केंब्रिजला प्रस्थान
एवढ्याने हार्डीसाहेबाचे बिलकुल समाधान झाले नाही. त्याची खात्री पटली होती कीं रामानुजम केंब्रिजला आला तरच त्याच्या प्रतिभेला खरा न्याय मिळेल. त्याने लिहून कळवलेली अनेक प्रमेये खरी वाटत होतीं पण त्यांची पायरीपायरीने सिद्धता पद्धतशीरपणे सिद्ध करून दाखवल्याशिवाय त्याना वा रामानुजमला गणिताच्या जगात मान्यता मिळणार नव्हती. रामानुजमला याची आवश्यकता समजत नव्हती! तसेच मद्रासच्या डबक्यातून बाहेर पडून तो केंब्रिजच्या समुद्रात उतरल्याशिवाय त्याच्या प्रतिभेला खरा बहर येणार नव्हता. आपण रामानुजमच्या बरोबर एकत्र बसून गणितसंशोधन करावे अशी त्यालाच आच लागली होती. म्हणून त्याने एका मित्रातर्फे रामनुजमला निरोप पाठवला कीं तूं केंब्रिजला ये!
ज्या भारतीय गणितज्ञाकडे हा निरोप आला त्याने परभारेच उत्तर पाठवले कीं धर्मबंधनामुळे समुद्र ओलांडून रामानुजम केंब्रिजला येऊ शकणार नाही. हार्डीने विषय सोडून दिला नाही. त्याचा नॅव्हिल नावाचा मित्र मद्रासला गणितावर व्याख्याने देण्यासाठी येणार होता त्याच्याकडे त्याने रामानुजमला समजावण्याची कामगिरी दिली. त्याच्या भेटीनंतर रामानुजमने केम्ब्रिजला येण्याचे मान्य केले.!