इंडोलन्स (आळशीपणा) नकोच
मंगेश विठ्ठल कोळी.
मो. ९०२८७१३८२०
व्यक्तिमत्व विकासातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे इंडोलन्स अर्थात आळशीपणा होय. हा गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात पहावयास मिळतो. आज प्रवासामध्ये एक व्यक्ती भेटली ती खूपच अस्वस्थ वाटत होती, मी त्या व्यक्तीला सहज विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला. त्या संवादातून माझ्या असे लक्षात आले की, त्या व्यक्तीला वर्षानुवर्षे एकाच पद्धतीचे काम करून कामाचा कंटाळा आला होता. आता त्या कंटाळवाण्या पद्धतीचे रूपांतर आळसामध्ये झाले होते. त्यामुळे त्याला जे काम करायचे होते ते काम तो आळशीवृत्तीने किंवा कामातील पळवाटा शोधून कसं बसं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. त्या कामापासून पूर्णतः तो असमाधानी, निरुत्साही वाटत होता.
आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींमध्ये या प्रकारची वृत्ती वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आळशी वृत्तीपासून दूर राहायचे असल्यास एकमेव उपाय म्हणजे जे कोणते काम तुमचे पोट भरण्याचे, जीवन जगण्याचे किंवा उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्या कामावर कसल्याही प्रकारचा आळस किंवा कोणत्याही प्रकारच्या पळवाटा न शोधता ते काम प्रामाणिकपणे करणे. त्यावर मनापासून प्रेम करणे आणि ते काम अधिक उत्साहाने केल्याने त्यापासून मिळणारे समाधान हे आपल्याला भविष्यकाळात अनेक ठिकाणी उपयोगी पडते.
तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या कामामध्ये उत्साह दर्शविता त्याचप्रमाणे त्यातून मिळणारे यश देखील अवलंबून असते. अनेक व्यक्ती नवीन पिढी बद्दल मनात शंका घेऊन त्यांच्याकडे पाहत असतात. तरुण पिढीही वास्तवदर्शी आणि प्रथम प्राधान्य कशाला द्यावयाचे याचे उत्तम कौशल्यपूर्णतेचा उपयोग करत आहेत. त्यामुळे आपणास आज अनेक मोठमोठी कामे खूप लहान वयातील मुले-मुली यशस्वीरीत्या पूर्ण करताना दिसत आहेत.
अमेरिकेचा 2008 मधील झालेल्या ऑलम्पिक स्विमिंग चॅम्पियन जाने 8 गोल्ड मेडल मिळविली. त्या व्यक्तीला स्वतः चा आयडल मानणाऱ्या एक मुलाने 2016 मधील ऑलम्पिकमध्ये हरवत स्वतः स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. स्वतः च्या कामावर आणि ध्येयावर अचूक लक्ष केंद्रित करून ते यशस्वीरीत्या पूर्ण करता येऊ शकते याचे खूप छान उदाहरण आहे.
यशासाठी स्वतः च्या ध्येयावर किंवा कामावर प्रेम केले पाहिजे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते जेथे सुईचा उपयोग होतो तेथे तलवार चालू शकत नाही. एखादा निर्णय घेत असताना तुम्ही आळस करत असाल तर त्यातून तुम्हाला कधीही समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आळशीवृत्ती आणि आळशी व्यक्तीपासून नेहमी दूर राहा. त्याचा फायदा तुम्हाला जीवनात ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यास होईल.