धरणी माझं नाऽऽव आकाश म...
धरणी माझं नाऽऽव
आकाश माझं गाऽऽव
सूर्व्याजी गोळा, माझा -
बाबा, गावाचा राजा
आम्ही लेकरं नऊ
फिरत सारखी राहू
बाबा फिरतो खुंटाला
कुणाला नाही कंटाळा -
आपल्या भवती गिरकी
बाबाच्या भवती फिरकी
एवढं मोठ्ठं अंगण
तरि ज्याचं त्याचं रिंगण
बाबाची मूरत केवढी
पाटलाच्या रांजणाएवढी
मी तर बाई केवढीशी
चिमखडी गोटी एवढीशी
जराशी तिरकी, घेत गिरकी
रात्रंदिस मारत्ये फिरकी
भवरुन भवरुन सालोसाल
कंबर झाली फुगीर गोल
पायीडोई बर्फाळ भारा
अंगाभवता हवाई फुलोरा
रंगारंगाची पोटी चोळी
परकराची झाक निळी
ऊन, वारा, पाऊस खाते
पोटाशी सारे खेचून धरते
सावलीत अर्धी उजेडी अर्धी
जित्या भावल्यांची अंगावर गर्दी