Android app on Google Play

 

सर्वोच्च स्वागत

 

वैष्णवी सविता सुनील

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ मधील अनुच्छेद रद्दबातल ठरवला. दोन प्रौढ व्यक्तींमधील सहमतीने झालेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा हा अनुच्छेद होता. हा निर्णय घेणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह न्या.धनंजय चंद्रचूड , न्या.इंदू मल्होत्रा, न्या.आर.एफ. नरीमन , न्या. अजय खानविलकर यांचा समावेश होता. हा निर्णय एकमताने झाला असला तरी न्या. चंद्रचूड, न्या. मल्होत्रा आणि न्या. नरीमन या तिघांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली आहेत.

आपल्याकडे इतर अनेक मुद्द्यांप्रमाणे लैंगिकता या विषयाबद्दलही पराकोटीची दांभिकता दिसून येते. लैंगिकतेविषयी बोलणे , लैंगिक संबंधांविषयी बोलणे ही गोष्ट आजही आपल्या समाजात 'अनैतिक' मानली जाते. अशा परिस्थितीत समलैंगिकता अनैसर्गिक वाटणे, गुन्हा ठरवणे , विकृती ठरवणे हे साहजिकच. खरे तर मानवी लैंगिकता ही संपूर्णपणे खाजगी गोष्ट आहे. चार भिंतीच्या आत आपण काय करायचे , आपल्या शरीराला कोणी स्पर्श करायचा हा ज्याचा-त्याचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचे स्वातंत्र्य हे ज्या-त्या व्यक्तीचेच आहे. परंतु आपल्या समाजाने स्त्रीने पुरुषाशीच संबंध ठेवावेत, पुरुषाने स्त्रीशीच संबंध ठेवावेत तेही लग्नानंतर अशी 'नैतिक' चौकट आखून ठेवली आहे. त्यामुळे स्त्रीने स्त्रीशी संबंध ठेवणे, पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवणे याकडे विचित्र दृष्टीने पाहिले जाते.

मुळात समलैगिकता ही तितकीच नैसर्गिक गोष्ट आहे जितकी स्त्री-पुरुष संबंध. पण वर्षानुवर्षे याची बहुसंख्यांकांनी उपेक्षाच केली आहे. यामुळेच अनेक जण आपल्या लैंगिकतेबद्दल न्यूनगंड बाळगून वावरत असतात. आपल्या लैंगिकतेबद्दल ते आपल्या पालकांशीही बऱ्याचदा बोलू शकत नाहीत आणि योग्य माहिती , ज्ञान नसल्याने पालकही आपल्या पाल्याची लैंगिकता समजू शकत नाहीत. एकूणच समाजात एलजीबीटीक्यू या समाजाबद्दल अज्ञान आणि गैरसमज असल्याने आपण त्यांना सहजपणे स्वीकारू शकत नाही. आजच्या डिजीटल युगातही एखाद्याच्या लैंगिक निवडीचा मुद्दा हा त्याच्या अवमानाचा आणि खच्चीकरणासाठी वापरला जातो.

गेली १५८ वर्षे कलम ३७७ मधील समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या अनुच्छेदामुळे या व्यक्तींना , त्यांच्या कुटुंबियांना मनस्ताप, अन्याय सहन करावा लागला. मानवी लैंगिकता , प्रेमभावनेच्या पोषणाचा अधिकार त्यांना मिळू शकला नाही. हा अनुच्छेद व्यक्तींच्या खाजगीपणाच्या हक्काचा संकोच करून त्याला गुन्हेगार ठरवण्याचे सोपे हत्यार म्हणून वापरला गेला, असे न्या. चंद्रचूड यांनी नमूद केले आहे.

