गोड निबंध-भाग ३ 51
प्रथम आप्पासाहेब यांनी त्याना रत्नागिरीच्या उत्तर टोकापासून तो दक्षिण टोकापर्यंत गावोगांव सार्वजनिक रीत्या चामडी सोलून दाखवीत हिंडा असें सांगितले. निष्ठावंत फाटक त्याप्रमाणें हिंडले. पोटाचें साधन म्हणून त्यांनी पिंजण खांद्यावर घेतलें. ते उत्कृष्ट गाद्या भरतात. ते दाभोळ गावी गेले, एकाकडे उतरले, तो ब्राह्मण म्हणाला, “मुसलमानांचा धंदा करतोस, लाज नाहीं वाटत ?” परन्तु सायंकाळी ३ रुपये गाद्या भरुन आज मिळविले, असें फाटक यांनी जेव्हां सांगितलें, तेव्हां तो सनातनी ब्राह्मण म्हणाला, “चांगले. ब्राह्मणांनी आतां हाच धंदा करावा !” आमचा सनातन धर्म असा पैशावर अधिष्ठित आहे ! फाटक गांवोगांव हिंडले, बाणकोटपासून गोव्यापर्यंत म्हशी, बैल, गायी, उंदीर, साप, मुंगुस, सर्वांचीं कातडीं सोलून दाखविण्याचें पवित्र काम ते करुन आले. मग हा आश्रम उघडला. आतां चर्मालयांत तयार होणार्या वस्तू विकण्यासाठीं येथें दापोलीस बाजारांत दुकानहि चर्मालयाचें उघडलें आहे. उद्धाटनास मी गेलों होतो. आजूबाजूचे लोक मेलेलें जनावर, प्राणी चर्मालयांत आणून देतात. इकडे आंबेडकराच्या पूर्वीच्या प्रचारामुळें महारबंधू मृत गुरें नेत नाहींत व कातडे काढीत नाहींत. त्यामुळें ही देवाशंकराची चर्मसंपत्ति मातीत जात होती. चांभार हजारों रुपयांचे चामडें मुंबईहून मागवीत. अशा वेळेस हें चर्मालय म्हणजे संपत्तीचें साधन आहे. राष्ट्राची संपत्ति वायां जात आहे. मृत पशूंचीं जीं कातडी, त्यांच्याच चपला व जोडे कृतज्ञतेनें घालणारे लोक निघाले, म्हणजे गोवधहि कमी होईल. कसाई चामड्यासाठी गाई मारतात. गोरक्षणासाठी गाय आर्थिक दृष्ट्या परवडेल असें करणें व मृत पशूंच्याच चपला वापरणें हे दोन मार्ग आहेत. गायीचेंच दुधदुभतें वापरणें हा तिसरा मार्ग.
प्रथम आप्पासाहेब दापोलीस आले. त्यांनीं जाहीर रीत्या मृत पशु सोलून दाखविला. त्या दिवशीं कार्तिक द्वादशी होती म्हणतात. येथील एका वकिलांनी आप्पासाहेब फाटक, यांनाच खरे ब्राह्मण म्हणून त्या दिवशीं बोलाविले. फाटक यांच्यावर बहिष्कार आतां नाहीं. चर्मालयाच्या शेजारीं ते उत्कृष्ट फळाफूलाची बाग करणार आहेत. चांगला कलमी आंब्याहून मोठा टमाटो त्यांच्या तेथे होतो. परन्तु त्यांचे टमाटो बाजारांत घेत नाहीत. ब्राह्मण तर मुळींच घेत नाहींत, म्हणतात कीं, हा सोनखत घालतो, हा कातडीं सोलतो ! शेणखत सोनखत यानें सोनें पिकतें. रामतीर्थ म्हणत, “हाड वाईट, शिवूं नको, विष्ठा वाईट, शिवूं नको, असें करुन संपत्तीला आपण भिरकावीत आहोत.” भगवान् शंकर हिमालयांतील चर्मे वापरतात. त्यांच्या हातांत हाडांचे भांडे आहे व अंगावर चर्मवस्त्र आहे. कैलासींच्या शंकराचा हा संदेश भारत वर्ष केव्हां ऐकणार ?
भाई फाटक हें चर्मालय सांभाळून इतरहि विधायक सेवा व काँग्रेस-प्रचार करतात.
--वर्ष २, अंक ३५.