तू नीज निर्जनी सिन्धो माझ...
तू नीज निर्जनी सिन्धो माझ्या, नीज रे,
गगनाच्या खाली, सुरेल गाणे शिणले.
अपरात्र घनांनी भरुन कोंडली क्षितिजे,
हे फिकट चांदणे, नीज, नीज तू वेगे.
मी बसुनी राहे तुझ्या बाजुला एका,
रोखून लोचने सुंदर तव बघत मुखा.
तू झोप सुखाने अंतर माझे जागे,
कुठल्याशा गीते अंतहीन ते थरके.
होणार कधी तव परिचय सखया मजला ?
उठणार कधी तू ? गीतामध्ये कुठल्या ?
मी तिष्ठत राहिन, पसरुन दोन्ही हात,
घे मिठीत मजला, गडया, सांज-तिमिरात.