गोड निबंध-भाग ३ 34
हिंदूस्थानच्या पूर्वीच्या कलांचें, पूर्वीच्या व्यापाराचें किती वर्णन करावें ? परंतु आज आम्हीं हृतसर्वस्व झालों आहोंत; कोठें आहेत आमच्या मालकीच्या आगबोटी, कोठें त्या बांधण्याचे कारखाने ! तें पूर्वीचें कौशल्य गेलें व नवीन कौशल्य शिकविण्यास सरकार तयार नाहीं. आमच्या मधील जुनें हस्तकौशल्य नाहींसे केलें गेलें व नवीन यंत्रकौशल्य आम्हांस शिकविणार्या संस्था सरकार एकहि स्थापीत नाहीं. ना. गोखले म्हणत त्याप्रमाणे आम्हीं पाणक्ये व मजूर होऊन राहिलों आहोंत.
ब्रिटिशांच्या सत्तेखालीं व्यापाराचा, संपत्तीचा, धनधान्याचा, आयुष्याचा, जन्ममरणाचा, उत्पन्नाचा असा सर्वतोपरी र्हास होत चालला आहे. परंतु या बाह्य भौतिक र्हासाबरोबर आमच्या अनेक व्यसनांपायीं दारु, चिरुट, चहा, रेसिस - यांपायीं कसा कसा र्हास होत आहे तें पुढील अंकांत देऊं. कोलरिज या कवीनें आपल्या देशबांधवांबद्दल स्पष्ट लिहिलें आहे.
We have taken to distant tribes slavery and pans.
And deadlier far, our vices which kill the whole man,
his body and his soul !
हिंदी मनुष्याचे शरीर व मन या दोहोंचा र्हास ब्रिटिशांच्या अमदानीत असाच होत आहे.
प्रतिभेला स्थलकालाचा प्रतिबंध नसतो
व्हिक्टर ह्यूगो हा गेल्या शतकांत फार मोठा ग्रंथकार फ्रान्समध्यें होऊन गेला. तो उत्कृष्ट कादंबरीकार, प्रतिभाशाली कवि, आणि फार वरच्या दर्जाचा नाटककार होता. कांही कांही बाबतींत त्यानें शेक्सपियरवरहि ताण केली आहे असें म्हणतात.
ह्यूगो एक दिवस एका हेअर कटिंग सलूनमध्यें हजामतीसाठी म्हणून गेला. न्हाव्यानें त्याच्या गळ्याभेवती झगा वगैरे गुंडाळला, पट्टयावर वस्तरा लावून आतां न्हावी दादा ह्यूगोची दाढी करण्यास आरंभ करणार तोंच ह्युगो त्याला म्हणाला, ‘थांब, थांब जरा.’ असें म्हणून त्यानें आपल्या खिंशांतील पेन्सील काढली; परंतु त्याला कागद कांही सांपडेना. शेवटीं त्या सलूनमधील टेबलावर त्याला एक कागद दिसला. त्या कागदावरहि एका बाजूनें कांही लिहिलेलें होतें. दुसर्या बाजूनें त्याच्यावर ह्यूगो भराभर लिहूं लागला. तो न्हावी दादा आपला उभा. दुसरें गिर्हाईक आलें. परंतु ह्युगो तेथें बसलेला. ह्यूगो सारखा लिहीत होता. तो न्हावी मनांत म्हणाला, “काय भरकटतो आहे, कोणास माहित, स्व:ला तरीं वाचतां येईल, कीं नाहीं कोणास कळे ?” त्या न्हाव्यानें ह्यूगोला पुन्हां सांगितलें, “आटपा ना राव; दुसरे लोक खोळंबले आहेत.” ह्यूगो म्हणाला, “आणखी एकच सेकंद.” परंतु त्याचा सेकंद न संपणारा होता. ह्यूगो मध्येंच थांबे, पुन: लिहावयास लागे, मध्येंच वर डोळे लावी. न्हावी पुन: म्हणाला, “महाराज, गिर्हाईक फार आहे. कांही लोक तर यादीवर नांव लिहून गेले आहेत. त्यांस बोलावून त्यांची दाढी वगैरे करावयाची आहे. तुमचें तर लिहिणेंच सुरु आहे.” “तुम्हांस फार काम आहे, मला पण फार काम आहे.” असें म्हणून तो दरवाजा उघडून ह्यूगो निघून गेला. पण ह्यूगोची टोपी तेथेंच राहिली -“अहो राव, तुमची टोपी, तुमची टोपी,” तो सलूनवाला ओरडून म्हणाला. ‘अरेच्या, मी विसरलोंच तिला; मला तिचें भानच राहिलें नाहीं’ असें म्हणून ती टोपी घेऊन दाढी वगैरे न करतां ह्यूगो निघून गेला.