फुलगाणी गाईली याने आणि त्...
फुलगाणी गाईली याने आणि त्याने
आता जरा गाईन मी पानांचे गाणे !
झाडाच्या माथ्यावर पानांचा डेरा
फांदीच्या टोकाशी पानकोवळा तुरा
फुले किती थोडी ? पाने असतात फार
पाने किती छान, हिरवी हिरवीगार !
आंब्याची पालवी जांभळी आणि लाल
जसे काही यशोदेच्या बाळाचे गाल !
केळीच्या पानातून सनईचे सूर
पक्वान्नांचा थाट, उदबत्त्यांचा धूर
पिंपळाच्या पानांचे नाजुक नाजुक तळवे
विडयाचे पान तर रंगदार हळवे
पानांच्या सावलीत गुरे झोपा घेतात
पोळलेले पाय कसे थंडगार होतात.
जाळीदार पान आहे पुस्तकात लपून
रेषांतून वाचतो जुन्या आठवणी जपून !