फेअर अँड लव्हली
वंदना मत्रे
एस.एन. डी.टी वुमन युनिव्हसिटी
नवी मुंबई
नेहमीप्रमाणे मी सकाळचे वाॅक करून एका बाकावर बसले होते.सकाळची सूर्याची कोवळी किरणे पाहून मन खूप प्रसन्न होत होते. आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडी मनाला आणि शरीराला गारवा प्रदान करत होती. तिथेच बाजूच्या बाकावर दोन बायका गप्पा मारत बसल्या होत्या. गप्पा छान रंगल्या होत्या. अगदी कॉलेजच्या वर्षांपासून ते विषय थेट लावल्या जाणाऱ्या क्रीम आणि फेसवॉश वर येऊन थांबला होता. त्यातली एक बाई फक्त साबण वापरात होती. तर दुसरी साबण आणि फेअर अँड लव्हली अशी दोन सौंदर्य प्रसाधने वापरात होती.दोघींचा विषय चांगलाच रमला होता. विषय पुढे सरकत सरकत थेट त्यांच्याच इमारतीत राहत असणाऱ्या आजूबाजूच्या बायकांवर येऊन पोहचला.कोण कोण आजूबाजूचे काय काय मागायला येते. दोघीपण एकमेकींबरोबर बोलताना "कुणाला बोलू नको " ह्या वाक्यानेच बोलायला सुरुवात करत होत्या. एकमेकींना मनातले सांगत होत्या. कोण तिन्हीसांजेला येते ,तर कोण दुपारी ,तर कोण सकाळी सारखे कुणी ना कुणी असतेच. काही ना काही मागायला. अशा काही ठराविक शेजाऱ्यांबद्दल एकमेकींजवळ तक्रार करत होत्या. त्यातली एक बाई दुसरीला" तिन्हीसांजेला हे पदार्थ बाहेर देत जाऊ नकोस त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते"असा सल्ला देत होती. कुणीही मागायला आले तर सरळ "माझ्याकडे नाहीये "असे ठामपणे सांगायचे. असाही सल्ला दिला. दोघींची घरी जाण्याची वेळ झाली होती. म्हणून दोघीही उठल्या आणि घरच्या दिशेने चालू लागल्या.
मी मात्र सगळे काही ऐकून घेतले होते. सगळे संभाषण ऐकून मन खिन्न झाले होते. स्वतःची स्किन गोरी गोमटी व्हावी. सतेज आणि चमकदार दिसावी म्हणून मार्केट मध्ये येणाऱ्या नवनवीन सौंदर्य प्रसाधने वापरून आपण आपल्या चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेत असतो. जसे जग बदलेल तसे आपण स्वतःलाही बदलत असतो. पण पिढय़ानपिढय़ा मनात ठासून भरलेली भीती किंवा अंधश्रध्दा आपण का स्वच्छ करत नाही. ईश्वर आपल्या आजूबाजूला सामावलेला आहे. त्यांचे अस्तित्व आजूबाजूच्या हालचाली मधून जाणवत असते. म्हणून आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देव्हाऱ्यात दिवा लावतो. पण त्याच तिन्हीसांजेला किंवा सकाळी कुणी याचक आपल्या दारात आला तर त्याला सरळ नाही बोलून माघारी पाठवतो. का तर घरातील लक्ष्मी बाहेर जाईल म्हणून.
सृष्टीचा पालनकर्ता विष्णू ह्याने म्हंटले आहे. "वेळ , परिस्थिती ,नातेवाईक, सगेसोयरे न पाहता फक्त स्वतः चे कर्तव्य करत राहा., त्यामुळे दारात आलेला याचक तो आपला कोण लागतो हा विचार करून त्याला पाहिजे ते देण्यापेक्षा तो कोणीही असला तरी तो एक माणूस आहे. अन त्याला आपल्या मदतीची गरज आहे. असा विचार करून आपल्यातला माणूस जागृत करून त्या याचकाला मदत करा. "मग बघा कशाला आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाईल. त्या याचकाच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हसू हीच आपली खरी लक्ष्मी असते. चेहऱ्यावरचे डाग फेअर अँड लव्हली लावून स्वच्छ करणयापेक्षा आपल्या मनातील भीतीचे डाग , अंधश्रद्धेच्या मृत पेशी चांगल्या विचारांची आणि कर्तव्याची फेअर अँड लव्हली लावून स्वच्छ करा. त्यामुळे तुमचे मन फेअर होईलच त्याचबरोबर तुमचे विचार सुद्धा खऱ्या अर्थाने लव्हली होतील.
सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर आणि निरागस मन हेच खरे जीवनाचे सौन्दर्य आहे.