आडीं जैसें असे पोहर्यांत...
आडीं जैसें असे पोहर्यांत येतसे । अंतर्बाह्य वसे साक्ष एक ॥१॥
कूपीं कटु नीर दुरुक्त बाहेर । गढूळ निर्मळ तैसें तैसें ॥२॥
वरपांगी वेष टिके ना कसास । होत उपहास जगीं सर्व ॥३॥
अंतरीं जे शांति संतांची विभूति । वरकड माती आडंबर ॥४॥
असे तें येतसे देतां धन जैसें । निर्धन तें कैसें काय द्यावें ॥५॥
धर्मीं धर्मदान दाखविती वर्म । अधर्मी अधर्म वाढविती ॥६॥
रोगी वाढविती रोगाचें प्रमाण । पापी पाप जाण तैसें जगीं ॥७॥
दुर्बल दौर्बल्य निश्चयी निश्चय । हरिरंगी सत्य ’रंग’ तैसा ॥८॥