संपादकीय
शिक्षणावर काही बोलण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते आहे. एक मुलगा होता, लहानपणापासून खूप हुशार. आईवडिलांची इच्छा होती, त्याने सिव्हील इंजिनिअर व्हावं. त्यासाठी त्यांनी त्या मुलाला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तशीच खेळणी खेळावयास दिली, जी त्याच्या मनात इंजिनियरिंगबद्दल आवड निर्माण करेल. मुलाला त्यांनी नावाजलेल्या प्लेग्रुपमध्ये टाकलं, जिथे डे केयर सुद्धा होतं. दोघेही जॉबला जाऊन जास्त पैसे कमवू लागले. लक्ष्य एकच, आपला मुलगा सिव्हील इंजिनिअर झाला पाहिजे. जसजसं त्या मुलाला समज येऊ लागली तसतशी आई वडिलांच्या इच्छेपोटी त्याची सुद्धा सिव्हील इंजिनिअर होण्याची इच्छा प्रबळ होऊ लागली. नर्सरीनंतर त्याला इंटरनॅशनल शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळेत तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत गेला. दहावीमध्ये देखील ९५ टक्के गुण मिळवून त्याला सहजच सिव्हील इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळाले.
तो पावलोपावली आई वडिलांची इच्छा पूर्ण करत होता, आईवडिलांना त्याच्या बालपणापेक्षा त्याचे मार्क महत्वाचे होते, कारण त्याला इंजिनिअर करायचं होतं. त्याचं सगळं सेट केलेलं होतं, म्हणजे त्याने कोणत्या वयात काय करावं, लग्न कधी करावं, घर कधी घ्यावं. त्याच्या आईने त्याला स्पष्ट सांगितलं होतं, तुझ्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकणार आहे. एकदा का तुझं शिक्षण पूर्ण झालं, तर मला नवीन दागिने करून दे. आईची इच्छा कोणता मुलगा पूर्ण करणार नाही? त्याने सुद्धा होकार दिला.
आई वडील आपल्या चांगल्याचा विचार करत आहेत या विचाराने त्यांने आपल्या डोळ्यांना झापडं लावून घेतली. सतत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, लक्ष्य एकच.. सिव्हील इंजिनिअर...
बोलता बोलता त्याचं सिव्हील इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्षदेखील संपलं आणि त्याला मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशीपसाठी पाठवण्यात आलं.
स्वप्न हळू हळू साकार होत होतं, इतक्या वर्षांच्या कष्टाची आणि त्यागाची परतफेड करण्याची वेळ आली होती, आणि...
पहिल्याच दिवशी साईटवर गेल्यावर त्या मुलाला त्रास होऊ लागला. असं पुढील दोन दिवस झालं. साईट सुपरवायझरने त्याला डॉक्टरकडे जायला सांगितलं, तेव्हा सर्वांना कळलं की त्या मुलाला दम्याचा त्रास आहे.
धन्य ते आईवडील, ज्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला दम्याचा त्रास असताना देखील सिव्हील इंजिनिअर केलं. त्यासाठी नको तितके पैसे ओतून शिक्षणाचा त्यांनी अगदी बाजार केला. मुलाला ज्या क्षेत्रात पाठवत आहात, त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तो शारीरिक आणि मानसिकरित्या तयार आहे की नाही, हे पाहायला नको का?
मुलांना काय हवंय, काय नको याचा विचार न करता, त्यांचं मत विचारात न घेता त्यांच्यावर आपली मतं लादणं, त्यांच्याकडून चांगल्या मार्कांची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? मुलांची आवड समजून घ्या, आणि त्यानुसार त्यांना शिक्षण द्या. प्रस्तुत अंकामध्ये शिक्षणव्यवस्थेवर बऱ्याच साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, पण प्रत्येक वेळी शिक्षक, शिक्षणव्यवस्थाच जबाबदार नसते, काही प्रमाणात आपण देखील जबाबदार असतो.
अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक