Android app on Google Play

 

बालपण

 

रामानुजम हा कुंभकोणम शहरातील एका गरीब वैष्णव अय्यंगार ब्राह्मण कुळातला पहिला मुलगा. पाठची काही भावंडे अल्प वयात वारली. दोन भाऊ जगले ते त्याच्यापेक्षा खूप लहान. बालवयात देवी आल्या व चेहेऱ्यावर खुणा ठेवून गेल्या. शरीरप्रकृति साधारण, खेळांमध्ये रुचि नाही. अभ्यासातील हुशारी मात्र बालवयातच दिसून येई. अंकगणितात आपल्यापेक्षा कोणाला जास्त मार्क मिळाले तर त्याला राग येई! इतर विद्यार्थ्याना शिकवणे त्याला आवडे. शालेय शिक्षण संपेपर्यंत त्याची प्रगति उत्तमच होती व त्यामुळे त्याला कॉलेज शिक्षणासाठी शिष्यवृत्ति मिळाली. त्याच्या स्वत:च्या किंवा मातुल कुळात उच्च बौद्धिक कामगिरीची कोणतीहि परंपरा नव्हती. ब्राह्मणकुळात जन्म एवढाच वारसा होता. वडील नगण्य व घरात आईचा वरचष्मा होता. घरातील वातावरण सर्व ब्राह्मणी आचारधर्म निष्ठेने पाळणारे होते व त्याचीहि मनोवृत्ति तशीच होती. शाळकरी वयापासून त्याचे गणिताचे आकलन व आकर्षण असामान्य होते.