Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय दुसरा

संजय वदे नृपा जो दुःखानें अक्ष अश्रुपूर्ण बसे ॥

दयाव्याप्‍त पार्थाला मधुसूदन वाक्य बोलला ऐसें ॥१॥

भगवान वदे पार्था भलते तुज समर समयि आठवलें ॥

अपयशकर मोहा तो स्वर्गा ये आड या न भुलति भलें ॥२॥

क्लीबत्वा सोडी या पार्था नच योग्य हे तुला राया ॥

शत्रुस तापदा तूं दुर्बलता सोड ऊठ युद्धाया ॥३॥

पार्थ वदे मधुसूदन पूजेला भीष्म योग्य गुरुहि तसा ॥

अरिसूदन बाणांनीं युद्धी मी त्या भिडू तरी कैसा ॥४॥

महानुभावा गुरुना देवा मी समरांत मारावें ॥

वाटे मज जगती या त्यापेक्षां श्रेय मधुकरी व्हावें ॥५॥

लोभी गुरु कामार्थी अयोग्य परि का तयास मारावें ॥

त्यांना जर मी वधिले, रक्‍ताने युक्‍त भोग मी घ्यावें ॥६॥

आम्ही त्यांना किंवा त्यांनीं आम्हास जिंकणें बरवें ॥

यापैकी श्रेयाचा निश्‍चय आम्हास नच मुळी करवें ॥७॥

त्यांना समरी वधिता इच्छा आम्हा मुळीं न जगणेची ॥

ते कौरव जन असती इच्छा धरुनी रणांत लढणेचीं ॥८॥

मोहे बुद्धी भ्रमली स्वभावही सर्व जाहला नष्ट ॥

कर्तव्याकर्तव्यहि उमजेना मज मुळीच तें स्पष्ट ॥९॥

यास्तव विचारितो मी श्रेयस्कर जे खरें मला सांगा ॥

शरणागत या शिष्या योग्य मार्ग दाव हे महाभागा ॥१०॥

असपत्‍न आज झालो पृथ्वीचा सर्व राज्यकर्ता मी ॥

किंवा श्रेष्ठ तयाहुनि झालो ही नृप जरी सुरांचा मी ॥११॥

त्यात न दिसेच कांहीं जे या शोका समूळ नाशील ॥

नच आवरे मला तो शरिराचे रक्‍त सर्व अटवील ॥१२॥

संजय सांगे भूपा नलगे मज युद्ध हे हृषीकेश ॥

गोविदाला सांगे स्तब्ध बसे अरिताप गुडाकेश ॥१३॥

हे राजा पार्थाला जो बसला खिन्न फार होऊन ॥

दोन्ही सैन्यामध्यें वदला त्या हृषीकेश हासून ॥१४॥

भगवान वदे करिशी शोक बहू तू अशोच्य वस्तूंचा ॥

भाषण मोठे करुनी दाविशी तूं आव थोर ज्ञान्यांचा ॥१५॥

पंडित कधी न करिती शोक जरी जगति या कुणी मेला ॥

किंवा जिवंत असला त्यांच्या त्या सारख्या स्थिर मनाला ॥१६॥

मी तूं किंवा राजे पूर्वी नव्हतो असें मुळींच नाही ॥

होऊ न सर्व पुढेंही ऐसे नच ये विधान करिता ही ॥१७॥

बाल्य यौवन जरा ही येतातच सर्व देह-धार्‍याना ॥

देहांतर ही येणे न चुके हे दुःखद आणि ज्ञानि जना ॥१८॥

शीतोष्ण दुःखसुख जे देती त्यानाहि आदि अंत असे ॥

यास्तव शोक नसावा पार्थ ते सोसुनी जगांत वसे ॥१९॥

हे श्रेष्ठा पुरुषार्था ज्याला हे किमपि पीडुना शकती ॥

सुखदुःख समच मानी अधिकारी तोचि मिळवितो मुक्‍ती ॥२०॥

भाव असत्या नाही सत्याला न तसा कधी अभाव ॥

सिद्धांत हा खरा हे म्हणती ते तत्त्व जाणते सर्व ॥२१॥

व्यापी विश्‍व समस्तहि ऐसे जे ब्रम्ह तेच सत्य असे ॥

विश्‍वात नसे काही जे या अविनाशीलाच नाशिल से ॥२२॥

अचिंत्य नित्यच आत्मा देहादी नश्य त्यास मिळती ते ॥

नश्याचे शोकाला त्यागी तूं होई सज्ज युद्धाते ॥२३॥

