भाषणांचे स्मरण आहे का ?तुम्ही पूर्वीची भाषणे मार्गदर्शनासाठी वापरत आहात काय?जर तुम्ही ती तशी वापरत असाल तर तुम्हाला ती पूर्णपणे समजलेली नाहीत .तुम्हाला त्याचा नीट अभ्यास करावयाचा आहे .ती पूर्णपणे समजून घ्यावयाची आहेत .त्यामुळे तुम्ही ती सुप्त व प्रगट स्वरूपात जतन करून ठेवली आहेत .जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे समजेल, जर तुम्ही त्यातील सत्य यथार्थ पाहाल, तर तुम्हाला असे आढळून येईल, की तुम्ही त्यातील काहीच स्मरणात ठेवीत नाही.कुठल्याही प्रकारे त्याचे स्मरण ठेवले जात नाही.आपले शिक्षण म्हणजे स्मरणाची मशागत असते.स्मरणाचे दृढीकरण असते .ते स्मरणप्रक्रियेचे बळकटीकरण असते .या सर्वाचा अर्थ काय आहे ?आपण स्मरणाला एवढे महत्त्व का देतो ?आपण स्मरणाला एवढे घट्ट धरून का बसतो ?एखादा जसजसा वृद्ध होतो तसतसा तो भूतकाळामध्ये जास्त जास्त डोकावत असतो.गतकाळातील सुखदुःखांचे क्षण व आनंद याकडे तो पाहत असतो . तरुण भविष्याकडे जास्त बघत असतात.आपण हे का करीत असतो ?स्मरण इतके महत्त्वाचे का बनले आहे ?आपल्याला सदासर्वदा संपूर्णपणे सर्व तर्‍हेने वर्तमानात कसे जगावे ते माहीत नाही म्हणून, अापण भूतकाळामध्ये जास्त रमतो, असे त्याचे उत्तर आहे .आपण वर्तमान हे भविष्याकडे जाण्याचे साधन म्हणून वापरतो .आपली नजर नेहमी भविष्यावर असते.आपल्या दृष्टीने वर्तमानाला भूतातून भविष्याकडे जाण्याचा दरवाजा म्हणून काहीही महत्व नाही.हे आपल्या लक्षात आले आहे की नाही ते मला माहित नाही.यामुळेच आपण वर्तमानात जगण्यास असमर्थ आहोत .मी काहीतरी बनणार आहे आणि त्यामुळेच मला स्वतःची पूर्ण ओळख नाही.स्वतःला समजण्यासाठी, मी कोण आहे ते याक्षणी कळण्यासाठी, स्मरणाची काहीही आवश्यकता नाही.उलट जे काही आहे ते समजण्यासाठी स्मरणाची अडचण होते .स्मरणामुळे प्रतिबंध निर्माण केला जातो.नवीन विचार नवीन कल्पना नवीन भावना या स्मरणाच्या जाळ्यात अडकलेल्या असतात.मन जेव्हा कालाच्या, स्मरणाच्या, जाळ्यात अडकलेले नसते तेव्हाच नवीन कल्पनांचा,नवीन विचारांचा, नवीन भावनांचा,उदय होतो. ही गोष्ट आपल्या लक्षात आली आहे कि नाही ते मला माहीत नाही.दोन विचारांमध्ये नेहमी फट असते .विचारांमधील स्मरणामधील ही फट जर आपण जतन केली तर त्या फटीतून अशी एक स्थिती निर्माण होइल की जी विचार नसेल .जी स्मरण नसेल .आपल्याजवळ अनेक आठवणी आहेत व ही स्मरण साखळी आपण सातत्यासाठी वापरीत असतो ."मी" व "माझे" ही जोपर्यंत स्मरण मशागत आहे तोपर्यंत महत्त्वाची ठरतात .ज्या अर्थी आपल्यापैकी बहुतेक जण "मी" व "माझे" यांनी बनलेले आहेत  त्या अर्थी आपल्या जीवनात स्मरणाला अतिशय महत्त्व आहे .जर तुम्हाला स्मरण नसेल तर तुमची मालमत्ता तुमचे कुटुंब तुमच्या कल्पना यांना काहीही महत्त्व रहाणार नाही.मी व माझे यांना बळकटी देण्यासाठी तुम्ही स्मरण मशागत करता .जर तुम्ही निरीक्षण कराल तर तुम्हाला असे आढळून येईल की दोन विचार दोन भावना यामध्ये लहानशी फट असते ही फट स्मरण नसते.या फटीमध्ये "मी" व "माझे" यापासून असामान्य स्वातंत्र्य असते .ही फट कालरहित असते.

