Get it on Google Play
Download on the App Store

गोड निबंध-भाग ३ 24

ज्या राष्ट्रांत देशभक्ति नाहीं, ज्या राष्ट्रांत योग्य स्वाभिमान नाहीं, ज्या राष्ट्रांत स्वधर्म, स्वभाषा व स्वेतिहास याबद्दल भक्ति व पूज्यभाव दिसत नाहीं, तें राष्ट्र जिवंत कसें राहणार ? देशहितार्थ वाटेल तें करण्यास, देशासाठीं वाटेल तो स्वार्थत्याग करण्यास, ज्या देशांत लोकांची दुर्मिळता आहे. तो देश, तें राष्ट्र स्वातंत्र्यसुखाचीं स्वर्गीय फळें-यांचा आस्वाद कसें घेणार ?

बोलकी देशभक्ति कार्यकर होत नसते. बोलणार्‍या वाक्पटु देशभक्तांचा दुष्काळ नसतो, परंतु कृतीनें देशभक्त म्हणजे मात्र क्वचितच दिसतो. विचार, आचार व उच्चार या तिन्ही गोष्टींत ज्यांची देशभक्ति उत्कटत्वानें दिसून येते, तो खरा देशभक्त. इटली देशाचा महान् थोर पुरुष मॅझिनी हा लहानपणापासून किती स्वाभिमानी व देशप्रेमी. आठ वर्षाचा होता तेव्हांपासून आपला देश परतंत्र आहे म्हणून या शूर वीरानें आपल्या कोटास एक काळा पट्टा सुतकाचें निदर्शन म्हणून बांधला होता ! उगीच नाहीं त्याच्या जळजळीत वाणीनें इटलींतील जनता खडबडून उठली. आयर्लंडचा प्रसिध्द देशभक्त डी व्हॅलेरा यास त्याच्या बापानें विचारलें, “तूं पुष्कळ श्रीमंत झालास तर काय करशील ?” त्या लहान मुलानें उत्तर दिलें, “मी माझा स्वदेश स्वतंत्र करीन.” लहानपणापासून देशभक्तीचें बीज ज्याच्या अंत:करणांत पेरलेलें असेल व ज्या बीजास कृतीचें पाणी मिळून त्या बीजाचा सुंदर रोपा झाला असेल, त्याच लोकांनी देशोध्दार करावा, इतरांनी गप्पा माराव्या.

देशभक्ति म्हणजे कांही सुखाची गोष्ट नाहीं. देशभक्ति म्हणजे सतीचे वाण आहे; देशभक्ति म्हणजे कांट्यांवरुन चालणें आहे; देशभक्ति सुळावरचें स्वामित्व आहे; फासावरचें लटकणें आहे. देशभक्ति नि:स्वार्थ असते. आपल्या पुढील पिढीस सुखसमाधान मिळावें म्हणून देशभक्त आज मरत असतो. ईश्वरी राज्यांत हा असाच न्याय आहे. एकानें मरावे व दुसर्‍यानें भोगावे. आपण केलेल्या अविरत कष्टाचें, सतत परिश्रमाचें सुंदर मधुरतर फळ आपणांसच चाखावयास मिळेल असें देशभक्ताच्या डोळ्यांस दिसत नसतें तरी तो अनंत श्रम करुन मरावयास परन्तु कीर्तिरुपानें अमर होण्यास-तयार होतो. तो मनांत म्हणतो, आपण जें कांही थोडें फार सुख अनुभवितों तें आपल्या पूर्वजांच्या श्रमाचेंच फळ नाहीं का ? मागील असंख्य लोकांच्या कष्टाचें फळ आपण भोगतों, या ॠणाची फेड अल्पश: व्हावी म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार आपण पुढील पिढीसाठीं कष्ट केले पाहिजेत. जो असे कष्ट कोणत्या तरी कार्यक्षेत्रांत करणार नाहीं, तो कर्तव्यांत कुचराई करणारा नराधम आहे; आयत्या बिळावरचा नागोबा आहे.

खरें सुख कशांत आहे ? कर्तव्याच्या परिपूर्णतेंत खरें सुख आहे. ज्यानें प्राप्त कर्तव्य केलें नाहीं, त्यानें जगांत जरी मानमतराब मिळविले, धनाच्या राशी जोडिल्या, माड्यामहाल बांधिले, तरी अंतकाळीं त्यास पश्चात्तापच होईल. अंतकाळींच कशास, पण दररोज त्याच्या मनास सदसद्विवेक बुध्दीची टोंचणी टोंचीत राहील. बाहेरुन तो वैभव मिरवील, मिशांवर पीळ देईल, पाठीवर मंदील सोडील, परंतु त्याचें हृदयकपाट उघडा, तेथें दु:ख, पश्चात्ताप, कर्तव्य न केल्याची टोंचणी--यांचा परिवार भरलेला दिसेल.

गोड निबंध-भाग ३

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
रात्र पाचवी मथुरी गोड निबंध-भाग ३ 1 गोड निबंध-भाग ३ 2 गोड निबंध-भाग ३ 3 गोड निबंध-भाग ३ 4 गोड निबंध-भाग ३ 5 गोड निबंध-भाग ३ 6 गोड निबंध-भाग ३ 7 गोड निबंध-भाग ३ 8 गोड निबंध-भाग ३ 9 गोड निबंध-भाग ३ 10 गोड निबंध-भाग ३ 11 गोड निबंध-भाग ३ 12 गोड निबंध-भाग ३ 13 गोड निबंध-भाग ३ 14 गोड निबंध-भाग ३ 15 गोड निबंध-भाग ३ 16 गोड निबंध-भाग ३ 17 गोड निबंध-भाग ३ 18 गोड निबंध-भाग ३ 19 गोड निबंध-भाग ३ 20 गोड निबंध-भाग ३ 21 गोड निबंध-भाग ३ 22 गोड निबंध-भाग ३ 23 गोड निबंध-भाग ३ 24 गोड निबंध-भाग ३ 25 गोड निबंध-भाग ३ 26 गोड निबंध-भाग ३ 27 गोड निबंध-भाग ३ 28 गोड निबंध-भाग ३ 29 गोड निबंध-भाग ३ 30 गोड निबंध-भाग ३ 31 गोड निबंध-भाग ३ 32 गोड निबंध-भाग ३ 33 गोड निबंध-भाग ३ 34 गोड निबंध-भाग ३ 35 गोड निबंध-भाग ३ 36 गोड निबंध-भाग ३ 37 गोड निबंध-भाग ३ 38 गोड निबंध-भाग ३ 39 गोड निबंध-भाग ३ 40 गोड निबंध-भाग ३ 41 गोड निबंध-भाग ३ 42 गोड निबंध-भाग ३ 43 गोड निबंध-भाग ३ 44 गोड निबंध-भाग ३ 45 गोड निबंध-भाग ३ 46 गोड निबंध-भाग ३ 47 गोड निबंध-भाग ३ 48 गोड निबंध-भाग ३ 49 गोड निबंध-भाग ३ 50 गोड निबंध-भाग ३ 51