यालाच मारणारा कोणी या समजतीच मेला ते ॥

अज्ञानी दोघेही हा न मरे मारिनाही कोणाते ॥२४॥

जन्मा कधी न येई न मरे कधीही म्हणोन नित्य खरा ॥

जन्मा आला असुनी नच ही जो पुनरपी न होणारा ॥२५॥

अजन्म नित्यच आत्मा शाश्‍वत बहु वृद्ध ही असे झाला ॥

अवध्य असाच राहे देहाला या कुणी जरी वधिला ॥२६॥

पार्था हा अविनाशी जन्म रहित नित्य निर्विकार असा ॥

पुरुष असे समजे तो मारीं कैसा नि मारविणार कसा ॥२७॥

टाकून जीर्ण वस्त्रे नूतन जैशी जगात जन घेती ॥

आत्मा तैशी शरिरे नूतन घे त्यागि जीर्ण झाली ती ॥२८॥

शस्त्रे न छेदिती त्या अग्नि नच शके तयास जाळाया ।

पाणी न तया भिजवी वारा न शके तयास सुकवाया ॥२९॥

अच्छेद्य जळेना जो न भिजे न सुकेहि सर्व काल असा ॥

सर्व व्यापी नित्यचि अविनाशी अचल राहतो ऐसा ॥३०॥

आकार यास नाही म्हणती हा अविकार अचिंत्य खरा ॥

यास्तव ओळखुनी या आत्म्यासाठी कधी न शोक करा ॥३१॥

जन्मे सदा मरे हा पार्था म्हणशी तरी न योग्य तुला ॥

ऐशाही आत्म्यास्तव करणे त्या महा-बाहु शोकाला ॥३२॥

जन्मे तो सत्य मरे मेला ये निश्‍चयेच जन्माला ॥

हे अपरिहार्य यास्तव पार्था न करी कधीच शोकाला ॥३३॥

व्यक्‍त न जन्मापूर्वी व्यक्‍त दिसे मृत्यू येइ पर्यंत ॥

शोक मग कुणासाठी मरणोत्तर जे पुन्हाहि अज्ञात ॥३४॥

आश्‍चर्यकारक असे समजती या जगात जन तयास ॥

आश्‍चर्यजनक आहे ऐसे दुसरा म्हणेहि आत्म्यास ॥३५॥

आश्‍चर्य खरे म्हणुनी ऐके त्या वर्णना जगी तिसरा ॥

परि या पैकीं कोणी उमजेना कोणताच असेच खरा ॥३६॥

सर्व शरीरी असुनी पार्था हा सर्वदा अवध्य असे ॥

यास्तव कोणा प्राण्यासाठी तुज शोक मुळीच योग्य नसे ॥३७॥

क्षत्रिय धर्मानेही भ्याडपणा तुज मुळीच योग्य नसे ॥

श्रेयस्कर युद्धासम धर्माने क्षत्रियास दुजे नसे ॥३८॥

अर्जुना यदृच्छेने या युद्धे स्वर्गदार होय खुले ॥

क्षत्रिय जो भाग्याचा त्यासच हा फार योग्य लाभ मिळे ॥३९॥

यासाठी धर्माला मान्य असे युद्ध तूं न करशील ॥

पापा मिळविशि पार्था धर्मासह कीर्तिलाहि मुकशील ॥४०॥

आणखी तव अपकीर्ति लोक जगी या अखंड गातील ॥

कष्टद मरणापेक्षा संभाविता अकीर्ति जगांतील ॥४१॥

युद्धा भी रण सोडी महारथी हे तुला समजतील ॥

त्यायोगे मान्य जया पार्था त्यानाच निंद्य होशील ॥४२॥

शत्रु अहितकर भाषा तुजविषयीच्या बहूत वदतील ॥

निंदिति पराक्रमा तव कष्टद याहुन काय राहील ॥४३॥

मृत्यू ये स्वर्ग मिळे जिंकिशी तर भूपतीच होशील ॥

यास्तव कुंतीपुत्रा युद्धाला निश्‍चया करुन चल ॥४४॥

सुखदुःख लाभहानी जयपराभव समान तू मानी ॥

युद्धास सज्ज होई लिप्‍त न होसी मुळीच पापानी ॥४५॥

सांख्य योग तुज कथिला ऐके सांगेन बुद्धि योगाला ॥

त्याते जाणुनि पार्था तोडिशि तू सर्व कर्मबंधाला ॥४६॥

अपूर्ण कर्महि होता निष्फळ नच होत कर्म योगांत ॥

