अरण्य पट्टण दोन्हीं सम आम...
अरण्य पट्टण दोन्हीं सम आम्हां । निरिच्छ नितांत पूर्णकामां ॥१॥
झोंपडी महाल सम पाही मन । मंचक अजिन भेद कोण ॥२॥
शाल चिंध्याकंथा तनु दिगंबर । कस्तूरी उटणें भस्मसार ॥३॥
इंद्रियकटक सेवेसी सादर । भूतमात्र येर बद्धकर ॥४॥
वृक्ष फळफूल निर्झर जीवन । देऊनी पोषिती पंच प्राण ॥५॥
पक्वान्नाची चाड कोण करी मना । तिळभरी मागों नेणों जनां ॥६॥
दिवारात्री सूर्यचंद्र पहारेगीर । करी केरझाड सुसमीर ॥७॥
इंद्र मागे आज्ञा वंदुनी चरण । कुबेर भंडारी सिद्ध जाण ॥८॥
व्याल व्याघ्र येती वस्तीसी राहती । सुस्वरें ते गाती पक्षीजाती ॥९॥
मयूर नाचती केका ऐकवितो । गंधर्वाप्सरसां लाजविती ॥१०॥
आप्तपर भाव पूर्ण मावळला । एषणांचा नग भस्म झाला ॥११॥
येती जाती सारे मायिक नश्वर । ’रङग’ तोचि एक श्रेयस्कर ॥१२॥