धडपड
काही मित्रांच्या सल्ल्याने त्याने ठरवले कीं आपले काम गणितातील परदेशी तज्ञांच्या नजरेला आणावे. त्यासाठी त्याने केंब्रिज मधील तीन थोर गणितज्ञांना पत्र लिहून आपल्या कामाची विस्तृत माहिती कळवली व मार्गदर्शनाची विनंति केली. दोघांनी काही दखल घेतली नाही. मात्र सुदैवाने तिसऱ्या, हार्डी नावाच्या विख्यात गणितज्ञाने त्याच्या पत्राची दखल घेतली. प्रथम त्यालाही, भारतातील मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कारकुनी करणाऱ्या व फक्त शाळा शिकलेल्या माणसाने गणितातील नवीन प्रमेये शोधल्याचा दावा करावा हे हास्यास्पदच वाटले होते व त्याने पत्र प्रथम बाजूलाच ठेवून दिले होते. मात्र पत्राला जोडलेल्या पानांतून लिहिलेल्या प्रमेयांची त्याच्या अंतर्मनाने दखल घेतली असावी. कारण पत्राचा विचार त्याची पाठ सोडीना!