आपण या समस्येकडे निराळ्या दृष्टीने पाहू या .स्मरण म्हणजेच काल नव्हे काय?स्मरणामुळे कालचा दिवस आजचा दिवस व उद्याचा दिवस निर्माण होतो .स्मरणामुळे काल आज उद्या निर्माण होतात .कालचे स्मरण आजला आकार देते त्यातून उद्याची रचना होते.म्हणजेच भूतकाल वर्तमानातून भविष्याची निर्मिती करतो.काल प्रक्रिया सतत चालू असते .काल प्रक्रिया म्हणजेच काहीतरी बनण्याची वा असण्याची इच्छा होय .स्मरण म्हणजेच काल व या कालातून आपण काहीतरी इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतो.मी आज कारकून आहे व जर मला वेळ मिळेल तर मी उद्या व्यवस्थापक किंवा मालक बनेन.म्हणजेच मला वेळ पाहिजे .या चालीवर आपण म्हणतो की "मी"सत्य प्राप्ती करून घेईन .मी ईश्वरा प्रत जाईन ."याचाच अर्थ मला सत्य दर्शनासाठी वेळ पाहिजे .मला स्मरण मशागत केली पाहिजे .मला शिस्त पालन केले पाहिजे .मला काहीतरी बनायचे आहे . मला काहीतरी मिळवायचे आहे.मला काहीतरी व्हायचे आहे. यासाठी मला वेळ पाहिजे . हे सर्व प्रत्यक्षात मिळविण्यासाठी कालातील सातत्य आवश्यक आहे.कालातून आपण कालरहित मिळवण्याचा प्रयत्न करतो .कालातून अापण अंतिमता मिळविण्याचा प्रयत्न करतो . तुम्ही अंतिमता, सत्य, ईश्वर, कालरहित वस्तू , किंवा तुम्ही जे काही म्हणाल ते, या प्रक्रियेतून मिळवू शकाल काय ? अंतिमता कालाच्या जाळ्यामध्ये पकडणे शक्य आहे काय ?स्मरणात सत्य पकडता येई काय ?स्मरण म्हणजे "मी" व "माझे"जेव्हा नष्ट होते तेव्हा काल रहितता अस्तित्वात येते .जर तुम्ही यातील सत्य खरोखरच पहाल कि कालातून कालरहित कधीच प्राप्त होणार नाही किंवा समजणारही नाही तर आपण या समस्येत जास्त खोलवर जाऊ शकतो .तांत्रिक स्मरण भौतिक स्मरण आवश्यक आहे .परंतु ज्यामुळे "मी" व "माझे" यांचे रक्षण केले जाते, ज्यामुळे स्वतःचे दृढीकरण होते, ज्यामुळे "मी"चे सातत्य राखले जाते, ते हे मानसिक स्मरण ,जीवनाला व सत्याला अत्यंत मारक आहे.जेव्हा एखादा यातील सत्य पहातो तेव्हा असत्य आपोआपच गळून पडते .मग गेल्या दिवसाच्या अनुभवांचा मानसिक संग्रह केला जात नाही.

तुम्ही सुंदर सूर्यास्त पाहता, शेतांमधील सुंदर वृक्ष पाहता ,किंवा आणखी कोणतेही सुंदर नैसर्गिक दृश्य पाहता ;जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे प्रथम पाहता,तेंव्हा तुम्हाला जो आनंद होतो ,तो पुन्हा जेव्हा त्याकडे पाहता तेव्हा होत नाही.तुम्ही एकदा पाहिलेले सुंदर दृश्य पुन्हा पहाण्याची वासना ठेवता .ही वासना मनात ठेवून पुनः  तोच आनंद मिळविण्याच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही एखाद्या दृश्याकडे पाहता  तेव्हा तुम्हाला तो पूर्वीचा आनंद मिळत नाही .कारण हे कालाचे स्मरण मध्ये येते .ती वासना ती आनंद उपभोगण्याची वासना तुम्हाला ढकलीत असते. तुमच्या जवळ सूर्यास्त प्रथम पाहताना स्मरण नव्हते .फक्त तात्कालिक समज व रसग्रहण होते .प्रत्यक्ष जबाब होता .आज तुम्ही पुन्हा तो कालचा दिव्य अनुभव पकडण्याचा प्रयत्न करता.म्हणजेच तुम्ही व सूर्यास्त यांमध्ये स्मरण उभे असते.त्यामुळे तुम्हाला तो आनंद उपभोगता येत नाही. तुम्हाला कालचा आनंद मिळत नाही .सौंदर्याची संपूर्ण संपन्नता व श्रीमंती तुम्हाला मिळत नाही.तुम्हाला एक मित्र आहे त्याने तुमची स्तुती केली आहे किवा अपमान केला आहे .तुम्ही त्या स्मरणाचे जतन करता .जेव्हा तुम्हाला पुन्हा मित्र भेटतो त्यावेळी तुम्ही ते स्मरण लक्षात ठेवून त्याला भेटता. त्या स्मरणातून तुम्ही त्याला भेटता.तुम्ही मित्राला खरोखर भेटत नाही तर स्मरणा बरोबर वाहावत जात असता .त्यामुळे सर्व घोटाळा होतो .अशा प्रकारे आपण आपल्या क्रियांना स्मरणाने सतत वेढीत असतो .त्यामुळे ताजेपणा व नाविन्य हरवून बसतो .अशाप्रकारे स्मरणा मुळे जीवन कंटाळवाणे रिकामे मद्दड बनविले जाते ."मी" व "माझे" स्मरणातून बळकट केले जाते.यामुळे आपण सतत एकमेकांना विरोध करीत जगत असतो .आपण स्मरणाला वर्तमानातून जीवन देतो .जेव्हा आपण स्मरणाला जीवन देत नाही तेव्हा ते आपोआपच नष्ट होते .भौतिक स्मरण तांत्रिक स्मरण ही आवश्यक गोष्ट आहे .मानसिक संग्रह म्हणून स्मरण हे जीवन समजण्यासाठी मारक आहे .एकमेकांजवळ खरे दळणवळण प्रस्थापित होण्यासाठी ते मारक आहे .

++++++++++++++++++

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत