गणिताची आवड कशी निर्माण झाली
त्याच्या घरात भाडेकरू असलेल्या काही कॉलेज विद्यार्थ्यानी जी. एस. कार नावाच्या लेखकाच्या एका गणिताच्या पुस्तकाशी त्याचा परिचय करून दिला. त्याच्या वयाच्या मानाने ते फारच पुढचे होते. त्याचा रामानुजमच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. ५००० निरनिराळी प्रमेये, फॉर्म्युले, इक्वेशन्स यांचा हा हा एक संग्रह होता. आल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिगॉनॉमेट्री, डिफरन्शिअल इक्वेशन्स अशा अनेक विषयांचा त्यांत समावेश होता. फॉर्म्युले दिले होते पण त्यांच्या सिद्धता दिलेल्या नव्हत्या. हे पुस्तक काही विशिष्ट हेतूने बनवलेले होते. केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयाची ट्रायपॉस ही परीक्षा तेव्हां फार गाजलेली होती. केंब्रिजचे हुशार विद्यार्थी या परीक्षेला बसत. प्रथम वर्गात पास होणाराना रॅंग्लर ही पदवी मिळे. प्रथम क्रमांकाला सीनियर रॅंग्लर म्हणत. कित्येक भारतीय या परीक्षेला बसत. महाराष्ट्रातील महाजनी व परांजपे ही नावे वाचकाना आठवतील. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक होते. परीक्षा पास होणारा विद्यार्थी विषेश बुद्धिमान समजला जाई व पुढील आयुष्यात हमखास चमकत असे मात्र तो असामान्य गणिती वा गणितसंशोधक हॊईलच असे नसे! उलट, कित्येक असामान्य गणितज्ञाना ही परीक्षा जड जाई!