गोड निबंध-भाग ३ 2
दरिद्री हिंदूस्थानला दारुबंदी हा वर आहे. त्यामुळे ६० कोटि जनतेच्या उत्पन्नांत वाढ होईल. या आर्थिक फायद्याबरोबर मानसिक समाधान, कौटुंबिक आनंद, निर्मळ प्रेमळ वातावरण जें लाखों घरांतून उत्पन्न होईल त्याची किंमत कोण करील ? आईच्या तोंडावर गोड हांसणें, मुलांच्या तोंडावरची आनंदी लकेर. यांची किंमत का दिडक्यांत करायची असते?
हिंदुस्थानची मान आज उंच होत आहे. दहा हजार वर्षात एवढा महान प्रयोग कोणी केला नसेल. परंतु थोर काँग्रेस माता भारतीय लेकरांना आज कृतार्थ करणार आहे; हिंदुस्थानांतील सर्व भूतकालीन महापुरुषांचे आत्मे आज वरुन आशीर्वाद देत असतील, आनंदाश्रू ढाळीत असतील.
मातांनो, आतां चिंतन नका करुं. तुमचीं मुलें नीट घरीं येतील. पत्नींनो, आतां रडूं नका. पति मुलांना खाऊ घेऊन घरीं येतील. तुमच्या घरांत आनंद येणार आहे. माझी काँग्रेस माता तो आणणार आहे.
काँग्रेस अनेक गोष्टी करीत आहे. परंतु दारुबंदी व साक्षरता प्रसार या दोन गोष्टी सुवर्णाक्षरांनी लिहितां येतील.
इंग्रज सरकानें दारुचें उत्पन्न शिक्षणाकडे लाविलें होतें. तें शिक्षणहि शेंकडा १० लोकांना दिलें. आज काँग्रेस माता बाटली फोडीत आहे व पाटी सर्व स्त्री-पुरुषांच्या, मुला-मुलींच्या हाती देऊं पहात आहे. दारु तर बंद करुंच. परन्तु त्यामुळें शिक्षणाला कमी न होतां तें गांवोगांव फैलावूं. या दोन गोष्टी आपण यशस्वी केल्या तरी जगाच्या इतिहासांत आपण बहुमोल भर घातली असें होईल. इंग्रजानें १५० वर्षे राज्य करुन दारुचा सुकाळ केला; ज्ञानाचा दुष्काळ केला. काँग्रेस दारुचा दुष्काळ करुन ज्ञानाचा सुकाळ करणार. माणसाला खरी माणुसकी येथें देणार. राज्य करायला ब्रिटिश सरकार नालायक आहे, हें सिध्द करणार. २-३ वर्षांत हिंदूस्थानचा कायापालट काँ. सरकार करुन दाखवील; व्यसनांतून मुक्त करुन, ज्ञानानें संपन्न करुन, भारतीयांचा आत्मा काँग्रेस मुक्त करणार आहे. आत्मा मुक्त झाला कीं, त्याची इतकी दिव्य प्रभा फांकूं लागेल कीं पारतंत्र्य, दारिद्र्य, दैन्य, कलह, यांचा अंधार भराभर नाहींसा होईल. दिव्याची कांच लख्ख असून भागत नाहीं, आंत ज्योत हवी. ज्योत असेल तर मग झक्क कांच नी इतर वार्ता. काँग्रेस आज ही ज्योत लावीत आहे. ज्योत लावण्याबरोबरच कर्जबिल, खंडकरीबिल, तहशीलबिल, रस्ते, विहिरी वगैरे आजच्या परिस्थितींत शक्य त्या गोष्टी करुन जनतेच्या शरिराची कांचहि तेजस्वी होईल, जनतेचा देहहि जरा पुष्ट होईल अशी काळजी घेत आहे.
दारुबंदी व अज्ञानबंदी यायोगें आत्म्याची प्रभा फांकेलच, परंतु देहालाहि थोडी कळा चढेल. अंतर्बाह्य सुधारणा या प्रयोगानें होणार आहे. या अद्वितीय प्रयोगांत आपण सामील होऊ या. लहानापासून थोरापर्यंत हें वातावरण फैलावूं या. “दारु पीना हराम है” “अज्ञान रहना पाप है” असे मंत्र सर्वत्र दुमदुमवूं या.