हिरवागार पोपट भिजलेल्या र...
हिरवागार पोपट भिजलेल्या रानात
ओल्या ओल्या पंखांनी आला माझ्या मनात
लालचुटुक चोचीत हसून म्हणे कसा,
’रडूबाई, हळूबाई हवा हिरवा ससा ?’
हिरवेसे आभाळ हिरवे हिरवे रान
हिरवाच पाऊस माती हिरवी छान
हिरवे हिरवेगार पक्षी नि प्राणी
हिरव्या नदयांना हिरवेच पाणी
हिरव्याशा डोंगरात हिरवेच झरे
हिरव्या पानांतून हिरवेगार तुरे
हिरवी हिरवी शेते बांधसुद्धा हिरवे
हिरव्या फुलांतून हिरवेच काजवे
येणार तर चला माझ्यासंगे दूर
दाखवतो हिरव्या रंगाचा पूर !’
मिठूमिठू पोपटाची मिठीमिठी वाणी
हिरव्या रानाची जादुभरी गाणी
कळलेच नाही गेले कधी रानात !
हिरवा मऊ ससा आला कधी हातात !
कधी गेला दिवस ! आली कधी रात !
दिवा चांदोबाचा कुणी लावला रानात ?
गंमतच गंमत बाई हिरवा कसा प्रकाश ?
मध्यरात्र झाली तरी हिरवे कसे आकाश ?