गोड निबंध-भाग ३ 12
परंतु अद्याप काँग्रेसनें आपला शेवटचा निश्चय प्रगट केला नाहीं. तो निश्चय घेईपर्यंत आपण सर्वांनीं कसें वागावयाचें हा प्रश्न उभा राहतो. आम्हांला असे प्रश्न विचारण्यांत आले आहेत, त्या बाबतींत कांहीं सूचना देतों. आम्हां तिघांची युध्दसमिति आहे. तुम्ही आमचा सल्ला लागेल तेव्हां विचारीत जा. आमची समिति महात्माजी व राष्ट्रपति राजेंद्रबाबू यांचाहि सल्ला घेत जाईल.
दोन महत्वाच्या गोष्टी सर्वांनी ध्यानांत धराव्या. परिस्थितींत कांहीही बदल होवो. आपण धैर्यानें काँग्रेसला शोभेल अशा गंभीर वृत्तीनें सर्व प्रसंगी वागलें पाहिजे. आपण अंतर्गत झगडे बंद केले पाहिजेत. आपण वादविवाद बंद केले पाहिजेत. ज्याला ज्याला भारतीय स्वातंत्र्याची तहान आहे असा कोणीहि स्वातंत्र्यप्रेमी ऐक्यावर घाव घालणार नाहीं. सारे एकजुटीनें एका निश्चयानें वागूं या. क्षुद्र गोष्टी सोडून जरा उंच जाऊं या. या आणीबाणीच्या वेळी हिंदुस्थानचे सच्चे खरे सैनिक बनूं या. जीं आपली ध्येयें, ज्या आपल्या आशाआकांक्षा त्यांना अनुरुप अशा रीतीनें संयमानें व सामर्थ्याने आपण वागूं या. काँग्रेसला उद्या जीं जीं पावलें टाकावीं लागतील, ती टाकण्यासाठीं ती समर्थ राहील अशा प्रकारची खंबीर परिस्थिती निर्माण करुन ठेवूं या. सारे सिध्द राहूं या.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्यक्तिश: या गटागटानें घाईनें काही बोलूं नये, घाईनें कांही तरी करुं नये, योग्य वेळ येण्यापूर्वी पेंचप्रसंग उत्पन्न करुं नये, व. कमिटीच्या पत्रकांतील भावार्थ लक्षांत घेऊन तदनुरुप वागूं या. त्यापेक्षां अधिकपणा करुं नये; त्या पत्रकांतील भावार्थापेक्षां कमीपणाहि दाखवूं नये. जें महान् कार्य आपल्या समोर आहे, जें ऐक्य अत्यंत आवश्यक आहे, त्याला बाध येईल अशा रीतीनें कोणी वागूं नये.
राष्ट्रासमोर व जगासमोर काँग्रेसचें म्हणणें मोकळेपणानें ठेवण्यांत आलेलें आहे. त्या पत्रकाला आम्ही सत्यार्थानें चिकटून राहूं, तदनुरुप वागूं. जागतिक पुनर्रचना व जागतिक स्वातंत्र्याचे जे मार्ग आहेत, त्या मार्गानें जाऊं. भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग जागतिक स्वातंत्र्याला पोषक होईल. परंतू व. कमिटीच्या पत्रकाच्या पेक्षां अधिक कोणी बोलूं नये. त्यानें शिस्त कमी होईल. आपल्या कार्याची हानि होईल. ज्या वेळेस ऐक्याची भूमिका पाहिजे त्या वेळेस आपली दुफळी दिसेल. हें टाळलें पाहिजे.
अलग अलग वैयक्तिक कृत्यांनी सामर्थ्य मिळणार नाहीं. केवळ शब्दांनी शक्ति येत नसते. शक्ति म्हणजे शौर्य नव्हे. आपण धीरगंभीर वृत्तीनें वागूं या; संयमानें वागूं या. काँग्रेसच्या प्रतिष्ठेस साजेल अशा रीतीनें वागूं या.
--वर्ष २, अंक २५.