प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं
प्रश्न --मनाच्या शांततेबद्दल तुम्ही का बरे बोलता?हा स्थिरपणा म्हणजे काय ?
उत्तर--जर आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असेल, जर आपल्याला एखादी गोष्ट खरीच समजावी असे वाटत असेल, तर मन स्तब्ध असणे आवश्यक नाही काय ?जर आपल्याला एखादी समस्या असली तर आपण त्याबद्दल सारखी काळजी करतो. काळजी करीत नाही काय? आपण त्या समस्येत खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो .आपण त्यांचे विश्लेषण करतो.अापण त्याचे निरनिराळे विभाग पाडतो. अापण त्याचे तुकडे तुकडे करतो .आशा करतो की ती समस्या आपल्याला समजेल.अशा प्रयत्नातून विश्लेषणातून, तुलनेतून, कुठच्याही प्रकारच्या बौद्धिक झगड्यातून, समज प्राप्त होते काय?जेव्हा मन अत्यंत स्तब्ध असेल तेव्हाच खरी समज येते .जर आपण एखाद्या प्रश्नाशी जास्त झगडलो, उदाहरणार्थ उपासमारीचा युद्धाचा किंवा आणखी कुठला एखादा प्रश्न घ्या ,जर आपण त्याचे जास्त विश्लेषण केले, त्याच्याशी जास्त झगडा केला, तर तो आपल्याला जास्त समजेल काय?अापण मात्र जास्त झगड्यातून जास्त समजेल असे म्हणतो.ते खरे आहे काय ?युद्धे झगडे भूकबळी इ. समस्या शतकानुशतके चालूच आहेत . आत व बाहेर सतत युद्ध चालू आहे .हा विरोध हे युद्ध हा झगडा आपण आणखी झगडून आणखी विरोध करून आणखी धडपडून थांबवू शकू काय ?एखादा प्रश्न आपण त्याला जेव्हां प्रत्यक्ष भेटतो, वस्तुस्थितीच्या समोर आपण जेव्हां प्रत्यक्ष असतो, तेव्हाच आपल्याला समजतो ?मन व वस्तुस्थिती यांच्यामध्ये जेव्हा लुडबुडणारी, चुळबुळ करणारी,मनाची धडपड नसेल तेव्हाच आपण वस्तुस्थितीला प्रत्यक्ष भेटू शकू .जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर मनाचा स्तब्धपणा अत्यावश्यक आहे .
तुम्ही आता स्वाभाविकपणे व अपरिहार्यतेने विचाराल की मन स्तब्ध कसे काय करता येईल ?लगेच ही प्रतिक्रिया निर्माण होत नाही काय?तुम्ही म्हणता माझे मन सारखे चळवळ करीत असते मी ते कसे काय निस्तरंग करू शकेन?कुठलीही एखादी पद्धत मनाला निस्तरंग करू शकेल काय?एखादे प्रमेय एखादी शिस्त मन स्तब्ध करू शकेल काय?होय ती करू शकेल, परंतु जेव्हा मन असे निस्तरंग केलेले असते, तेव्हा ते खरोखरच परम शांत स्तब्ध असते काय?का असे मन एखाद्या प्रणालीत, एखाद्या वाक्यात, एखाद्या कल्पनेत, फक्त बंदिस्त केलेले असते .असे मन हे खरोखरच मृत मन असते.ते तसे नसते काय ?यामुळे बरेचसे लोक जे आध्यात्मिक बनू इच्छितात, तथाकथित अध्यात्मिक बनू चाहतात ,त्यांचे मन वस्तुत: मृत असते. त्यांनी मनाला स्तब्ध राहण्याची शिस्त लावलेली असते .त्यांनी मनाला तसे वळण दिलेले असते. त्यानी एखाद्या वाक्यात एखाद्या कल्पनेत स्वतःला कोंडून घेतलेले असते.असे मन खरोखरच कधीही स्थिर नसते.ते फक्त दाबून स्तब्ध केलेले असते .
जेव्हा मन स्तब्ध असते तेव्हाच खरी समज येते .हे सत्य मन जेव्हा खरेच पाहते उमजते तेव्हा ते स्तब्ध होते .जर मला तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर मी निस्तरंग पाहिज़े .तुमच्या बद्दलच्या कुठच्याही पूर्वग्रहांनी प्रतिक्रियांनी मी ग्रासलेला असता कामा नये.त्याप्रमाणे मी स्वतःचे सर्व निर्णय निश्चय मते बाजूला ठेवली पाहिजेत . तेव्हाच मी समोरासमोर तुम्हाला भेटू शकेन.अशा प्रकारे जेव्हा माझे मन धारणेपासून स्वतंत्र असेल तेव्हाच मला खरी समज येईल. मन जेव्हा यातील सत्य पहाते तेव्हा मन आपोआपच स्तब्ध होते . मन कसे स्तब्ध करावे हा प्रश्नच शिल्लक रहात नाही.कल्पना करण्यापासून फक्त सत्यच मनाला स्वतंत्र करू शकेल .जोपर्यंत मन चळवळ करीत आहे, ढवळलेले आहे, तोपर्यंत समज अशक्य आहे.ही वस्तुस्थिती मनाला समजली पाहिजे म्हणजे ते सत्य पाहू शकेल .मनाची शांतता, मनाचे निस्तरंगत्व, मनाची स्तब्धता, ही इच्छाशक्तीने, वासनेने, मिळविता येण्यासारखी गोष्ट नाही . जर स्तब्धता इच्छाशक्तीने आणलेली असेल तर असे मन प्रत्यक्षात स्तब्ध नाही .ते मृत आहे .ते बंदिस्त आहे. ते दाबून ठेवलेले आहे.आणि म्हणूनच ते तरलता, तत्परता, गतिमानता, चपळता, विलक्षण जुळवून घेता येण्याची असामान्य शक्ती, यांना वंचित आहे. ते असमर्थ आहे.असे मन सृजनशील नसते .