या अन्याय्य अनुच्छेदामुळे या एलजीबीटीक्यू समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. इतर नागरिकांप्रमाणेच त्यांनाही घटनेने हक्क दिले आहेत. ते हक्क आजपर्यंत नाकारण्यात आले. त्यांना कायम दुय्यम नागरिक समजण्यात आले. कोणताही गुन्हा केला नसताना केवळ आपली लैंगिकता ही समाजाच्या 'नैतिक' चौकटीत बसत नाही म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवलं जात होतं. परंतु हा अनुच्छेद रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या समाजातील सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे.

प्राचीन ऐतिहासिक काळापासून समाजात प्रतिष्ठेने नांदत असलेल्या या समाजाला इंग्रजांच्या काळात नाकारले गेले. त्याच इंग्रजांनी त्यांच्या देशामध्ये मात्र या समाजाला स्वीकारले. पण आपण मात्र त्यांना ब्रिटिशांनी लादलेल्या कायद्यांनुसार झिडकारत आलो आणि अजूनही झिडकारत आहोत. समलिंगी संबंधांना मान्यता मिळवून देण्याबाबत अनेक संघटना, सेवाभावी संस्था बरीच वर्षे झगडत आहेत. आज त्यांच्या लढ्याचा एक टप्पा त्यांनी गाठला असला तरी आता अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी अजूनही समाजमान्यतेचा फार मोठा प्रश्न समोर आ वासून उभा आहे.

आता ही केवळ सरकार आणि सेवाभावी संस्थांची जबाबदारी नसून समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या समाजाबाबत असलेले गैरसमज दूर करणे हे सगळ्यात सुरुवातीचे काम आहे. यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून या विषयावर स्पष्टपणे बोलायला हवे. या समाजाबद्दल लहान वयातच ओळख करून द्यायला हवी. स्त्री, पुरुष यांच्याप्रमाणेच समलिंगी या समाजाबद्दलही योग्य ती माहिती द्यायला हवी. साहित्यिकांनी समलिंगी समाजाबद्दल माहिती देणाऱ्या, त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या, त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी मदत करणाऱ्या साहित्याची निर्मिती करायला हवी. नोकरीच्या , व्यवसायाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याबाबत आपण सर्वांनीच पुढाकार घेऊन सकारात्मक पावले उचलायला हवीत. पण हे समाज परिवर्तन घडवायचे असल्यास प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. समलिंगी समूहाबद्दल असलेली तिरस्काराची भावना, तेढ, संशयाने पाहण्याची वृत्ती बाजूला सारून एक 'माणूस' म्हणून त्यांना स्वीकारणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. कारण समाज हा परिवर्तनशील असतो पण परिवर्तन आपण घडवायचे असते. शेवटी समाज म्हणजे आपणच असतो. त्यांच्या या समाजमान्यतेच्या लढ्यात त्यांना पुरेपूर साथ देऊयात!!!

 

आरंभ : दिवाळी अंक २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक ८
सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
संपादकीय
आरंभ - मराठी ई साहित्यातील नवे पर्व!
सर्वोच्च स्वागत
एक पणती वंचितांसाठी उजळो दिवा चोहीकडे…!
व्यंगचित्रे १
व्यंगचित्रे २
व्यंगचित्रे ३
उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ
सुख आणि दु:ख
समाज माध्यम आणि मी
लक्ष्मीच्या पाऊलखुणा
दिवाळी
ओझे पुनर्जन्माचे
फेअर अँड लव्हली
कथा दिवाळीच्या
अरोग्यमय दीपावली
दीपावली
कूटकथा: पलीकडचा मी
औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) करिअरसाठी एक उत्तम पर्याय...
भामटा
माजघर (आगरी कविता)
'ती' अशक्त नाही
शुभेच्छा एका चिमुकलीला
भरत उपासनींच्या चारोळ्या
पेपरवाला
'सण दिवाळी'
कविता दिवाळीनंतरची
मनातील कविता
असेही काही क्षण येतील तेव्हा...
बाप्पा
जगताय का तुम्ही...?
काय आहेस तू !
कविता
नवा प्रवास