अध्याय नववा
श्री भगवानुवाच
दोषरहित तुजला मी ज्ञान अति गुहय अनुभविक ज्ञान ॥
ज्याच्या ज्ञाने होशी अशुभाच्या पार तेंच सांगेन ॥१॥
विद्यांचा राजा हे राजा गुहया मधील हेंच असें ॥
पवित्र तसेंच उत्तम अनुभवास प्रत्यक्ष येईलसें ॥२॥अ
धार्मिकहि तें असुनि आचरणेस बहु सुलभ ही आहे ॥
शास्त्रीय ज्ञान तसे विज्ञान अविनाशीच जाणा हे ॥२॥ब
श्रद्धा यावर नाही असे मज ना मिळति शत्रु तापा ते ॥
मृत्यू मम या संसारी निःसंशय फिर फिरुन येती ते ॥३॥
अव्यक्त रुप माझें जियें जग सर्व व्यापिलें आहे ॥
माझे ठायीं भूतें त्या भूतात मी नसे पाहे ॥४॥
भूतें न माझे ठायी ऐसें म्हणणेहि योग्य बा आहे ॥
अभ्दुत ईश्वर करणी भूतांचा जनकही मीच आहे ॥५॥अ
भुता धारण कर्ता मी आहे परि तसेच भूतात ॥
मायातीत असा मी कर्ता असे मी सदा अलिप्त ॥५॥ब
जैसा सर्व-ग वायू आकाशी सर्वदा वसे जाण ॥
भूतें तैशी माझे ठायीं मी ठेवितो नित्य जाण ॥६॥
कौंतेय कल्प अंती मम प्रकृतिलाच भूत गण मिळती ॥
कल्पा गम सम याला कर्ताहि मीच भूत उत्पत्ती ॥७॥
प्रकृतीला वश भूतें प्रकृती वश मज असेच या योगें ॥
वरचे वर भूतांचें उत्पादन तीस मी सदा सांगे ॥८॥
सृष्टयुत्पत्ती कर्मे धनंजया बंधने न मज होती ॥
व्यवहारी उदासीन कर्मात मम न कधीच आसक्ती ॥९॥
माझ्यानें तत्वानें निर्मी प्रकृती चराचरा दीना ॥
यायोगें कौंतेया हें जगच्चक्र कधींच भंगेना ॥१०॥
परमेश्वर भूतांचा मूढ न जाणोन सत्य ममरुपा ॥
अवमानि-तीच माझ्या दृश्य अशा याच मानुषी रुपा ॥११॥
आशा व्यर्थ तयांची कर्मे निष्फळ ज्ञानही फुकट ॥
मोहिनी राक्षसीशा प्रकृति आश्रया मूढ करिति निकट ॥१२॥
जे दैवी प्रकृतीचे भजक महात्मेच पार्थ असतात ॥
भूतादी अविनाशी मज ओळखून अनन्य भजतात ॥१३॥
मम कीर्तना निरंतर दृढनिश्चय यत्न युक्त करितात ॥
भक्ति युक्त मज नमुनी ध्यान युक्त उपासना हि करितात ॥१४॥
द्वैतें अद्वैतें वा बहुरुपें जग व्याप्त-शा मजला ॥
ज्ञानाच्या द्वारानें करिती दुसरे मम उपासनेला ॥१५॥
यज्ञ संकल्प यज्ञहि पितराधार वनस्पति हि यज्ञाची ॥
मंत्रहि मी आहुतिहि मी अग्नी मी हवन द्रव्यही मीची ॥१६॥
मातापिताहि आजा जगदाधारहि पवित्र मी आहे ॥
ॐ कार वेद्यही मी ऋग्यजुः सामदेव मी आहे ॥१७॥
पोषक गति, प्रभू मी निवास साक्षी हितेच्छु आश्रय मी ॥
नाश स्थिति उत्पत्ती भांडार अव्यय बीज आहे मी ॥१८॥
