भिंतीवर एक कवडसा मजसाठ...
भिंतीवर एक कवडसा
मजसाठी थांबायाचा
रांगावे बाळ तसा तो
हळु सरकत मग जायाचा
कधि चांदणरात्री सुद्धा
तो कौलांतुन यायाचा
झुळझुळीत रेशिमवस्त्रे
अन् गुलुगुलु बोलायाचा
मी गुपचुप बोले त्याशी
तो हसेरुसे मज बघुनी
त्या अमुच्या खेळामधुनी
मज सुचली सुंदर गाणी
घर नवे जाहले तेव्हा
हो बंद तयाची वाट
यामुळेच घडली अमुची
कायमची ताटातूट
मी शोधित असता त्याला
स्वप्नात कधी तो येतो
तो असे बोलतो काही
की गीत नवे मी लिहितो !