संकट दूर होते आले जरि या कधीहि योगांत ॥४७॥

आचरण जरी घडले धर्माचे सहज या जगी थोडे ॥

मोठे तापद असले तरि ते निश्‍चयेच भय मोडे ॥४८॥

कुरुनंदन ही बुद्धि कर्तव्य अकर्तव्य जाणती आहे ॥

वासना भेद अनंत अनिश्‍चयी बुद्धिलाच तू पाहे ॥४९॥

वेदविहित कर्माविण कृत्य जगी या मुळीच दूसरे ना ॥

गंभीर अशी भाषा बोलति काही न मूर्ख याजविना ॥५०॥

मानिति सुख ते विषयी स्वर्गेच्छा जन्म मरण ही मिळवी ॥

अनंत कर्मे करुनी भोगैश्‍वर्ये नवी नवी मिळवी ॥५१॥

भोगैश्‍वर्या ठायी रत होता त्या कडेच चित्त वळे ॥

कर्तव्याकर्तव्या जाणे बुद्धी होय स्थीर बळे ॥५२॥

वेदांत अर्जुना या त्रिगुणांच्या सर्व वर्णना केले ॥

तू पाहिंजे तयांच्या बुद्धि स्थैर्ये पलीकडे गेले ॥५३॥

द्वंद्वा सोडुनि सत्वा आचरिता त्रिगुण बाहय तू होता ॥

आत्म स्वरुप परत हो योग क्षेमी मुळी नसो चिंता ॥५४॥

कूपा मधील कार्ये सहज तडागी समस्त होतात ॥

कार्ये वेद-ज्ञाची ब्रम्हज्ञा सहज सर्व येतात ॥५५॥

कर्माधिकार तुजला परंतु नाही फलास घेणेचा ॥

तू न फलेच्छू होई क्रम नच सोडीच कर्म करणेचा ॥५६॥

कर्मफलासक्‍तीला धनंजया सोड सर्व कर्म करी ॥

म्हणती योग तयाला सिद्धि असिद्धी समान होत तरी ॥५७॥

बुद्धि समत्वापेक्षा धनंजया कर्म फार हीन असे ॥

समबुद्धिला शरण जा समज फलेच्छा अतीच दीन असे ॥५८॥

समबुद्धि प्राप्‍त जया तोडी भ्रम पुण्य पाप तो सारा ॥

यास्तव वर समबुद्धी कर्मी कौशल्य तोच योग खरा ॥५९॥

समबुद्धी ज्ञानी जन कर्म फलेच्छेस सोडुनी करिती ॥

तोडून जन्मबंधा नित्य सुखद ईश्‍वरा प्रती जाती ॥६०॥

जेव्हा तव बुद्धीही मोहपटलमुक्‍त सर्व होईल ॥

भूत तशा होणार्‍या गोष्टीस्तव काळजी न करशील ॥६१॥

वेदप्रणीत वाक्ये भ्रमली तव बुद्धी निश्‍चला होई ॥

स्थीर समाधी मध्ये तेव्हा तुज कर्म योग तो येई ॥६२॥

बा केशव पार्थ पुसे स्थितप्रज्ञ समाधिस्थ होय कसा ॥

भाषण वर्तन आसन हे स्थितधी सर्व आचरे कैसा ॥६३॥

सर्व मनीषांना जो सोडी आपण रमेहि अपणाशी ॥

पार्था भगवान वदे स्थितप्रज्ञ नांव हे तदा त्याशीं ॥६४॥

दुःखे न खिन्न होई मिळवाया सुख कधी न इच्छी जो ॥

स्थितप्रज्ञ तोच मुनी क्रोध भय प्रेम यास तोडी जो ॥६५॥

न करी प्रेम कुठेही प्राप्‍त शुभाशुभ फले जया होता ॥

न सौख्य दुःख मानी बुद्धी त्याचीच पावली स्थिरता ॥६६॥

कांसवअंगापरि जो विषयापासून इंद्रिया अवरी ॥

स्थिरता तेव्हा येते ऐशाला जाण बुद्धिलाच पुरी ॥६७॥

जाती आहार सुटता विषये जरी सवे देहधारींचे ॥

गोडी परि नच सुटे नाशे जी दर्शनेच ब्रम्हाचे ॥६८॥

बलवान इंद्रिये ही जो त्यांचे निग्रहार्थ यत्‍न करी ॥

कौंतेय बलात्कारें वळविती मन आपणाकडे सारी ॥६९॥

इंद्रिय निग्रह करुनी योगी मत्परायणहि तूं व्हावे ॥

इंद्रियास वश ठेवी स्थिर बुद्धी तोच होय समजावे ॥७०॥

विषया चिंतन करिता होते आसक्‍त मन तया ठायी ॥

