Get it on Google Play
Download on the App Store

भरत उपासनींच्या चारोळ्या

भरत उपासनी
एम.ए.बी.एड.(मराठी)

नाशिक आकाशवाणीचे लोकप्रिय लेखक.संध्यारंग,विचारधन,कीर्तनरंग,नाशिकचा मंदिर वारसा ह्या मालीकांचे नाशिक आकाशवाणीसाठी लेखन केले.आजपर्यंत विविध नियतकालीके,दिवाळी अंक ह्यातून लेखन प्रसिद्ध,काही कथा आणि कवितांना प्रथम पुरस्कार,दिलीपराज प्रकाशनातर्फे बालकथांची पुस्तके प्रसिद्ध,जळगाव,धुळे,नाशिक आकाशवाणीवर कथाकथन,काव्यवाचन.
 
भयभीत...!    
मन सतत धास्तावलेलं...
आशंकेने त्रस्तावलेलं...!
सुरक्षेच्या आकांक्षेने..
बिचकत बिचकत खचलेलं...!

लाट...!
जे लाटेवर जन्माला येतं..
ते लाटेवरच विरून जातं..!
लाट क्षणभंगुराचे चिन्ह असते..
लाटेची नेहमीच वाट लागते..!

वजाबाकी..!
अस्तित्वातून अहंकार..
वजा करता येईल का..?
'मी'ची किंमत थोडी…
कमी करता येईल का..?

'मी' ची बातमी…!
बाते बातेत मी असतो..
म्हणून माझी बात'मी' असते..!
मी सोडून बातच नसते..
म्हणून बातमीसुद्धा 'मी'चीच असते...!

बातमी...!
'मी' ' माझंचं' केव्हढं ओझं...
वाहून वाहून थकलंय राजं...!
आता वाईच जरा गठूडं बाजूला ठिवा की..
आन् 'मी' सोडून 'बातमी' सांगा की..!

अंतराळ...!
आपण समजतो तितकं...
माणसाचं मन सरळ नसतं..!
जसंजसं शिरावं खोलात..
तसं ते विशाल अंतराळ असतं...!

चलाख...!
सगळा सरंजाम जुळवून..
कवी बसतो पहात शब्दांची वाट..!
पण कधीकधी शब्द इतके चलाख,कि,
हुलकावणी देऊन जातात उडून..अंतराळात...!

जपणुक...!
माणसाचं बाळ म्हणजे साक्षात ईश्वर आहे...
ते जपलं तर इहलोकीच स्वर्ग होणार आहे..!
व्यवस्थेचे रंग लावून त्याचा नर्क करू नका..
दिवाळीला होळीचा अर्क करू नका...!

अमृतकुम्भ..!
आपण सगळे प्रेमाने जगू या..
एक दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवू या..!
एकमेकांच जगणं सुसह्य करू या..
मृत्युलोकात अमृताचा कुंभ प्राशु या..!

बोलणं..!
सगळ्याचं सगळंच बोलणं..
विचारात घ्यायचं नसतं..!
साबणाच्या फुग्यासारखं काही..
हवेत सोडून द्यायचं असतं..!

कोल्हेकुई...!
सिंहाचं कातडं पांघरलेल्या..
कोल्ह्यांची संख्या वाढली..!
कोल्हेकुईने रान माजलं..
गर्जना कधीच विरली..!

दांभिक...!
शब्दांचे पुजारी तरी..
कुठे शब्दांचे पुजारी वाटतात..!
शब्दांच्या काथ्याकुटात ...
अर्थ हरवून बसतात..!

लुटारू...!
चोरांच्या क्लुप्तीखोर मनांनी..
जग मोठया प्रमाणात लुटलं आहे..
जिवंतपणीच मन विटलं आहे..
जागोजागी फाटलं आहे..!

भिंती..!
तुटतील का कधी..
माणसाच्या मनातील भिंती..
कि केवळ आदर्शच राहील..
वाचलेला शब्द..'प्रीती'..!

सत्वशील..!
न चालणारं नाणं..
मी खिशात घेऊन फिरतो..
वारंवार प्रश्न पडतो..
मी कोणत्या युगात जगतो..?

श्वान...
वळवळणारी शेपटी, लसलसणारी जीभ आहे....
तरी हाड हाड म्हणून भिकार आहे...
कुत्र्यासारखीच इथली जिंदगी..
लाचार आणि बेकार आहे..!

प्रश्नचिन्ह..!
चिमुकल्या आयुष्याने...
इतकं का छळावं ...?
क्षणोक्षणी प्रश्न..
आता कसं जगावं..?

कावरंबावरं..!
पान पडलं तरी..
आभाळ पडलं म्हणणारं...!
सशासारखं धावणारं..
मन कावरंबावरं पळणारं...!

किंमत
लोखंडालाही भट्टीत तापवून ठोकतात..
सोन्यालाही जाळावर तापवून ठोकतात..!
वस्तू दोघांच्याही तयार करतात..
पण किंमती मात्र वेगळ्या असतात....!

साक्षी...!
वर्तमानाच्या वीटेवर...
स्थिर हो ,उभा रहा..!
आयुष्याचा प्रवाह..
साक्षी होऊन पहात रहा..!

स्थैर्य..!
मना जरा थांब रे..
वर्तमानाच्या वीटेवर..!
समचरण उभा रहा..
हात ठेव कटेवर..!

धाव..!
मनाला भविष्याचं...
इतकं वेड का असतं..?
हातचं सोडून पळत्यामागे..
सारखं धावत असतं..!

सिद्धांत..!
आपण आपल्या जागी ठीक असलो ...
म्हणजे सगळ्या गोष्टी मिळतात..!
सळसळणाऱ्या नद्या जशा..
अखेर सागरालाच मिळतात..!

उतावीळ..!
अपेक्षित आत्ताच मिळावं..
ही मनाची एक लय असते..!
एकदम भविष्यावर झडप घालण्याची..
त्याची वेडी सवय असते..!

सावध...!
अपेक्षितावर झडप घालण्यासाठी..
मन कसं टपलेलं असतं..!
जसं उंदराची वाट पाहत मांजर..
बिळाबाहेर बसलेलं असतं..!

परिस..!
तुझ्या आयुष्याच्या लोखंडाला..
प्रत्येक क्षणाचा परिस लावून पहा..!
निश्चितच गवसेल सुवर्णक्षण..
उजळतील मग दिशा दहा..!

प्रयत्न..!
वाळूचे कण रगडायचे..
त्यातून तेल काढायचे..!
शिंग सशाचे शोधायचे..
यालाच आयुष्य म्हणायचे..!

कर्मयोग...!
क्षणामागून क्षण,दिवसामागून दिवस..
असं का आयुष्य काढायचं..?
अंधाराला लाथ मारत..
सूर्यासारखं तळपायचं ...!

कविता...!
आयुष्यात कितीदा बावरलो..
रडलो,ओरडलो,कसातरी सावरलो..!
विदुषकासारखा भेलकांडत चाललो..
हसूआसू, छायाप्रकाश, कविता लिहित राह्यलो !

साधना...!
आयुष्य म्हणजे जगण्याची..
कोणी केलेली सक्ती नाही..!
हा तर साधनापथ आहे..
चालल्याशिवाय मुक्ती नाही..!

चरफड
हा भडका ही भगभग...
ही जळजळ ही तडफड..!
कशासाठी काळजात..
ही चालू असते चरफड..?

यज्ञकुंड...!
काळजाच्या आत आत...
जणू यज्ञकुंड पेटतात..!
टाकावी ज्याची आहुती..
ते सगळं होतं भस्मसात..!

रुखरुख...!
आपण विकारी असू नये..
ही आपली अंतःस्थ भूक असते...!
पण विकार वारंवार झडप घालतात..
ही काळजातली रुखरुख असते...!

अक्षरं..!
अक्षरं हसतात,अक्षरं रुसतात...
खरंच ही अक्षरं नेमकी कुठून येतात..?
ह्या अक्षरांचे लगाम जणू...
त्या प्रतिभेच्या हातात असतात...!

काळ..!
घडयाळ सुरु होतं,घडयाळ सुरु आहे..
पुढेही घडयाळ सुरूच राहील..!
तेव्हा मी नेमका कुठे बरं जाईल..?
जेव्हा फक्त घडयाळ सुरु राहील..!

आरंभ : दिवाळी अंक २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक ८ सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!! संपादकीय आरंभ - मराठी ई साहित्यातील नवे पर्व! सर्वोच्च स्वागत एक पणती वंचितांसाठी उजळो दिवा चोहीकडे…! व्यंगचित्रे १ व्यंगचित्रे २ व्यंगचित्रे ३ उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ सुख आणि दु:ख समाज माध्यम आणि मी लक्ष्मीच्या पाऊलखुणा दिवाळी ओझे पुनर्जन्माचे फेअर अँड लव्हली कथा दिवाळीच्या अरोग्यमय दीपावली दीपावली कूटकथा: पलीकडचा मी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय... भामटा माजघर (आगरी कविता) 'ती' अशक्त नाही शुभेच्छा एका चिमुकलीला भरत उपासनींच्या चारोळ्या पेपरवाला 'सण दिवाळी' कविता दिवाळीनंतरची मनातील कविता असेही काही क्षण येतील तेव्हा... बाप्पा जगताय का तुम्ही...? काय आहेस तू ! कविता नवा प्रवास