माझे गाव चांदण्याचे चा...
माझे गाव चांदण्याचे
चांदण्याचे घर
चारी भिंती चांदण्याच्या
चांदण्याचे दार.
परसात अंगणात
चांदण्याची वेल
चांदण्याच्या वेलीवर
चांदणीचे फूल.
घरामागे तळे त्यात
चांदण्याचे पाणी
चांदपंखी लहरींची
रुमझुम गाणी.
वडबाबा डोलतात
डोले बाळ जसे
फांदयांतुन बागडती
चांदण्याचे ससे.
दूरच्या त्या डोंगरांना
फुटे हसू आज
मिरविती अंगावर
चांदण्याचा साज.
धरेवर, गगनात
माझ्या मानसात
अशी जादू करी सारी
पुनवेची रात.
पुनवेचा राजा राही
आकाशात वर
चंद्रदेवा, चंद्रदेवा
तुला नमस्कार.