तेव्हा आपली समस्या मन स्तब्ध कसे करावे ही नसून, प्रत्येक समस्या आपल्यासमोर जसजशी येईल,तसतसे त्यातील सत्य पाहणे ही आहे .एखादे तळे वारा थांबल्यानंतर जसे आपोआप निस्तरंग होते तसे हे आहे .आपले मन चळवळ करीत असते. उतावळे बनलेले असते कारण त्याच्या पुढ्यात असंख्य समस्या आहेत .आणि या समस्या टाळण्यासाठी आपण मन शांत करतो .मनाने या समस्या निर्माण केलेल्या आहेत. वस्तुतः समस्या मनाहून वेगळय़ा नाहीत .जोपर्यंत मन संवेदनाक्षमतेबद्दलच्या कल्पना रचित आहे, स्तब्धता प्राप्तीसाठी शिस्ताचरण करीत आहे, तोपर्यंत ते कधीही स्तब्ध होणार नाहीं .जेव्हा मनाला स्तब्ध असल्यामुळे समज येते हे खरोखरच उमजते, तेव्हा ते आपोआपच स्तब्ध होते .ही शांतता लादलेली नसते .ती शिस्तीने आणलेली नसते .ती अशी शांतता असते कि जी धडपड्या चळवळ्या उतावळ्या ढवळलेल्या मनाला कधीही कळणार नाही.
ज्याना मनाची शांतता हवी असते असे बरेच जण गतीमान क्रियाशील जीवनातून स्वतःला बाहेर काढून खेडे गुहा मठ यांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात .किंवा स्वतःला एखाद्या कल्पनेत एखाद्या श्रद्धेत कोंडून घेतात .किंवा ज्या लोकांपासून त्यांना त्रास होतो त्यांना ते टाळण्याचा प्रयत्न करतात .असा एकाकीपणा असे निराळे पडणे अशी संबंध मयता टाळण्याचा प्रयत्न करणे ही मनाची शांतता नव्हे.एखाद्या कल्पनेत कोंडून घेणे किंवा ज्या लोकांपासून त्रास होतो जीवन गुंतागुंतीचे त्रासदायक बनते त्यांना टाळणे त्यामुळे मन स्तब्ध होत नाही.जेव्हा संग्रहाद्वारे वेगळे पाडणारी क्रिया अस्तित्वात नसते परंतु संबंध मयतेच्या संपूर्ण प्रक्रियेची संपूर्ण समज असते फक्त तेव्हाच मनाला शांतता प्राप्त होते .संग्रह प्रक्रियेतून मन वृद्ध बनते .जेव्हा मन नवीन असते जेव्हा मन ताजेतवाने असते जेव्हा संग्रह प्रक्रिया अस्तित्वात नसते तेव्हा मन नितांत शांत होण्याची शक्यता आहे .असे मन मृत नसते तर ते अत्यंत गतिमान असते .स्तब्ध मन हे अत्यंत तरल मन असते . जर तुम्ही याच्याशी प्रयोग केलात, जर तुम्ही यात खोलवर गेलात, तर तुम्हाला असे आढळून येईल की त्या स्तब्धतेत विचार रेखाटन बिलकुल नसते .सर्व पातळ्यांवरील विचार म्हणजे स्मरण प्रतिक्रिया होय .असा विचार कधीही सृजनशील स्थितीत असणे शक्य नाही.तो सृजनशीलतेचे वर्णन करू शकेल परंतु तो स्वतः सृजनशील असणे शक्य नाही . कशाचाही परिणाम नाही अशी शांतता जेव्हा असेल, कशाचाही परिणाम नाही अशी निस्तरंगता जेव्हा असेल , तेव्हा त्या स्तब्धतेत चळवळ्या मनाला जी कधीही कळणार नाही अशी असामान्य गतिमानता क्रियाशीलता असते असे आपल्याला आढळून येईल . त्या स्तब्धतेत काहीही बनत नसते ,कोणतीही कल्पना नसते ,तिथे स्मरण नसते, अशी स्तब्धता ही सृजनशील स्थिती असते .जेव्हां"मी"च्या संपूर्ण प्रक्रियेचे सर्वांगीण आकलन होईल ,समज येईल, तेव्हाच ती सृजनशील स्थिती अनुभविता येईल ."मी"च्या समजण्याशिवाय त्या स्तब्धतेला काही अर्थ नाही.जी कशाचाही शेवट नाही, जी कशाचाही परिणाम नाही, अश्या त्या स्तब्धतेत अंतिम व काल रहित अशा त्या वस्तूचा शोध लागतो .
++++++++++++++++++