गोड निबंध-भाग ३ 48
मागील वर्षी आपण मोर्चे काढले, मिरवणुका काढल्या. हजारोंनीं जमलों. सनदशीर प्रयत्न केले. काँग्रेसविरुध्द सत्याग्रह करणें हें बरें नव्हतें, म्हणून आपण तेथेंच थांबलो. परन्तु पदरीं कांही पडलें नाहीं म्हणून काँग्रेसवर जळफळत बसणें हा योग्य मार्ग नव्हे. आपण पुढें पाहिलें पाहिजे. चार आण्यांच्या सारासुटीनें प्रश्न थोडेच सुटणार आहेत. तात्पुरत्या प्रश्नांना आपण कायमचें महत्व देतां कामा नये. कायमचा प्रश्न आहे स्वराज्याचा. त्या झगड्यासाठीं तयार राहिलें पाहिजे. तोंपर्यंत वाटेंत असे तात्पुरते प्रश्न हाती घेऊन झगडत राहूं. परंतु मुख्य लढाईवरची दृष्टि दूर होतां कामा नये.
त्रिपुरी कां. मध्यें राष्ट्रीय मागणीचा ठराव आहे. हा ठराव म्हणजे आपला प्राण. या राष्ट्राचे मागण्यावर सर्व सामर्थ्य एकवटावयाचे आहे. या येथून बदला अशी गांवकर्यांची मागणी ! ही यांची हिन्दुसंघटना ! हैद्राबाद सत्याग्रहाला येथून मदत देण्यांत आली. हैद्राबाद सत्याग्रह कां करावयाचा तर हिन्दूना नागरिक स्वातंत्र्य नाहीं म्हणून. आणि त्या सत्याग्रहाला मदत पाठविणारे येथें हरिजनांना जवळ करुं इच्छित नाहींत. परवां एक हरिजन नव्हे हो तर एक कासारीण बाई येथील गणपतीच्या गाभार्यांत शिरुन दर्शन घेती झाली, म्हणून गांवांत चर्चा झाली. असें हें संघटन आहे.
या दापोली तालुक्यांतील मुरुड म्हणून गांव आहे. मोठा सुंदर गांव. समुद्रकांठी आहे. कर्मवीर महर्षि कर्वे, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक वगैरे थोरांचा हा गांव. या गांवी देवीचा उत्सव होत असतो. परन्तु रथ सोनारांनी कोढावा का ब्राम्हणांनीं, वगैरे भांडणें आज कित्येक वर्षे चाललीं आहेत. तेथील ब्राम्हण सोनारांस रथ ओढूं देत नाहींत. कांही तरी हक्काचीं भांडणें. त्या मुरुड गांवचे बहुतेक ब्राम्हण म्हणे हिंदुमहासभावाले. त्यांना संघटना हवी आहे. परन्तु जगदंबेच्या त्या माउलीच्या रथाला सोनार बन्धूहि ते घेणार नाहींत ! अरेरे. सोनारहि वर्ज्य तर हरिजन किती वर्ज्य !
देवाचा रथ ओढण्यांतहि हक्कांची भांडणें. देवाचा रथ ओढतात का हीं भुतें अहंकाराचा रथ ओढीत असतात ? अशी ही ठायीं ठायीं हिन्दुसंघटना आहे ! पंढरपूर, नाशिक वगैरे क्षेत्रीं हिंदुसघटना फार; हिन्दुमहासभेचा बोलबाला. परन्तु यांत कोण असतात ? ब्राम्हणाचा अहंकार रोमरोमांत भिनलेले, हिन्दुसमाजाची शकलें करण्यांत मोक्ष मानणारेच असतात. हें संघटन का संघटनेची शोभा !
हिंदूमहासभेला हिन्दुसंघटन नको आहे. मुसलमानांस व काँग्रेसला शिव्या देणें एवढेंच तिचें परम कर्तव्य आहे. मी येथील तरुण मित्रांना म्हटलें, संघटना मलाहि हवी आहे. कवाईत, नीटनेटकें उभें राहणें, कंटकपणा मलाहि हवा आहे. परन्तु मुसलमानांच्या द्वेषावर मी ही उभारणार नाहीं. हिन्दुसंघटना, हिन्दु समाज सांधण्यासाठीं उभारा; हरिजन भिल्ल, कातकरी सारे पददलित व परित्यक्त यांना जवळ घेण्यासाठी संघटना उभारा. संस्था, आश्रम शेंकडों काढा. आर्य समाजाला का हिन्दुधर्माचा कमी अभिमान आहे ? परन्तु आर्यसमाज काँग्रेसशीं कसा निष्ठावंत असतो ? एक ब्रहि काँग्रेसच्या विरुध्द आर्यसमाज बोलत नाहीं. त्यांची ही खरी राष्ट्रीय वृत्ति कोठें व हिंदुमहासभावाल्यांची संकुचित व दुष्टबुध्दि कोठें ?