नको पाटी नको पुस्तक नक...
नको पाटी नको पुस्तक
नको ओझे दप्तराचे
झाडांनो, तुमचे आपले बरे असते
झंझट नसते शाळेचे.
नको परीक्षा नको शिक्षा
नको ओझे अभ्यासाचे
झाडांनो, तुमचे आपले बरे असते
झंझट नसते शाळेचे.
नको रुसवा नको भांडण
नकोच ओझे कंटाळ्याचे
झाडांनो, तुमचे आपले बरे असते
झंझट नसते शाळेचे.
झाडं अशी कशी असतात ?
माणसांसारखी दिसत नाहीत
पण माणसांपेक्षा काम करतात !
झाडांना असतात कुठे पाय
तरी कशी उभी राहतात ?
असतात कुठे हात झाडांना
तरी कशी काम करतात ?
झाडांना असतं कुठे नाक
तरी कसा श्वास घेतात ?
माणसांसारखी दिसत नसून
माणसांचे मित्र असतात.
का ?
झाडं म्हणजे झाडं नसतातच !
झाडं म्हणजे माणसंच असतात !
झाडांनो, हिरवीगार सावली तुमची
आईसारखी कुशीत घेते
झाडांनो, तुमच्या फांदया
किती किती हात तुमचे.
ताल देतात पंख पाखरांचे
गाणे गातात आनंदाचे.
झाडांनो, तुम्ही बहरता, फुलता
सांगा ना काय गुपित त्याचे ?
आम्हांलाही तुमच्यासारखं
मोठ्ठं मोठ्ठं व्हायचं आहे
बहरायचं अन् फुलायचं आहे.
तुमच्याच कुशीत शिरुन आता
चिडीचूप लपायचं आहे.
झाडं म्हणजे काय असतं ?
पानां-फुलांचं एक अख्खं गाव असतं
गार गार सावलीचं रान असतं.
गोड गोड फळांचं दान असतं.
झाडं म्हणजे काय असतं ?
टाळया वाजवणार्या पानांचं
एक आनंदी मन असतं
अन् घर नसलेल्या किती मुलांचं
झाडं म्हणजे एक घर असतं !