कविता
मनोज शिरसाठ
अस्ताणे,ता.मालेगांव,जि.नाशिक, ७०२८५४२६४४
ही उद्ध्वस्त झालेली शहरं,
ही मोडकळीस आलेली माणसं,
हा वाळवी लागलेला सूर्य,
हा जीवनाचा जळलेला चेहरा,
ह्या मर्यादेत नास्तिकता जोपासलेल्या परंपरा ,
ही पोटात गुडघे दुमडलेली भीती,
ही स्वतःशीच बेईमान आतली वादळं,
हा नकळत सुटकेसाठी किंचाळणारा आक्रोश,
हा परिवर्तनाच्या फटीत चिमटलेला आत्मा,
हा काळोखाचा चवताळलेला फुत्कार,
ह्या शेवाळलेल्या यातना,
हा गार होत चाललेला आकलनाचा देह,
ही गर्भ फाडून आतच प्रसवणारी स्वायत्तता,
ही सारखी जागा बदलणारी तत्वांची रेती,
ह्या ज्ञानांच्या वाढलेल्या अतिरिक्त पेशी,
ही मुक्तीसाठी भक्तीचा माथा फोडण्याची सक्ती,
हा सराईत गुन्हेगारासारखा वागणारा पश्चात्ताप,
हा भोगाच्या सहवासाने गाभुळलेला त्याग,
ही कुबट ओलाव्यानं आलेली माणुसकीची बुरशी,
हा चिरफटून फरफटणारा जिव्हाळा,
हे भर गर्दीत स्पर्शणारे बलात्कारी डोळे,
हा वासनेचा सत्संग,
हा बुद्धीच्या फळ्यावर बदलणारा रोजचा कुविचार,
हा मौनाने पाळलेला हिंसेचा बंद,
हा दुःखाहूनही कठोर झालेला आनंद,
ह्या बंडाच्या झेंडा लावलेल्या जातीच्या पारख्या,
हे संशयाचं वाढत चाललेलं सार्वभौमत्व,
अन् असं बरंच काही...
तरीही तू म्हणतोस..
कुठे काय?काहीच नाही...