पार्थ ऊनहि पाडी आवर्षण वृष्टिहि मीच पाडी ॥
मृत्यू मी अमृतहि मी असत् सतांची मीच की जोडी ॥१९॥
ऋग्वेद यजुः सामहि यांच्या आज्ञे समान वर्तति ते ॥
पवित्र हि सोम-यागी यज्ञांनी पूजितात ही माते ॥२०॥अ
वर्तुनि ऐसें स्वर्गा इच्छुनि तो मिळवितात ही लोक ॥
तेथें जाउन घेती उपभोग तेथलेच जे अनेक ॥२०॥ब
स्वर्गा विशाल ऐशा उपभोगुनि पुण्य जो असें त्यांचें ॥
साठा सरता येती पुनरपि जन्मास मृत्यु लोकीचे ॥२१॥अ
वेदाज्ञा अनुसरुनी उपभोगाच्या धरुन इच्छेला ॥
सकाम कर्मे करिती स्वर्गमृत्यु याच हेल पाटयाला ॥२१॥ब
माझी उपासना जे मजला चिंतून एकनिष्ठेनें ॥
करिती त्या योग्याच्या योगक्षेमा मीच करी जाणे ॥२२॥
मजविण अन्यहि देवा श्रद्धेनें भजति तेहि कौंतेय ॥
कर्म न यथा विधीते तरि जाणावे तेहि भजक मदीय ॥२३॥
उपभोगी यज्ञांचा स्वामी मी सत्यरुप मम याते ॥
न ओळखति ते पावति जन्ममरण याच चक्र फेर्याते ॥२४॥
देव भक्त देवांना पितृभक्त पावतीच पितराना ॥
भूत भक्त भूतांना माझे भक्त पावति मत्पदांना ॥२५॥
पत्र पुष्प फल जलही भक्तीने जरि मला कुणी दिधले ॥
स्वीकार मी तयांचा करितो कीं भक्तिनेच तें भरलें ॥२६॥
कौंतेया जे करिशी खाशी जें हवन दानहि करिशी ॥
तपही जे तूं करिशी अर्पावे सर्व ते तुवा मजशी ॥२७॥
वर्तन हे तोडिल तव शुभ अशुभ हि फलद कर्म बंधास ॥
युक्त तूं मजसि मिळशी युवतच योग कर्म फल संन्यास ॥२८॥
भूतामध्यें सम मी अप्रिय प्रियहि मज नसे कोणी ॥
भक्त वसति मम ठायीं मी वसतो भक्ताचियाच ठिकाणी ॥२९॥
अत्यंत दुराचारी भजेल मज जरि अनन्य भावानें ॥
साधू तो समजावा येई तो मजकडेच बुद्धीनें ॥३०॥
तत्काळचि धर्मात्मा होई मिळवी अखंड शांतीला ॥
कौंतेय निश्चयानें समज हे पावे न भक्त नाशाला ॥३१॥
नारी शूद्र वैश्य हे जमति जरि पार्थ पाप योनीत ॥
आश्रय मम जर घेती परम गती प्राप्त करुन घेतात ॥३२॥
पुण्यात्मे ब्राह्मण जे क्षत्रिय भक्ता न मुक्तिची शंका ॥
पार्था मज तूं भजरे जन्मा आलास मर्त्य या लोका ॥३३॥
मन माझे ठायी हो मम भक्त नमन मज यज-न मजसाठी
मत्परायण होउनी आत्म्या सह तुज पडेल मम गाठी ॥३४॥
सारांश
भक्ती आवडते मला फल जलें पर्णे फुलें ही दिली ॥
सेवी मी बहु तोष होय जर तीं भक्ती मुळें अर्पिली ॥
भक्तीनें मजला भजे नर जरी पापी तरी पावतो ॥
मुक्तीला म्हणुनी भजो जन सदा श्रीकृष्ण गोविंद तो ॥१॥