इच्छा आसक्‍तीने अपुरी इच्छा क्रोध करी होई ॥७१॥

अविचार क्रोधाने त्या योगाने स्मृतिभ्रमच होतो ॥

बुद्धीनाश तयाने तो होता प्राणनाश ठरला तो ॥७२॥

संयमी इंद्रियांचे प्रेम द्वेषादि पाश सोडवितो ॥

विषयांचा अधिकारी उपभोगी तरिहि शांत राहे तो ॥७३॥

प्रसन्न चित्त होता दुःखे जाती समूळ विलयाला ॥

बुद्धी स्थिर करिता ये सत्वर प्रसन्न चित्त जो त्याला ॥७४॥

योगि न जो त्यालाही स्थिर बुद्धी भावना तशी नाही ॥

भावने विना न शांती शांती नसे त्यास सौख्यही नाही ॥७५॥

स्वैरेंद्रिय अनुगामी होउ दिले जरि मनास ते करिते ॥

बुद्धि नाश पुरुषांचा वात जसा सागरांत नावेते ॥७६॥

इंद्रिय निग्रह करितो त्याना विषया मधून सोडवुनी ॥

बुद्धी स्थीर तयाची झाली हे महाबाहु जाण मनी ॥७७॥

अज्ञानमग्न निजती सर्व इतर तदा संयमी जागे ॥

ज्ञान्यास रात्र होते अज्ञ जन समजती असो जागे ॥७८॥

जलओघ सतत मिळती सागर जलमय सदा जरी असला ॥

मर्यादा उल्लंघन याची न कधीच माहिती त्याला ॥७९॥

तैसांच कामनांना स्थळ देह परि नच शिवे फलेच्छेला ॥

शांतीला तो मिळवी न मिळे ती भोग इच्छिणाराला ॥८०॥

आसक्‍ती सोडुनि जो निःस्पृहतेने जगात वावरतो ॥

मुक्‍त अहंता मी पण होऊनी सत्य शांति मिळवी तो ॥८१॥

पार्था ब्राम्ही स्थिति ही मिळवी तो मोह बद्ध नच होतो ॥

ज्ञानी देहांती ती वरि मिळवी ब्रम्हपद मोक्षहि तो ॥८२॥

सारांश

शा.वि.

पार्थाला बहु होय शोक बघुनी त्याला कथी तत्त्व हे ॥

आत्म्याला नच नाश देह मरतां तो नित्य राहीच हे ॥

सांगे कृष्ण तया करी धनु धरी कर्तव्य तू आचरी ॥

सोडी हर्ष तसाच शोक अवघा ज्ञानी जसा त्यापरी ॥१॥

समश्लोकी भगवद्‌गीता

संकलित
Chapters
प्रस्तावना समश्लोकी भगवद्गीता अध्याय पहिला समश्लोकी भगवद्गीता अध्याय दुसरा समश्लोकी भगवद्गीता अध्याय तिसरा समश्लोकी भगवद्गीता अध्याय चवथा समश्लोकी भगवद्गीता अध्याय पांचवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सहावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सातवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय आठवा समश्लोकी भगवद्गीता अध्याय नववा समश्लोकी भगवद्गीता अध्याय दहावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय अकरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय बारावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय तेरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय चौदावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय पंधरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सोळावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय सतरावा समश्लोकी भगवद्गीता अध्याय अठरावा कोण तू----? अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा