Get it on Google Play
Download on the App Store

खूप हुंदडून झाल्यावर त...

खूप हुंदडून झाल्यावर

तिनसान झाली की

खाडीजवळच्या पुळणीत

उंडलीच्या झाडाखाली

एकटेच

सपशेल उताणी पडून

- अजून काळोख

झाला नसला तरी -

वर चांदण्या दिसतात का

पहायचे.

अगदी एकाच ठिकाणी

एकटक

पहात रहायचे.

जिथे दृष्‍टी लावली असेल

तिथे मग

खरोखरच एक चांदणी

दिसू लागते.

मग पुन्हा

ती तशीच दुसरीकडे

लावायची.

तिथेही आणखी एक

उमलतेच.

थोडयाच वेळात

हा चाळा

करावाही लागत नाही.

काळोख वाढतो

तशा चांदण्याच

आपल्याकडे

टकटक पाहू लागतात.

एकेकदा वाटेलही

उंडलीच्याच झाडाखाली का ?

आजी तर सांगते

तिथे वर एक समंध आहे.

पण

मनाला सांगायचे :

तोच हे सगळे दाखवतो आहे.

तो म्हणत असणार,

’लोक उगाच माझी

धास्ती घेतात

मलाही मुले आवडतात.

उन्हात

खूप खेळून झाल्यावर

निवार्‍याला

या खाडीच्या काठावर

आणखी दुसरे झाड तरी

आहे काय ?

मीच

ऊन आणि थंडी खात

वर बसून रहायला

नको काय ?’

आपल्याला

हे त्याच्या मनातले

सगळे समजत असते.

आपणही

मनातून त्याच्याशी

असेच काही बोलत असतो.

काळोख वाढला

की घरी परतायचे असते.

तोच आपल्याला उठवतो

हळू कानात सांगत,

त्याच्याच भाषेत,

’आता उदया !’

आजीला मात्र

हे सांगून उपयोगाचे नसते.

बाल गीते - संग्रह २

संकलित
Chapters
पावसा रे , थांब कसा ! ब... आला श्रावण पुन्हा नव्याने... थेंबातून आला ओला आनंद ... झुक्‌झुक् आली नभी ढगा... नदीबाई माय माझी डोंगरा... नदी वाहते त्या तालावर ... तू नीज निर्जनी सिन्धो माझ... पर्यावरणाची धरु आस , आणख... एक थेंब पावसाचा हिर... सोन्याच्या धारा चंदेरी... ऋतुचक्र सरकले काळे मेघ न... आवडतो मज अफाट सागर अथांग... वार्‍याच्या पाठीवर मेघ... नदी रुसली , आटून बसली ... अखंड करती जगतावरती कृपावं... सारखा चाले उद्‌धार - पोर... नको पाटी नको पुस्तक नक... इथे काय रुजतं ? मातीखाल... फुलगाणी गाईली याने आणि त्... फुलपाखरामागे फिरता वार... वसंतात गळतात पिंपळाची पान... नका तोडू हो झाडी झाडी ... पंखसुंदर प्रवासी निळ्या आ... एक फूल जागं झालं दोन ... माझ्या ग अंगणात थवे फु... रानातल्या रानात हिरव्य... रानाच्या दरीत पाखरांची... खूप हुंदडून झाल्यावर त... आकाशअंगणी रंग उधळुनी ... माझे गाव चांदण्याचे चा... अवकाशातुन जाता जाता सह... माझ्या तांबडया मातीचा लाव... राना -माळात दिवाळी हसली ... धरणी माझं नाऽऽव आकाश म... अंग नाही , रंग नाही वि... हे सुंदर , किति चांदणं ... अर्धाच का ग दिवस आणि अ... एका सकाळी दंवाने भिजून... भिंतीवर एक कवडसा मजसाठ... एक दिवस अचानक पोटामध्य... ढगाएवढा राक्षस काळा का... हिरवागार पोपट भिजलेल्या र... रंग जादूचे पेटीमधले इंद्र... एकदा एक फुलपाखरु कविता कर... लालपिवळा लालपिवळा , म्हण...