गोड निबंध-भाग ३ 36
भिकारी गेला व त्या वस्तू घेऊन आला. या वेळपर्यंत दुसरे बरेच लोक महंमदाच्या भोंवती जमा झाले होते. पैगंबर तेथें जमलेल्या लोकांस विचारते झाले, “ही सतरंजी कोणी विकत घेतो का ?” एक गृहस्थ म्हणाला, “मी आठ आणे देतों.” पैगंबर म्हणाले, “आठ आणे एकवार, आठ आणे एकवार.” दुसरा गृहस्थ म्हणाला “मी बारा आणे देतों.” शेवटीं पैगंबरानें ती सतरंजी बारा आण्यांस विकली. नंतर तो लांकडी पेला तसाच विकण्यांत आला, त्याची किंमत चार आणे आली. अशा रीतीनें एक रुपया भांडवल मिळालें. पैगंबर त्या भिकार्यास म्हणाले, “चार आण्यांचें तुझ्या घरच्या मंडळीस कांही खाण्यास घेऊन ये, आणि बारा आण्यांची एक कुर्हाड घेऊन ये.”
तो भिकारी गेला व कुर्हाड घेऊन आला. पैगंबरांनी मजबूत दांडा वगैरे घालून दिला आणि त्यास ते म्हणाले, “गड्या, जा आतां रानांत व लांकडे तोडून विकावयास आणीत जा. रोज जे पैसे येतील ते मजजवळ आणून देत जा.
तो भिकारी गेला व मिळतील ते पैसे महंमदाजवळ आणून देऊ लागला. बीस दिवसांनीं त्याचे दहा रुपये पैगंबराजवळ शिल्लक राहिले होते. पैगंबर त्यास म्हणाले, “गड्या या पैशांतून आंथरुण घे व पिण्यास नक्षीचे दोन लांकडी पेले घे.
त्याप्रमाणें त्या भिकार्यानें केले. पुढें एक दिवस पैगंबर त्याला म्हणाले, “स्वावलंबन हें सर्वांत श्रेष्ठ बळ आहे. भीक मागणें हे फार वाईट आहे, समजलास. आपला भार दुसर्यावर घालणें हें केव्हांहि चांगलें नाहीं. निढळाच्या घामानें मिळवावें, स्वाभिमानानें व समाधानानें राहावें.”
रामनवमी
माता रामो मत्पिता रामचंद्र:। स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु । र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥
चैत्र शु॥ नवमी हा श्रीरामचंद्रप्रभूंचा जन्मदिन आहे. कल्याणाचेंहि कल्याण, मंगलाचेंहि मंगल असा जो प्रभु त्याचा हा जन्मदिवस; चौदा चौकड्यांचा बलाढ्य राजा जो रावण, त्रिभुवनाचा जो कर्दनकाळ त्या रावणाच्या बंदीशाळेंतून तेहतीस कोटी देवांना सोडविणारा जो मेघश्याम चापधर राम त्याचा हा जन्मदिवस; भक्तबिभीषणास सोन्याची लंका देणारा, सुग्रीवास सिंहासनावर बसविणारा जो राजा रामचंद्र त्याचा हा जन्मदिवस; जनस्थानामध्यें रहात असतांना चौदा सहस्त्र राक्षसांना ज्यानें एकट्यानें निर्दळिलें त्या चंडप्रतापी रामचंद्रांचा हा जन्मदिवस.